Signs of High Cholesterol in Legs: कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे ‘सायलेंट किलर’, असं मानलं जातं. कारण- सुरुवातीला त्याची स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. पण लक्षात ठेवा शरीर काही संकेत मात्र देतं, विशेषतः चालताना! चालताना दिसणारी ही लक्षणं म्हणजे तुमच्या धमन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉलची भिंत तयार होण्याची सुरुवात असते. जर ही चिन्हं वेळीच ओळखली नाहीत, तर पुढे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकसारख्या जीवघेण्या आजारांना आमंत्रण मिळू शकतं.

कोणती आहेत धोक्याची लक्षणं?

१. पायांत वेदना किंवा त्रास

सर्वांत पहिलं लक्षण म्हणजे चालताना पायांत होणारी वेदना. कोलेस्ट्रॉलमुळे धमन्या अरुंद होतात आणि स्नायूंना ऑक्सिजन कमी पोहोचतो. परिणामी पोटरी, मांडी किंवा नितंबांत वेदना सुरू होते. थोडा वेळ थांबल्यावर वेदना कमी होते; पण गंभीर अवस्थेत बसल्यावरही त्रास कायम राहतो.

२. स्नायू कमकुवत होणे

रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे पायांचे स्नायू कमकुवत होतात. जास्त वेळ उभं राहणं किंवा संतुलन साधणं कठीण होतं. हळूहळू स्नायूंचं क्षीण होणं (मसल अ‍ॅट्रॉफी) सुरू होतं आणि हालचाल अवघड होते.

३. थंड पाय किंवा पिंडऱ्या

चालताना अचानक एखादा पाय जास्त थंड वाटतो का? हेही वाईट कोलेस्ट्रॉलचं लक्षण आहे. रक्तप्रवाह सुरळीत चालू न राहिल्यानं पायाला निळसर रंगही येऊ शकतो.

४. सुन्नपणा किंवा झिणझिण्या

‘पिन्स अँड नीडल्स’सारख्या झिणझिण्या किंवा सुन्नपणा जाणवतो का? हेही धोक्याचं लक्षण. ऑक्सिजन नीट न मिळाल्यास नसा कमकुवत होतात आणि पुढे गंभीर आजार उद्भवू शकतात.

५. त्वचेचा रंग बदलणे

पाय फिकट किंवा निळसर दिसत असेल, तर ते रक्तपुरवठा कमी झाल्याचं थेट चिन्ह आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास टिश्यूमध्ये ऑक्सिजन पोहोचत नाही आणि ‘सायनोसिस’सारखी स्थिती निर्माण होऊ शकते.

६. जखमा लवकर न भरून येणे

पायावर किरकोळ जखम झाली आणि ती वेळेत बरी होत नसेल, तर सावध व्हा! रक्तप्रवाह सुरळीत नसल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि जखम बरी न होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत संसर्ग किंवा गँग्रीन होण्याचीही भीती असते.

धोका कसा कमी कराल?

  • वेळोवेळी कोलेस्ट्रॉल चेकअप करा
  • संतुलित आहार घ्या. फळं, भाज्या, होल ग्रेन्स
  • दररोज चालणं, व्यायाम करा
  • धूम्रपान पूर्णपणे सोडा

ज्यांच्या कुटुंबात कोलेस्ट्रॉलचा इतिहास आहे, मधुमेह, स्थूलपणा, थायरॉईड किंवा वय वाढलेले लोक यांना धोका अधिक असतो. त्यामुळे चालताना शरीर देत असलेले हे संकेत ओळखा आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या… नाही तर उशीर झाल्यावर पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.