Benefits of Chewing Clove Daily: आजकाल आरोग्य टिकवण्यासाठी लोक किती काय करतात. पण, कधी कधी अगदी छोटासा आहारातील बदलही आयुष्य बदलून टाकतो. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी लवंग म्हणजेच ‘लवंग/लवंगा’ फक्त चविष्ट मसाला नाही, तर ती आहे एक औषधी गुणांचा खजिना. लवंगाचा स्वाद तिखटसर आणि सुगंध दाट असतो, त्यामुळे ती अनेक पदार्थांत वापरण्यात येते. परंतु, लवंग केवळ स्वयंपाकापुरती मर्यादित नाही, तर ती आरोग्यासाठी अमूल्य औषधही आहे. दररोज फक्त एक लवंग चघळली तरी शरीरावर इतका सकारात्मक परिणाम होतो की तुम्हालाच विश्वास बसणार नाही.

लवंग चघळल्याने होतात ‘असे’ आश्चर्यकारक फायदे

अँटिऑक्सिडंटचा खजिना

लवंगमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनॉलिक कंपाऊंड्स आणि युजेनॉलसारखे जबरदस्त अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील पेशींचे नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात, त्यामुळे शरीरातली सूज कमी होते आणि कॅन्सर, हृदयविकार, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्ससारख्या गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो.

संसर्गांपासून बचाव

लवंगमधील युजेनॉल हे घटक नैसर्गिक अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल आहे; त्यामुळे विविध प्रकारच्या जीवाणू-व्हायरसपासून संरक्षण मिळते. एका संशोधनात असेही दिसून आले की, लवंग तेलामुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते, म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्षम होते. विशेष म्हणजे लवंग तेलाने E. coli सारख्या फूड पॉइझनिंग करणाऱ्या जीवाणूंनाही नष्ट केले जाऊ शकते.

दातांसाठी वरदान

लवंग म्हटली की सर्वात आधी आठवते ती दातदुखी. लवंगात असलेले वेदनाशामक गुण दातदुखी कमी करतात, तोंडातील जीवाणूंचा नाश करतात आणि हिरड्यांचे आरोग्य टिकवतात, म्हणूनच टूथपेस्टपासून माउथवॉशपर्यंत अनेक उत्पादनांमध्ये लवंगाचा वापर केला जातो.

यकृत स्वच्छ ठेवते

सुक्या लवंगा यकृतासाठी म्हणजेच लिव्हरसाठी नैसर्गिक संरक्षक मानल्या जातात. युजेनॉल आणि थायमॉलसारखे घटक यकृतातील नवीन पेशी निर्माण करतात, डिटॉक्सिफिकेशन करतात आणि लिव्हर हेल्दी ठेवतात.

रक्तातील साखरेवर नियंत्रण

लवंगांमधील घटक इन्सुलिनसारखे कार्य करतात, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. विशेषतः टाईप २ डायबिटीस असलेल्या रुग्णांना नियमितपणे लवंग चघळल्यास रक्तातील ग्लुकोज, लिपिड्स आणि कोलेस्ट्रॉल यांचे प्रमाण संतुलित राहू शकते.

म्हणजेच, दिसायला साधी वाटणारी लवंग ही प्रत्यक्षात आरोग्याचा मोठा खजिना आहे. दररोज सकाळी एक-दोन लवंग चघळले तर शरीर निरोगी राहते, आजार दूर राहतात आणि रोगप्रतिकारशक्ती दुप्पट होते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)