Brakrfast recipes for Weight Loss : वजन कमी करताना आहारात योग्य पदार्थांची निवड केली जाणे महत्त्वाचे असते. सुजी चिल्ला हा हलका आणि पटकन पचणारा पदार्थ आहे. बेसन चिल्ला जास्त वेळ पोट भरलेले ठेवतो, तर गव्हाची पोळी रोजच्या आहाराचा भाग असली तरी तिच्यात कार्बोहायड्रेट्स अधिक असतात. त्यामुळे योग्य पर्याय काय ते समजून घेणं गरजेचं आहे.
वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करताना सर्वांत मोठं आव्हान म्हणजे रोजच्या आहारात काय समाविष्ट करायचं हे ठरवणं. भारतीय घरांमध्ये रोज बनणाऱ्या पदार्थांमध्ये सुजी चिल्ला, बेसन चिल्ला व गव्हाची पोळी हे तीन लोकप्रिय पर्याय आहेत. हे पदार्थ पोटभरीचे, सोपे आणि सहज उपलब्ध असले तरी वजन कमी करण्याच्या बाबतीत त्यांचा परिणाम वेगवेगळा आहे. त्यामुळे कोणता पदार्थ तुमच्या आहार आणि सुदृढतेसह वजनाच्या लक्ष्यासाठी योग्य ठरू शकेल ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
१. सुजी चिल्ला
सुजी किंवा रव्यापासून बनवलेला चिल्ला मऊसर, हलका व सहज पचणारा असतो. त्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात; पण त्यात प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स असतात. फायबर कमी असल्यामुळे सुजी चिल्ला पटकन भूक भागवतो; पण तो लवकर पचल्यामुळे काही वेळात पुन्हा भूक लागते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी या पदार्थाचा हलका नाश्ता किंवा स्नॅक्स म्हणून कधी कधी वापर करता येतो.
२. बेसन चिल्ला
बेसन किंवा हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून बनवलेला चिल्ला वजन कमी करण्यासाठी सर्वांत उपयोगी मानला जातो. त्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात, जे शरीरात स्नायू बांधायला मदत करतात आणि जास्त वेळ पोट भरलेले ठेवतात. त्याशिवाय बेसन चिल्ला रक्तातील साखरेचे प्रमाण निश्चित ठेवतो आणि त्यामुळे अचानक भूक लागण्याची किंवा खाण्याची इच्छा कमी होते. जर त्यात बारीक चिरलेली भाजी घालून, ती कमी तेलात शिजवली, तर हा पदार्थ एक परफेक्ट लो-कॅलरी, हाय-प्रोटीन ठरतो.
३. गव्हाची पोळी – संतुलित पर्याय
भारतीय आहारात गव्हाची पोळी हा महत्त्वाचा भाग आहे. त्यात जटिल कार्बोहायड्रेट्स, फायबर असतं. बेसन चिल्लाइतकं प्रोटीन त्यात नसले तरी गव्हाची पोळी ऊर्जा निश्चित ठेवते आणि पोट बराच वेळ भरलेले ठेवते. जर एक-दोन पोळ्या भाज्यांसोबत खाल्या, तर वजन कमी करण्याच्या योजनेत त्यांचा उत्तमरीत्या समावेश होऊ शकतो. मात्र, रात्री जास्त पोळ्या खाल्ल्यास जास्त कार्बोहायड्रेट्समुळे वजन कमी होण्याचा वेग कमी होऊ शकतो.
वजन कमी करण्यासाठी योग्य काय?
वजन कमी करायचं असेल, तर बेसन चिल्ला हा उत्तम पर्याय आहे. तो स्नायूंच्या आरोग्यास मदत करतो, भूक नियंत्रित राखून, ऊर्जा स्थिर ठेवतो. गव्हाची पोळीही आहाराचा भाग राहू शकते; पण कमी प्रमाणात. तर, सुजी चिल्ला हलक्या नाश्त्यासाठी चांगला आहे; पण वजन कमी करण्यासाठी त्याला मुख्य आहार बनवणं बरोबर नाही.