Washing Machine Use Jugaad: पावसाळा म्हणजे कपडे सुकण्याची बोंबाबोंब हे एक समीकरण आपण सगळेच जाणून आहोत. यात विशेष त्रास म्हणजे पावसाळ्यातच धुण्यासाठी पडणाऱ्या कपड्यांची संख्या जास्त असते. म्हणजे जरा कोणी कुठे घराबाहेर पडलं तरी पटकन चिखल, वारा, धूळ याने कपड्यांची अगदी वाईट अवस्था होते आणि मग ते धुवायला टाकण्याशिवाय पर्याय उरत नाही. सतत हाताने कपडे धूत बसायला अलीकडे साहजिकच कोणाला वेळ नसतो त्यामुळे अशावेळी वॉशिंग मशीन एखाद्या देवदूतासारखी आपले कष्ट वाचवते. पण अनेकदा वॉशिंग मशीन वापरणं हे सुद्धा जोखमीचं काम वाटू शकतं. याचं मुख्य कारण म्हणजे पाणी व वीज या परस्पर विरोधी शत्रूंना एकत्र आणायचं काम ही मशीन करते त्यामुळे कधी लहानश्या स्पार्कमुळे सुद्धा पूर्ण मशीनचा स्फोट होऊ शकतो. पण तुम्हाला माहित आहे का, वॉशिंग मशीनचा स्फोट होण्यासाठी फक्त पाणीच नाही तर ‘ही’ एक क्षुल्लक चूकही मोठं कारण ठरू शकते.

अनेक घरांमध्ये अजूनही मोजके कपडे असतील तर ते हातानेच धुतले जातात व ज्या दिवशी खूप कपडे आहेत त्याच दिवशी मशीन वापरली जाते. तुम्ही सुद्धा याच गटातील असाल तर तुम्हाला सर्वात आधी तुमची गरज लक्षात घ्यायला हवी व यानुसार अधिक वजन पेलण्याच्या क्षमतेची मशीन घ्यायला हवी

ओव्हरलोडिंग हे वॉशिंग मशीनच्या स्फोटाचे सर्वात मोठे कारण असू शकते . तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनवर पाहिले असेल. ६, ६.५, ७, ८ किलो अशा वेगवेगळ्या वजन क्षमतेच्या मशीन असतात. जर आपण क्षमतेपेक्षा अधिक कपडे मशीनमध्ये सातत्याने टाकत असाल तर यामुळे मशीनच्या इंजिनवर दबाव येऊन स्फोट होण्याची शक्यता असते. याशिवाय जर तुमच्याकडे फ्रंट लोड मशीन असेल तर कपडे जास्त झाल्यास मशीनचा दरवाजा नीट बंद होत नाही, तुम्ही यामध्ये अधिक जोर दिल्यास दरवाजा तुटण्याची शक्यता असते.

हे ही वाचा<< पोळीचं पीठ मळताना २० सेकंद आधी ‘हे’ एक काम करायलाच हवं; तव्याने कसा वाचेल जीव, पाहा Video

टीप: अशी स्थिती टाळण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये क्षमतेप्रमाणेच कपडे टाकावेत. शिवाय मशीन गोल फिरताना जर मशीनच्या वॉलला लागत असेल तर मशीन बंद करून कपडे सुटसुटीत करावे. कपडे खूपच जास्त असल्यास दोन फेऱ्यांमध्ये धुवून घ्यावेत.