What Are The Symptoms Of Panic Attack : अनेकांना हसता-खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाल्याचे प्रसंग आपण ऐकत आलो आहोत. त्यातला एक प्रकार म्हणजे पॅनिक अटॅक (Panic Attack). पॅनिक अटॅक ही अशी एक स्थिती आहे, ज्यामध्ये अचानक भीती, चिंता जाणवते. पण, काही जणांना असे वाटते की, पॅनिक अटॅकचा अर्थ असा नाही की, तुम्ही वेडे झाला आहात. ही अवस्था कुठलाही धोका नसतानाही येऊ शकते आणि काही मिनिटांत ती अचानक तीव्रसुद्धा होऊ शकते. उदाहरणार्थ- श्वास घेण्यात अडचण येणे, हृदय धडधडणे इत्यादी.
पॅनिक अटॅक येण्याआधी काही सेकंद तुम्ही बरे असता. तर दुसऱ्या क्षणी तुमचे हृदय धडधडते, श्वास घ्यायला त्रास होतो, तळवे घामाने ओले होऊ लागतात. तर याबद्दल अधिक आणि सविस्तर जाणून घेण्यासाठी ‘जनसत्ता’ने एनआयटी फरीदाबाद येथील संत भगतसिंग महाराज चॅरिटेबल हॉस्पिटलमधील जनरल फिजिशियन डॉक्टर सुधीर कुमार भारद्वाज यांच्याशी चर्चा केली…
तर सुरुवातीला समजून घेऊया की, पॅनिक अटॅक म्हणजे काय?
डॉक्टर सुधीर कुमार भारद्वाज यांच्या मते, पॅनिक अटॅक म्हणजे अचानक चिंता, तणाव, घाम येणे आणि भीती या भावना तुम्हाला जाणवू लागतात. कधी कधी व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास तर कधी वेदनाही होतात. तुमच्या शरीराची लढण्याची शक्ती नियंत्रणाबाहेर जाते. पॅनिक अटॅक कधीही, कुठेही येऊ शकतो. तो काही मिनिटांपासून ते अर्ध्या तासापर्यंतही टिकून राहू शकतो.
पॅनिक अटॅकची लक्षणे कोणती ?
- अचानक हृदयाचे ठोके वाढणे.
- श्वास घेण्यास त्रास होणे.
- छातीत दुखणे किंवा छातीवर दाब येणे.
- चक्कर येणे.
- हात किंवा चेहऱ्यावर सुन्नपणा किंवा मुंग्या येणे.
- नियंत्रण सुटणे किंवा मृत्यूची भीती वाटणे.
खरं तर, पॅनिक अटॅक कधीच अचानक येत नाहीत. खूप दिवस, अनेक आठवड्यांपासून किंवा अगदी वर्षांपासून जमा झालेल्या जुन्या ताणाचा शेवटचा स्फोट म्हणजे पॅनिक अटॅक असतो. तुम्हाला वाटू शकतं की, कामाची डेडलाईन पूर्ण करीत, बातम्या स्क्रोल करताना, रील्स बघताना किंवा मीटिंगमध्ये हसत-खेळत ताणाचे व्यवस्थापन करीत आहात. पण, आतून तुम्ही दररोज खचत राहता. हीच गोष्ट तुमचं स्नायू तंत्र (नर्व्हस सिस्टीम) नोंद ठेवत असते, ताण म्हणजे हळूहळू जळणारी आग आहे. तसेच घाबरटपणा तेव्हाच येतो जेव्हा हा ताण हाताबाहेर जातो आणि पॅनिक अटॅक येतो.
पॅनिक अटॅक कसा टाळावा ?
पॅनिक अटॅकदरम्यान श्वास घेण्यास त्रास होणे ही एक सामान्य समस्या आहे. पॅनिक अटॅक टाळण्यासाठी दीर्घ श्वास घ्या, दररोज व्यायाम करा. त्यामुळे शरीर आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळते, ज्यामुळे मनाला आराम मिळतो.
१. ४-७-८ थिअरी – ४ सेकंद श्वास घ्या, ७ सेकंद श्वास धरून ठेवा आणि ८ व्या सेकंदाला श्वास सोडा. त्यामुळे हृदयाची गती कमी होते आणि पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते.
२. थंड पाणी शिंपडा – तुमच्या चेहऱ्यावर बर्फाचे पाणी शिंपडा किंवा बर्फाचा तुकडा लावा. त्यामुळे शरीर वर्तमानात परत येते आणि मेंदूचे सिग्नल भीतीपासून करुणेकडे वळतात.
३. चाला – खोलीत थोडा वेळ चला. त्यामुळे ॲड्रेनालाईनची पातळी कमी होते आणि शरीराला स्थिर स्थितीतून बाहेर काढण्यास मदत होऊ शकते.
