Bedtime Snacks For Sleep : सध्या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत आपण या इलेक्ट्रॉनिक साधनांचा इतका वापर करू लागलो आहोत की, यांचा झोपेवर खूप परिणाम होऊ लागला आहे. यामधून येणारा प्रकाश मेंदूला अजूनही दिवस आहे असा संकेत देतो, म्हणूनच झोपेच्या काही वेळ आधीपासून यांचा वापर टाळावा. यांच्या अतिवापराने मग निद्रानाशाचा त्रास होत असल्याचे दिसून येते.

बहुतेक लोकांना रात्रीच्या वेळी निद्रानाशाचा त्रास होतो. निद्रानाश अनेकदा ताणतणाव, चुकीची जीवनशैली किंवा अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींमुळे होतो. जर तुम्हालाही निद्रानाशाचा त्रास होत असेल, तर आम्ही तुम्हाला रात्री गाढ झोप घेण्यास मदत करण्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत; ज्याची तुम्हाला कदाचित मदत होऊ शकेल.

रात्री झोप येत नाही?

काही ड्रायफ्रूट्स किंवा सुकामेवा खाऊन तुम्ही निद्रानाशाच्या समस्येपासून स्वतःची सुटका करू शकता. यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्तादेखील सुधारेल. त्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असलेले अनेक पोषक घटकदेखील असतात. ते खाल्ल्याने मन शांत होते, ज्यामुळे चांगली झोप येते; तर नक्की हे ड्रायफ्रूट्स कोणते, चला जाणून घेऊयात…

झोप येण्यासाठी काय खावे?

बदाम – रात्री चांगली झोप येण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी बदाम खाऊ शकता. बदामांमध्ये मॅग्नेशियम असते, जे स्नायूंना आराम देतात, यामुळे चांगली झोप लागते. बदाम खाल्ल्याने मेलाटोनिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे झोप लक्षणीयरीत्या सुधारते.

अक्रोड – अक्रोड खाल्ल्याने झोप सुधारण्यास मदत होते. त्यात मेलाटोनिन, ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात; ज्यामुळे मन शांत होते, झोपेचे चक्र सुधारते, त्यामुळे झोपण्यापूर्वी तुम्ही दोन ते तीन अक्रोड खाऊ शकता.

खजूर – खजुरांमध्ये नैसर्गिक साखर आणि पोटॅशियम असते, जे मनाला शांत करते आणि ऊर्जा देते. यामुळे थकवा दूर होतो, शरीराला आराम मिळतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी तुम्ही दोन ते तीन खजूर खाऊ शकता.