Natural Ways to Reduce Uric Acid in the Body : बदलती जीवनशैली, चुकीच्या सवयी यामुळे आता कोणत्या वयात, कोणाला कोणता आजार होईल याबद्दल सांगणे खरोखर कठीण झाले आहे; त्यापैकी एक म्हणजे यूरिक अॅसिड हा आजार आहे. यूरिक अॅसिड हाय प्रोटीन असणा-या पदार्थांमधील प्यूरीनने तयार होते. त्यामुळे या रसायनाचे जास्त प्रमाण मूत्रपिंड आणि इतर अवयवांसाठी धोकादायक ठरू शकते.
तज्ज्ञांचा मते, ही स्थिती पूर्वी फक्त वृद्धांमध्ये दिसून यायची. यामुळे वृद्धांमध्ये सांधेदुखी, सूज आणि कडकपणा दिसू लागतो. पण, बदलत्या जीवनशैलीमुळे, मुले आणि तरुण प्रौढांनाही आता ही समस्या जाणवू लागली आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्येही यूरिक अॅसिडची पातळी वाढू शकते, ज्यामुळे त्यांना मोठे होताना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळीच लक्ष देणे महत्वाचे आहे.
जीवनशैली सुधारा – खराब जीवनशैलीचा मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. दरम्यान, कोविड-१९ महामारी आणि ऑनलाइन शिक्षणादरम्यान, मुले आणि तरुणांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. लठ्ठपणा युरिक अॅसिडच्या पातळीत वाढ होण्याचे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे शक्यतो मुलांना जेवताना टेलिव्हिजन, मोबाईल फोनपासून दूर ठेवा. त्यांना नियमित अंतराने फिरायला घेऊन जा, व्यायाम आणि योगा करण्यास प्रोत्साहित करा.
आहार महत्वाचा – आरोग्य तज्ज्ञांचा मते, यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करण्यात आहार महत्वाची भूमिका बजावतो. काही पदार्थांमध्ये प्युरिन आढळतात, त्यामुळे त्यांचे सेवन पूर्णपणे टाळावे. उदाहरणार्थ – राजमा, चणे, लाल मांस, सीफूड, ऑर्गन मीट आणि अल्कोहोलयुक्त पेये.
कोणते पदार्थ टाळले पाहिजेत?
आरोग्य तज्ज्ञांचा मते, जेव्हा शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढते; तेव्हा रुग्णांनी केचप, मिल्क चॉकलेट, बिस्किटे, केक, पेस्ट्री, टेट्रापॅक ज्यूस आणि चिप्ससह सर्व पॅकेज्ड फूड टाळले पाहिजेत. याव्यतिरिक्त, अल्कोहोल, बिअर, वोडका, फळांचा रस, सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा याचे देखील सेवन करू नये.
आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?
अक्रोड, संत्री, आवळा, लिंबू, केळी, चेरी, सफरचंद, कमी चरबीयुक्त दही, ताक, किवी, डाळिंब, पेरू यांचा आहारात समावेश केला पाहिजे.