Should You Eat Just Fruits To Lose Weight : उन्हाळा हा शक्य तितकी जास्त फळे खाण्यासाठी एक उत्तम ऋतू आहे. कलिंगडापासून ते आंब्यापर्यंत या ऋतूत थंड, रसाळ, ताजेतवानी फळे खाणे एक उत्तम नाश्ता ठरतो. कारण- त्यात पोषक घटक भरपूर असतात. तसेच अनेकांना असेही वाटते की, फळांचा आहार घेणे हा वजन कमी करण्याचा सर्वांत सोपा व जलद मार्ग आहे. पण, फक्त फळे खाल्ल्याने तुमचे वजन कमी होण्याऐवजी कसे वाढते हे समजून घेण्यासाठी ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
वजन कमी कारण्यासाठी फक्त फळे खावीत का?
पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्या मते, फळे खाण्यात काहीही गैर नाही. पण, जर तुम्ही दिवसभर फक्त फळे खाल्ली, तर तुमच्या ग्लुकोज व इन्सुलिनमध्ये वाढ होऊ शकते. त्याशिवाय तुमचे यकृत जास्त चरबी साठवेल. यामुळे तुम्हाला पोट भरलं आहे असे वाटेल. पण,सतत खाण्याची इच्छा सुद्धा निर्माण होईल.
… तर असं नेमकं का घडतं?
फळांमध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यांसारख्या नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, फळांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास चरबी साठवली जाऊ शकते. तसेच फळांमध्ये प्रथिने आणि निरोगी चरबीची कमतरता असते. त्यामुळे तुम्ही काहीच खाल्लं नाही असे तुम्हाला जाणवेल. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की, फळांचे रस पिणे योग्य आहे. तर तुम्ही इथेही चुकत आहात. तज्ज्ञ म्हणतात की, फळांचे रस साखर आणि कॅलरीजने भरलेले असतात आणि प्रक्रियेदरम्यान त्यांतील बहुतेक फायबर कमी होतात. त्यामुळे भूक नियंत्रित करण्याची आणि भूक कमी करण्याची त्यांची क्षमता कमी होते.
वजन कमी करायचे असेल, तर नेमके काय करावे?
वजन कमी करणे हे तुमचे ध्येय असेल, तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे संतुलित आहार घ्या. पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा सांगतात की, तुमच्या शरीराला सूक्ष्म पोषक घटकांचे मिश्रण आवश्यक आहे आणि त्यावर फक्त फळे खाणे हा उपाय नाही. त्याऐवजी तुमच्या शरीराला पोषण देण्यासाठी आणि तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहण्यासाठी तुमच्या आहारात सर्व अन्न गटांमधील पदार्थांचा समावेश करा.
मग फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
ग्लोबल हॉस्पिटल्स -मुंबई येथील सल्लागार आहारतज्ज्ञ डॉक्टर झमुरुद पटेल यांच्या मते, जेवणानंतर लगेच फळे खाणे टाळावे. कारण- त्यांचे योग्यरीत्या पचन होऊ शकत नाही. त्यामुळे फळांमधील पोषक घटकदेखील योग्यरीत्या शोषले जाऊ शकत नाहीत. जेवण आणि फळांच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला किमान ३० मिनिटांचे अंतर ठेवावे लागेल.
तज्ज्ञ पुढे म्हणतात की, फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्यानंतर असते. जर तुम्ही रिकाम्या पोटी फळे खाल्ली, तर ती तुमच्या शरीराला विषमुक्त करण्यास आणि वजन कमी करण्यासाठी व इतर दैनंदिन कामांसाठी ऊर्जा प्रदान करतील. त्यामुळे फळे सकाळी, नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यान आणि संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खावीत.
… तर वजन कमी करण्यास कोणती फळे उपयुक्त?
डॉक्टर गार्गी शर्मा यांनी वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात ज्या फळांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे, ती फळे खालीलप्रमाणे :
१. कलिंगड : या रसाळ फळात प्रति १०० ग्रॅम फक्त ३० कॅलरीज असतात. या फळात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, ते तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करून, चरबी जाळण्यास मदत करते.
२. पेरू : पेरूमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतो. ते चयापचयदेखील सक्रिय करतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
३. नाशपती : नाशपती व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध असते, जे पचन मंदावल्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले ठेवते.
४. संत्री : संत्री पोषक घटकांनी भरलेली असतात आणि कॅलरीज कमी असतात. त्यांच्यातील फायबरचे प्रमाण भूक कमी करण्यास मदत करते.
५. ब्लूबेरी : या लहान बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जी चयापचय वाढवतात. नियमित सेवनाने इन्सुलिन प्रतिरोध आणि कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.