Ragi vs Jowar Vs Wheat Roti Which Is The Healthiest : काही जणांना जेवणात आवर्जून भात लागतो; तर अनेक जण पोळी-भाजी खाण्याला प्राधान्य देतात. पोळीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. त्यामुळे भारतीयांच्या आहारात आवर्जून पोळी ही असतेच. पण, तुम्हाला माहीत आहे का की, प्रत्येक प्रकारच्या पोळी आणि भाकरीमध्ये स्वतःचे वेगळे आरोग्यदायी फायदे लपलेले असतात. त्यामुळे कोणती भाकरी आणि पोळी खायची याबद्दल योग्य निर्णय घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यापासून ते पचनक्रियेला मदत करण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये तुमच्या शरीराला मदत मिळू शकते.

दिल्लीतील वसंत कुंज येथील फोर्टिस हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व हेपॅटोलॉजिस्ट डॉक्टर शुभम वात्स्य यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर विविध प्रकारच्या भाकरी आणि पोळीचे शरीराला होणारे फायदे शेअर केले आहेत.

पोळीचे सेवन करावे की नाही?

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत डॉक्टर शुभम म्हणतात, “अनेक आरोग्य तज्ज्ञ तुम्हाला भाकरी किंवा पोळ्या खाणे बंद करा, असे म्हणताना दिसतात. पण, भारतीय जेवणाचा हा महत्त्वाचा भाग सोडून देणे योग्य नाही. कारण- बहुतेक लोक नियमितपणे गव्हाची पोळी खातात. गव्हाच्या पोळीमुळे कधी कधी रक्तातील साखर वाढू शकते आणि वजन वाढण्यास ती कारणीभूत ठरू शकते.

पण, मधुमेहासाठी ज्वारी, हाडांच्या मजबुतीसाठी नाचणी व प्रथिनांसाठी बाजरीपर्यंत, तर हृदयाच्या आरोग्यासाठी ओट्सच्या पिठाची पोळी आदी प्रत्येक भाकरी वा पोळी वेगवेगळ्या प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर तुमच्या आरोग्यासाठी योग्य अशी पोळी वा भाकरी निवडा.

तर तुमच्या आरोग्यासाठी कोणती भाकरी ठरेल योग्य?

ज्वारीची भाकरी – मधुमेह असलेल्या किंवा वजनाबद्दल काळजी करणाऱ्या लोकांसाठी ज्वारीची भाकरी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात कॅलरीज कमी असतात, ग्लुटेन नसते आणि भरपूर फायबर असते, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.

बाजरीची भाकरी – बाजरीच्या भाकरीमध्ये लोह, फायबर, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात; ज्यामुळे मधुमेहींसाठी तसेच वजन कमी करणे किंवा स्नायू तयार करण्यासाठी मदत करतात.

नाचणीची भाकरी – नाचणीच्या भाकरीमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढायला मदत होते.

ओट्सची पोळी – ओट्सच्या पिठाच्या पोळीमध्ये फायबर आणि बीटा-ग्लुकन असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.