Eggs and chicken for babies: पालकांना अनेकदा असा प्रश्न पडतो की, मुलांना अंडी किंवा मांसाहार द्यायला कधीपासून सुरूवात करावी. बरेच पालक अंडी किंवा मांसाहारी पदार्थ देण्यास हात आखडता घेतात. कारण ते हानिकारक असू शकतात असा त्यांचा अंदाज असतो. याबाबत तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, अंडी आणि चिकन ६ महिन्यांच्या वयापासून दिली जाऊ शकतात. सहा महिन्यांचे मुल असताना ज्यावेळी त्यांना पूरक आहार किंवा सॉलिड फूड द्यायला सुरूवात करतात. मात्र, याची सुरूवात करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मुलांना कोणत्या वयात आणि कोणत्या पद्धतीने अंडी किंवा चिकन देणे योग्य आहे याबाबत जाणून घेऊ…
लहान मुलांना अंडी कशाप्रकारे द्यावीत?
तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना कधीही कच्ची किंवा कमी शिजलेली अंडी देऊ नयेत, कारण यामुळे संसर्ग होऊ शकतो. मुलांना अंडी देण्याआधी ती व्यवस्थित शिजलेली आहेत याची खात्री करा. मुलांना उकडलेली अंडी, स्क्रम्बल्ड अंडी किंवा ऑम्लेट देऊ शकता. तसंच त्यांना काही अॅलर्जी आहे का ते पाहण्यासाठी सुरूवातीला कमी प्रमाणात अंडी द्या. जर अॅलर्जी वगैरे असं काही नसेल, तर हळूहळू प्रमाण वाढवा.
मुलांना चिकन कधीपासून आणि कसे द्यावे?
अंड्याप्रमाणे ६ महिन्यांनंतर तुमच्या बाळाला चिकन देऊ शकता. सुरूवात करण्यासाठी पूर्णपणे शिजवलेले, मऊ आणि चिकन सूप देणे अति उत्तम. हळूहळू जसे बाळाचे वय वाढेल आणि ते व्यवस्थित घास चावू शकेल अशावेळी चिकनचे छोटे मऊ तुकडे देऊ शकता. लहान मुलांना चिकन देताना त्यात हाडे नसतील आणि ते पूर्णपणे शिजवले गेले आहे याची खात्री करून घ्या.
लहान मुलांना अंडी आणि चिकन देण्याचे फायदे
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अंडी आणि चिकन दोन्ही मुलांसाठी सुपरफूड आहेत. त्यात असलेली प्रथिने, लोह, जस्त आणि व्हिटॅमिन बी १२ हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहेत. शिवाय, अंडी आणि चिकन एक वर्षाच्या आधी मुलांना देऊ नये हा गैरसमज आहे. योग्यरित्या शिजवल्यास आणि कमी प्रमाणापासून सुरूवात केल्यास ते पूर्णपणे सुरक्षित आणि मुलांसाठी फायदेशीर असतात.
