चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास असणाऱ्या वृक्षांची कत्तल, मोबाईल टॉवर यामुळे शहरी भागात चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. गेल्या काही वर्षांत शहरातूनच नव्हे, तर गावातूनही तिचे अस्तित्त्व नाहीसे होऊ लागले आहे. त्यामुळे ठिकाठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेऊन चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार केली आहेत. नुकत्याचं केलेल्या संशोधनानुसार या घरट्यांचा वापर चिमण्या मोठ्या प्रमाणात करत असून ही कृत्रिम घरटी चिमण्यांनी स्विकारली असल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनविभाग आणि इला फांउडेशनतर्फे करण्यात आलेल्या संशोधनानुसार चिमण्यांनी आपला कृत्रिम अधिवास स्विकारला आहे . जून २०१७ ते फेब्रुवारीपर्यंत केलेल्या संशोधनात कृत्रिम घरट्यांचा वापर चिमण्या प्रजननासाठी करत असल्याचं समोर आलं आहे. विशिष्ट प्रकारचे लाकूड आणि कागदाचा लगदा वापरून तयार करण्यात आलेली कृत्रिम घरटी या संस्थेनं पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातल्या १२ शहरांत बसवली. यातल्या ३९० कृत्रिम घरट्यांचा अभ्यास करण्यात आला. यातून जवळपास ८४ टक्के चिमण्यांनी ही कृत्रिम घरटी स्विकारली असल्याची माहिती इला फांउडेशनचे संस्थापक सतीश पांडे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. कृत्रिम घरट्यांत प्रजनन करण्याचा प्रयत्न चिमण्यांनी केला असून ७२% घरट्यात प्रजनन यशस्वी झालं असल्याची माहितीही त्यांनी दिली.

भारतात एकूण सात प्रकारच्या चिमण्या आढळतात. त्यातली ‘हाऊस स्पॅरो’ही सर्वत्रच आढळते. भारताव्यतिरिक्त भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशांत चिमणी आढळते. घरटं बांधण्यासाठी गवत आणि इतर काडीकचरा चिमण्यांना मिळेनसा झाल्याने सिमेंटच्या घरातील वीज मोजणाऱ्या यंत्रावर किंवा सिमेंटच्या पानावर, असा कुठेतरी चिमण्या आसरा घेतात. तेथील तापमान त्यांना सहन होत नाही आणि झाले तरी उंचावरून पिले पडून बरेचदा मृत्युमुखी पडतात. त्याशिवाय भ्रमणध्वनीच्या मनोऱ्यातून निघणाऱ्या किरणांमुळे चिमण्यांचं अस्तित्त्व धोक्यात आलं आहे. तसेच रासायनिक प्रक्रियेतून जाणाऱ्या अन्नधान्याचाही चिमण्यांवर विपरीत परिणाम होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World sparrow day 2018 artificial nests see high acceptance
First published on: 20-03-2018 at 11:48 IST