Home Remedies For Good Sleep : दिवसभरातील ताणतणाव, थकवा आणि कामामुळे रात्री गादीवर पडताच शांत झोप येईल असेच आपण डोक्यात धरून चालतो. काहींना अगदी मोबाइल स्क्रोल करताना झोप लागते, तर काही जणांना रात्री झोपच येत नाही आणि आता ही समस्या सामान्य झाली आहे. पण, रात्री नीट झोप न आल्याने दिवसा चिडचिड होते, डोकं दुखतं आणि प्रचंड झोपसुद्धा येते, यामुळे संपूर्ण दिवस खराब जातो. पुरेशी झोप न मिळाल्याने आजारी पडल्यासारखेसुद्धा वाटते. तर तुम्हीही या समस्येने त्रस्त आहात का? मग आम्ही तुमच्यासाठी अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत, जेणेकरून डोळे बंद करताच तुम्हाला लगेच झोप येईल.

अ‍ॅनेस्थेसियोलॉजिस्ट आणि इंटरव्हेंशनल पेन मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर कुणाल सूद यांनी इन्स्टाग्रामवर झोप येण्यासाठी काय करावे यासाठी खास टिप्स शेअर केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये ते म्हणालेत की, झोप ही फक्त तुम्ही किती थकला आहात यावर अवलंबून नाही. तुमच्या शरीराला योग्य वेळी झोपण्यासाठी सिग्नल मिळाले पाहिजेत.

तर वेळेवर झोपेसाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी तुम्ही ‘या’ टिप्स फॉलो केल्या पाहिजेत….

१. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर प्रथम तुम्ही पलंगावर झोपा आणि चार सेकंद श्वास घ्या, नंतर सात सेकंद श्वास रोखून ठेवा. त्यानंतर आठ सेकंद श्वास घ्या आणि सोडा. थोड्याच वेळात तुम्हाला झोप येईल.

२. चांगल्या झोपेसाठी, झोपताना मोजे घाला. मोजे घातल्याने तुमचे पाय उबदार होतील. यामुळे तुमच्या मेंदूला शरीर थंड होण्यासाठी सिग्नल मिळतील, ज्यामुळे चांगली झोप येते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक कापसाचे मोजे घालून झोपतात ते ३२ मिनिटे जास्त झोपतात आणि रात्री कमी जागे होतात.

३. लव्हेंडर तेलाचा वास घेतल्यानेही चांगली झोप येण्यास मदत होते. लव्हेंडर तेलामध्ये काही संयुगे असतात, जी तुमच्या मेंदूशी भावनिकरित्या जोडली जातात. ११ क्लिनिकल चाचण्यांमध्ये असे आढळून आले आहे की, लव्हेंडर तेल लोकांच्या तणावाची पातळीसुद्धा कमी करते. हृदय गती, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळीदेखील कमी होते. जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही लव्हेंडर तेलदेखील वापरू शकता.