टू व्हीलर तयार करणारी कंपनी YAMAHA ने नुकतीच एक अनोखी स्कूटर तयार केली. ही स्कुटर दुचाकी नाही तर तीन चाकी आहे. कंपनीनं याचं नाव Tricity300 असं ठेवलं आहे. यामध्ये पुढील बाजूला दोन चाकं देण्यात आली आहेत. अर्बन मोबिलिटीला ध्यानात घेत कंपनीनं ही स्कूटर डिझाईन केली आहे. टोक्योमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टोक्यो मोटर शो २०१९ मध्ये ही स्कूटर कंपनीनं पहिल्यांदा लाँच केली. 3CT कॉन्सेप्टवर ही स्कूटर तयार करण्यात आली असून अद्याप कंपनीकडून या स्कुटरच्या किंमतीबाबत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत अधिकृत माहिती दिली नाही.
या स्कुटरमध्ये २९२ सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन लिक्विड कूल्ड, ४ स्ट्रोक, ४ व्हॉल्व्ह, सिंगल सिलिंडर एसओएचसी टाईप इंजिन असणार आहे. तसंच या स्कुटरचं एकूण वजन २३९ किलो असेल. तसंच याची फ्युअल टँक क्षमता १३ लीटरची असेल. ही स्कुटर तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल, अशी माहितीही समोर आली आहे. ट्रायसिटी फॅमिलीची सर्वात हलकी स्कुटर असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
लांबच्या प्रवासासाठी आणि हायवेवर चालवण्यासाठी ही स्कुटर उत्तम मानली जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार EICMA 2019 कंपनी या स्कुटरची स्पेसिफिकेशन्स आणि त्याची किंमत जाहीर करू शकते. तसंच या स्कुटरचा एक व्हिडीओदेखली कंपनीने आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे. नोव्हेबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही स्कुटर युरोपियन बाजारात लाँच करण्यात येणार आहे. परंतु भारतात ही स्कुटर केव्हा लाँच होईल याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही.