What Is The Best Breakfast To Eat In The Morning : सकाळचा नाश्ता दिवसभरासाठी ऊर्जा देणारा पहिला आहार. म्हणून या सकाळच्या नाश्त्यात आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असणे गरजेचे असते. प्रथिने, आरोग्यदायी चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे व कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे आणखीन फायदेशीर ठरू शकते. हेच लक्षात घेऊन, आहारतज्ज्ञ व पोषण तज्ज्ञ अनेकदा संतुलित आणि आरोग्यदायी नाश्ता करण्याचा सल्ला देतात.
आरोग्यदायी नाश्त्यामध्ये केळी आणि अॅव्होकॅडो या फळांचासुद्धा समावेश होतो. ही फळे स्वादिष्टच नाहीत, तर शरीराला ऊर्जा, तंतुमयता, जीवनसत्त्वे व खनिजेदेखील प्रदान करतात. त्यामुळे पोषणतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्या मते, तुमचा नाश्ता आरोग्यदायी करण्यासाठी त्यात फळांचा समावेश करणे हा एक चांगला मार्ग आहे. तर केळी, अॅव्होकॅडो टोस्ट, स्मूदी, ओटमिल आदींचा तुम्ही इतर आहारामध्ये अगदी सहज समावेश करू शकता.
चला तर मग या बातमीतून आपण अॅव्होकॅडो आणि केळीच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेऊयात…
ॲव्होकॅडोचे पौष्टिक मूल्य – युनायटेड स्टेट्स शेती विभाग हा अमेरिकेतील सरकारी विभाग आहे, जो अन्न, शेती, पोषण आणि संबंधित डेटा यांवर काम करतो. तर त्यांच्या विश्लेषणानुसार, १०० ग्रॅम अॅव्होकॅडोमध्ये १६० कॅलरीज, १४.६६ फॅट्स, २.१३ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स, ० कोलेस्ट्रॉल, ७ मिलिग्रॅम सोडियम, ८.५३ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ६.७ ग्रॅम फायबर, २ ग्रॅम प्रथिने व ४८५ मिलिग्रॅम पोटॅशियम असते. अॅव्होकॅडोमध्ये अंदाजे ८० टक्के पाणी आणि फायबर असते; ज्यामुळे त्यात साखरेचे प्रमाण कमी असते. पण, ॲव्होकॅडो आरोग्यदायी चरबी, जीवनसत्त्वे ई व के, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांचा चांगला स्रोत आहेत.
ॲव्होकॅडोचे फायदे – अॅव्होकॅडो वजन कमी करण्यासाठी अत्यंत चांगले फळ आहे. त्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. ॲव्होकॅडोमध्ये असणारी आरोग्यदायी चरबी हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. ती पोषक तत्त्वांचे शोषणदेखील वाढवते आणि एकूण आरोग्य सुधारते.
केळीचे पौष्टिक मूल्य – युनायटेड स्टेट्सच्या शेती विभागानुसार, १०० ग्रॅम पिकलेल्या केळ्यामध्ये ८९ कॅलरीज, ०.३३ ग्रॅम एकूण चरबी, ० कोलेस्ट्रॉल, १ मिलिग्रॅम सोडियम, २२.८ ग्रॅम कार्बोहायड्रेट, २.६ ग्रॅम फायबर, १.०९ ग्रॅम प्रथिने व ३५८ मिलिग्रॅम पोटॅशियम असते. केळ्यामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज व सुक्रोज यांसारख्या नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते.
नाश्त्याला केळी खाण्याचे फायदे – केळी हे जवळजवळ वर्षभर उपलब्ध असलेले फळ असून, ते पचायला सोपे आहे. हे फळ पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६ व फायबरचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे दररोज सकाळी रिकाम्या पोटी केळे खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि शरीराला ऊर्जासुद्धा मिळते.
मग आता राहिला प्रश्न की, या दोन्ही फळांमध्ये कोणते उत्तम आहे?
तर तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही व्यायामशाळेत जात असाल किंवा व्यायामापूर्वी हलके आणि सहज पचणारे काहीतरी तुम्हाला खायचे असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी केळी खा. केळ्यामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज व सुक्रोज यांनी युक्त नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. तसेच जर तुम्हाला दिवसभर ऊर्जा आणि हृदय सुस्थितीत ठेवायचे असेल, तर तुमच्या नाश्त्यात अॅव्होकॅडोचा समावेश करा. तज्ज्ञ म्हणतात की, दोन्ही फळे एकत्र खाणे हे तर सगळ्यात उत्तम आहे.