Health Benefits Of Eating Papaya Every Day : दिवसभराच्या कामानंतर आपल्यापैकी बहुतेकांना जेवणातून हलके आणि आरामदायी असे काहीतरी हवे असते. पार्टी किंवा वीकेंडनंतर जड मिष्टान्न किंवा स्नॅक्सचे तळलेले पदार्थ तुम्हाला थकवू शकतात; परंतु काही फळे तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि तुम्हाला त्वरित फायदे देऊ शकतात. असाच एक पर्याय म्हणजे पपई हे गोड चवीचे उष्ण कटिबंधीय फळ, जे तुम्हाला केवळ ताजेतवानेच करीत नाही, तर तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनीदेखील समृद्ध करते. झोपण्यापूर्वी पपई खाल्ल्याने तुमचे अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होऊ शकते आणि तुमच्या शरीराला विश्रांती मिळू शकते. चला, तर मग जाणून घेऊयात पपई खाण्याचे दैनंदिन फायदे.

रात्री पपई पचनक्रिया आणि वजन कमी करण्यास कशी मदत करते?

पपई हे अशा फळांपैकी एक आहे, जे पचनक्रियेच्या आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते. पपई रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी खाल्ल्यास, त्याचे नैसर्गिक रेचक गुणधर्म पोटाला आराम देतात. २०२३ च्या एका संशोधनानुसार, पपईमध्ये पपेन असते, जे प्रथिने प्रभावीपणे तोडण्यास मदत करणारे एंझाइम आहे. ते विशेषतः जड जेवणानंतर किंवा पोटात अस्वस्थता जाणवत असल्यास उपयुक्त ठरू शकते. पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे प्रति १०० ग्रॅम १.७ ग्रॅम असते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर करू शकते. रात्री पपई खाल्ल्याने तुमच्या पोटाला हलकासा धक्का बसतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पचनक्रिया सुरळीत होते.

पपई वजन कमी करण्यास मदत करू शकते का?
पपई वजन कमी करण्यास मदत करते का?

USDA नुसार, १५२ ग्रॅमच्या एका लहान पपईमध्ये फक्त ६८ कॅलरीज असतात, ज्यामुळे ते कमी कॅलरीज असलेले एक उत्तम फळ आहे. जेवणादरम्यान किंवा रात्रीच्या जेवणाला हा हलकासा उपयुक्त पर्याय आहे. पपईमधील उच्च फायबर आणि पाण्याचे प्रमाण शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते, पोटफुगी कमी करते आणि जास्त काळ तुमचे पोट भरलेले ठेवते. जर तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा झाली असेल, तर एक लहान वाटीभर पपई अतिरिक्त कॅलरीज न वाढवताही तुमची इच्छा पूर्ण करू शकते.

रात्री पपई खाण्याचा सर्वोत्तम मार्ग

जर तुम्हाला पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी रात्री पपई कशी खावी, असा प्रश्न पडत असेल, तर येथे काही टिप्स आहेत

रात्रीच्या जेवणानंतर सुमारे ३०-६० मिनिटांनी एक लहान वाटी (१ कप) ताजी कापलेली पपई खा.

साध्या कापलेल्या पपईत साखर किंवा क्रीम घालू नका.

पोषक तत्त्वे वाढवण्यासाठी त्यात काही भिजवलेले बदाम किंवा अक्रोड मिसळा.

रात्री पपई खाण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

पपई आरोग्यदायी असली तरी तिचे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमचे पोट संवेदनशील असेल, तर रात्री जास्त प्रमाणात पपई खाणे टाळा. कारण- त्यामुळे पोट फुगू शकते. फक्त एक कप खा. पपई दुधासोबत जोडून खाऊ नका. आयुर्वेदिक आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, दूध आणि फळांचे मिश्रण पचण्यास कठीण असू शकते. शिजवलेल्या जेवणापेक्षा फळे लवकर पचत असल्याने रात्रीच्या जेवणानंतर लगेच पपई न खाता, किमान एक तासाचे अंतर ठेवा.

दररोज पपई खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे

फक्त रात्रीच नाही, तर दररोज एक वाटी पपई खाणे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

१. रोगप्रतिकार शक्ती वाढवते – २०२२ च्या एका संशोधन पत्रानुसार, पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

२. त्वचेच्या आरोग्यास समर्थन देते – पपईतील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे अ व क निरोगी त्वचेला प्रोत्साहन देतात, बारीक रेषा व सुरकुत्या कमी करतात. नियमित सेवनाने लवचिकतादेखील सुधारू शकते आणि त्वचेला तेजस्वी चमक मिळू शकते.

३. रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते – पपईतील पोटॅशियमचे प्रमाण रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. शरीरातील सोडियमची पातळी संतुलित करून, पपई रक्तवाहिन्यांच्या निरोगी कार्यासदेखील मदत करते.

४. डोळ्यांच्या आरोग्यास समर्थन देते – पपईतील व्हिटॅमिन एचे प्रमाण डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करते आणि वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशन रोखू शकते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात, ज्यामुळे डोळ्यांचे एकूण आरोग्य आणि दृष्टी सुधारते.

५. दाहकविरोधी प्रभाव – २०२२ च्या एका संशोधन पत्रात असे दिसून आले आहे की, पपईमध्ये दाहकविरोधी संयुगे असतात, जी दाह कमी करू शकतात आणि संधिवातासारख्या स्थितीची लक्षणे कमी करू शकतात.

पारंपरिक औषधांमध्ये पपई | आयुर्वेद आणि घरगुती उपचार

आयुर्वेदात शतकानुशतके पपईचे महत्त्व विशद करून सांगितलेले आहे. पपईला नैसर्गिक पचनास मदत करणारे फळ म्हणून महत्त्व आहे. त्यातील फायबर आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते. पचन आणि चयापचयाशी जोडलेले पित्तदोष संतुलित करण्यासाठी आयुर्वेद पिकलेल्या पपईची शिफारस करतो. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या फेस मास्कसाठी पपईचा लगदा वापरला जातो; तर कधी कधी पपईच्या बियाही आतड्यांतील जंत दूर करण्यासाठी वापरल्या जातात.