How To Eat Rice Guilt Free : भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही, असे आपल्यातील अनेकांना वाटते. कारण- वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, करी, फ्राईज आणि इतर पदार्थांबरोबर भात खाण्याची मजा वेगळीच असते. पण, आता भातातील पोषक घटकांमुळे बरेच लोक भात खाण्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगू लागले आहेत. भातामुळे वजन वाढते, रक्तातील साखरेची पातळी वाढते, असा एक समज निर्माण झाला आहे.

पण, पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून एक हॅक शेअर केला आहे; जो तुम्हाला कोणत्याही अपराधी भावनेशिवाय भाताचे सेवन करायला मदत करणार आहेत. तर पोस्टमध्ये अंजली मुखर्जी यांनी भात शिजवण्याच्या आणि तो साठवून ठेवण्याच्या पद्धतीबद्दल आणि शरीरावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल माहिती दिली आहे.

सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी पोस्टमध्ये विचारले की, तुम्हाला माहीत आहे का की, उकडलेला भात थंड करून रात्रभर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानं भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो? तर उत्तर हो, असे आहे. म्हणजेच प्रतिरोधक स्टार्च (प्रतिरोधक स्टार्च) हा एक प्रकारचा स्टार्च आहे; जो भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यास मदत करतो, पचन होते, रक्तातील साखरेची अचानक वाढ होत नाही आणि भात कमी प्रमाणात खाल्ल्यास वजनही वाढत नाही. म्हणून पुढच्या वेळी भात तयार करताना पहिल्यांदा भात शिजवा → थंड करा → रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा → पुन्हा गरम करा आणि मग त्याचा आनंद घ्या” .

अपराधी भावनेशिवाय भात खाण्याच्या आणखीन टिप्स…

१. प्रमाणात भात खा – भातामध्ये भरपूर ऊर्जा असते. त्यामुळे तो जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात जास्त कॅलरीज निर्माण होऊ शकतात. रक्तातील साखरेची वाढ टाळण्यासाठी आणि मन तृप्त करण्यासाठी भाताचे प्रमाण नियंत्रित ठेवा आणि भाज्या, प्रथिनांसह त्याचे सेवन करा.

२. संपूर्ण धान्याची निवड करा – पांढऱ्या तांदळाऐवजी तपकिरी तांदूळ, लाल किंवा काळ्या तांदळाची निवड करा. त्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जी पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि ऊर्जेची पातळी स्थिर ठेवतात.

३. तेल आणि मीठ कमी वापरा – जास्त कॅलरीज वाढवणारे जड, तेलकट पदार्थ टाळा. त्याऐवजी भात वाफवून घ्या किंवा उकळा आणि चवीसाठी त्यात औषधी वनस्पती किंवा हलकेच मसाले घालून, सेवन करा.

४. प्रथिने आणि फायबर – भातामध्ये डाळी, कडधान्ये, कमी चरबीयुक्त मांस किंवा भाज्या यांचे मिश्रण करा. त्यामुळे पचनक्रिया मंदावते, साखरेचे प्रमाण कमी होते आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे संतुलित, अपराधी भावनेशिवाय भाताचे सेवन करता येते.