Risks To Eating Sprouts : आपल्यातील बऱ्याच जणांना कडधान्ये खायला आवडत नाहीत. पण, अनेक सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि पोस्टमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी आणि आरोग्यासाठी परफेक्ट मानले जाणारे स्प्राउट्स म्हणजेच मोड आलेल्या कडधान्ये तुम्हाला दिसतील. आता या कडधान्यांकडे हेल्दी पदार्थ म्हणून पहिले जाते. त्यामुळे बघता क्षणी आपल्याला “मी काहीतरी चांगलं आणि हेल्दी खातोय” असे वाटते.

पण, पोषणतज्ज्ञ खुशी छाब्रा सांगतात की, आपण स्प्राउट्स म्हणजेच मोड आलेली कडधान्य कशाप्रकारे बनवतो आणि खातो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. अपुरे पोषक तत्व, पचनाच्या समस्या, पोटफुगी, गॅस, बॅक्टेरियाचे धोके असे अनेक त्रास मोड आलेली कडधान्ये नकळत आपल्या शरीरात घेऊन येतात; ज्यांच्याकडे आपण अनेक वेळा दुर्लक्ष करतो.

तुम्ही चुकीच्या पद्धतीने मोड आलेली कडधान्ये तर खात नाही ना?

इन्स्टाग्रामवर, पोषणतज्ज्ञ खुशी यांनी मोड आलेली कडधान्ये खाताना सावधगिरी बाळगण्यास सांगून, “लक्षात ठेवा! फक्त हिरवं आणि कच्च खाणे महत्वाचे नाही तर संतुलित खाणे महत्वाचे आहे” असे आवर्जून कॅप्शनमध्ये म्हंटले आहे.

मोड आलेली कडधान्ये तुमच्या आतड्यांवर कसे परिणाम करतात?

आरोग्य पोषणतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक खुशी छाब्रा स्पष्ट करतात की, मोड आलेली कडधान्ये न्यूट्रीशन डेन्स अन्नांपैकी एक आहेत. कारण यामध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. पण, कच्चे खाल्ल्याने अनेक लोकांना पोटफुगी, गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मोड आलेली कडधान्ये पचण्यास कठीण जातात आणि न शिजवलेले खाल्ल्यास बॅक्टेरिया वाढू शकतात. त्याचबरोबर या कडधान्यांमध्ये फायबर, एंजाइम, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असले तरी, त्यांच्या कार्बोहायड्रेटचे प्रमाण (६० ते ६५) टक्के असते.

त्यामुळे त्यांचे जास्त सेवन करणे योग्य नाही. स्प्राउट्स म्हणजे उबदार आणि ओलसर वातावरणात मोड आलेली कडधान्ये. अशा परिस्थितीत जर ती नीट स्वच्छ ठेवली नाहीत; तर त्यामध्ये ई. कोलाईमी (E. coli) किंवा साल्मोनेला (Salmonella) सारखे जंतू वाढवू शकतात. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हे स्प्राउट्स आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.

मोड आलेली कडधान्ये योग्य पद्धतीने कशी खाल्ली पाहिजेत?

  • कडधान्ये कमी किंवा वाफेवर शिजवून घ्यावीत. उष्णतेमुळे त्यातील कठीण तंतू मऊ होतात आणि बॅक्टेरियाची संख्या कमी होतो.
  • ​​पचनास मदत करण्यासाठी आले, जिरे, काळी मिरी किंवा खडा मीठ त्यात घाला.
  • तुमच्यासाठी योग्य ते प्रमाण ठरवा. बहुतेक लोकांसाठी अर्धा ते एक कप कडधान्य पुरेसे असते.
  • प्रथिनांसाठी कडधान्ये फळे दही, पनीर किंवा अंडीसह मिक्स करून खा.
  • असे छोटे बदल पचनाचा त्रास कमी करताना पौष्टिक फायदे टिकवून ठेवण्यास मदत करतात.

अनेक जण असे गृहीत धरून चालतात की, कमी शिजवलेलं पदार्थ खाणे चांगले असते. पण, कच्चे अन्न पचण्यास कठीण जाऊ शकतात आणि बॅक्टेरीयाचा धोका वाढू शकतो. ही गोष्ट ज्यांना पचन किंवा आतड्यांच्या आरोग्य समस्या आहेत त्यांनी लक्षात ठेवली पाहिजेत.

मोड आलेली कडधान्ये जरी पौष्टिक असली तरी, आपण त्यांना कसे साठवतो, धुतो, त्याचे पदार्थ बनवतो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.स्प्राउट्स आपल्या आहारासाठी चांगले आहेत; पण जर तुम्ही त्याचे योग्य पद्धतीने सेवन केले तरच… तुम्हाला स्प्राउट्स खाल्यानंतर पोट फुगलेले वाटत असेल किंवा अस्वस्थता वाटली तर तुमच्या पोटाने कदाचित सिग्नल दिला आहे असे समजा. त्यामुळे कडधान्ये थोडीच शिजवून, प्रमाणावरच खा, आणि स्प्राउट्सना कोणतीही जादूची गोष्ट समजू नका.