मधुमेह हा असा आजार आहे, ज्याच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चीननंतर भारत हा दुसरा असा देश आहे, जिथे मधुमेहींची संख्या जास्त आहे. अयोग्य आहार, बिघडणारी जीवनशैली व ताणतणाव ही मधुमेहाची कारणे आहेत. जर मधुमेही रुग्णाने त्याच्या आहाराची काळजी घेतली नाही आणि त्याचे शरीर सक्रिय ठेवले नाही, तर रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका जास्त असतो. जर मधुमेह बराच काळ नियंत्रित केला नाही, तर त्यामुळे हृदयरोग, मूत्रपिंड व फुप्फुसांचे नुकसान होऊ शकते. अशातच मधुमेहाला काबूत ठेवण्यासाठी चालणे हा एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो.

चालणे हा एक सोपा; पण खूप प्रभावी व्यायाम आहे. चालणे केवळ वजनच नियंत्रित करत नाही, तर हृदयदेखील चांगल्या स्थितीत ठेवते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी चालण्याची कृती ही औषधासारखे काम करते. चालण्याने ताण कमी होतो, मूड सुधारतो आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. आता प्रश्न असा उद्भवतो की, मधुमेहाच्या नियंत्रणासाठी जेवण्याआधी चालावे की नंतर? जेवणानंतर हळू चालणे हा रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे का? रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जेवणापूर्वी चालणे फायदेशीर आहे की जेवणानंतर ते जाणून घेऊया.

जेवल्यानंतर चालणे फायदेशीर की जेवण्यापूर्वी

जेवण्यापूर्वी चालण्याचे फायदे

जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी चालता तेव्हा शरीरात ग्लुकोजचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीर ऊर्जेसाठी साठवलेल्या चरबीचा वापर करते. या प्रक्रियेमुळे वजन कमी होण्यास मदत होतेच; त्याशिवाय रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रित होते. सकाळी रिकाम्या पोटी चालल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता हळूहळू सुधारते. मधुमेही रुग्णांनी रिकाम्या पोटी चालण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण- रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.

जेवल्यानंतर चालण्याचे फायदे

जेवल्यानंतर १० ते २० मिनिटे चालणे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी कृती आहे. जेवणानंतर शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. जर आपण बसून राहिलो,तर ही साखर थेट रक्तात जाते आणि जमा होते. जर आपण जेवणानंतर हलके फिरायला गेलो, तर स्नायू ऊर्जेसाठी साखरेचा वापर करू लागतात, ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि इन्सुलिनची गरजही कमी होते. २०२२ च्या एका अभ्यासानुसार, जेवणानंतर फक्त २ ते ५ मिनिटे हलके चालण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण चांगले नियंत्रित करण्यास मदत मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्तदाब ही आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. पण, रक्तदाबाची पातळी नियंत्रित करणाऱ्या आहारासोबतच व्यायामाची कृतीही महत्त्वाची भूमिका बजावते. रक्तातील साखरेचे व्यवस्थापन हे फक्त तुम्ही काय खाता यावर अवलंबून नाही, तर तुम्ही शरीराची कशा प्रकारे हालचाल करता, शरीराला कसे सक्रिय ठेवता यावरही ते अवलंबून आहे.