उन्हाळ्यात तहान भागविण्यापासून ते शरीराला हायड्रेट ठेवण्यापर्यंत सर्वांत पहिल्यांदा कोणतीही व्यक्ती पाण्याचा वापर करील. मात्र, उन्हाळ्यात हायड्रेटेड राहायचे असल्यास, अजून एक पदार्थही तुम्हाला मदत करू शकतो आणि तो पदार्थ म्हणजे दूध. दूध या द्रव पदार्थात असणाऱ्या घटकांनी शरीराला केवळ हायड्रेशनच नाही, तर आवश्यक असणारे पोषण मिळून, संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरू शकते.

हायड्रोजन आणि ऑक्सिजनने तयार झालेल्या पाण्यापेक्षा कितीतरी अधिक पोषक घटक दुधात उपलब्ध असतात. दुधामध्ये पाणी, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे असे अनेक शरीरोपयोगी घटक असतात. दुधामधील हे घटक इलेक्ट्रोलाइट्सचे उत्तम वाहक बनतात, जे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करीत असतात. म्हणूनच उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर शरीरास पुन्हा हायड्रेट करण्यासाठी दूध पिणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून मिळते.

हेही वाचा : तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी? कोणत्या पेयाचा होतो सर्वाधिक फायदा; घ्या जाणून….

व्यायामानंतरचे सर्वोत्तम पेय

व्यायाम करतेवेळी किंवा उष्ण हवामानात घामावाटे आपल्या शरीरातून पाणी, सोडियम, पोटॅशियम व क्लोराईड यांसारखे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. त्यामुळे वेळीच या इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढल्यास डिहायड्रेशन, पेटके येणे किंवा थकवा यांसारख्या गोष्टी टाळण्यास मदत होऊ शकते. अशा वेळेस एक ग्लास दूध हे त्यामध्ये नैसर्गिकरीत्या असणाऱ्या इलेक्ट्रोलाइट्स घटकांमुळे शरीराने व्यायामादरम्यान बाहेर टाकलेल्या खनिजांचा समतोल राखण्यास मदत करते. परिणामी व्यायामानंतर शरीराचे डिहायड्रेशन होऊ नये यासाठी दूध हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

रीहायड्रेशनसाठी उत्तम पर्याय

दुधामध्ये लॅक्टोज नावाचा घटक असतो. लॅक्टोज म्हणजे एक नैसर्गिक साखर असून, शरीरात पाणी, इलेक्ट्रोलाइट्स व क्षार शोषून घेण्यास मदत करते. म्हणूनच दूध हा रीहायड्रेशनसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

“दूध शरीरातील आवश्यक घटकांची उणीव भरून काढत असले तरीही त्यापलीकडेही या पेयाचे फायदे आहेत. दुधामध्ये असणारी प्रथिनेदेखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. दुधातील प्रथिने स्नायूंना बरे करणे, त्यांना बळकट करण्याचे काम करीत असतात. भरपूर अंगमेहनत किंवा व्यायामानंतर शरीरातील प्रथिनांचेदेखील संतुलन दुधाच्या मदतीने राखले जाऊ शकते. त्यामुळे स्नायूंची वाढ होण्यास, त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते,” असे ‘दूधवाला’चे सह-संस्थापक व सीईओ अमन जैन यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Hair care : केसगळतीवर ‘या’ आयुर्वेदिक औषधी ठरतील उपयुक्त! पाहा त्यांचे वापर अन् फायदे….

याव्यतिरिक्त दुधामध्ये अशी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे, सूक्ष्म पोषक घटक आहेत; जे शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात. उदाहरणार्थ- कॅल्शियम हा घटक हाडे आणि दातांच्या बळकटीसाठी उपयुक्त असतो. तसेच, बी१२ जीवनसत्त्व व रिबोफ्लेविन या घटकांमुळे चयापचय क्रियेत सुधारणा होते आणि नवीन पेशींच्या निर्मितीसाठी मदत होते. झिंकसारखे घटक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास फायदेशीर असून, ड जीवनसत्त्व कॅल्शियम शोषून घेण्यास आणि हाडांचे आरोग्य राखण्याचे कार्य करते.

[टीप – वरील लेख हा प्राप्त आधारित आहे. कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]