News Flash

त्रास प्रदूषणाचा!

मुंबईत देवनारमधील कचरा डेपोला नुकत्याच लागलेल्या आगीच्या पाश्र्वभूमीवर हवेची गुणवत्ता चांगलीच घसरली.

मुंबईत देवनारमधील कचरा डेपोला नुकत्याच लागलेल्या आगीच्या पाश्र्वभूमीवर हवेची गुणवत्ता चांगलीच घसरली. ज्यांना मुळातच श्वसनमार्गाशी संबंधित काही आजार आहेत त्यांनी आणि इतरांनीही प्रदूषित हवेत काळजी घ्यावी, असा इशाराही दिला गेला. केवळ मुंबईच नव्हे, तर सगळीकडेच आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या हवा प्रदूषणाला रोज सामोरे जावे लागते. यात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा अनेकदा सर्वाधिक असतो. आज हवा प्रदूषणाच्या आरोग्यावरील परिणामांविषयी जाणून घेऊ या-

धूर अन् धूळ
’ रोजच्या जगण्यात आपल्याला वाहनांचा धूर, रस्त्यावरील धूळ आणि तत्सम प्रदूषणाचा रोज सामना करावा लागतो. कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू प्रदूषणाचा एक प्रमुख भाग. श्वसनमार्गाद्वारेच हा वायू शोषला जातो आणि रक्तात त्याचे प्रमाण अधिक झाल्यास हिमोग्लोबिनच्या कार्यात त्यामुळे बिघाड होऊ शकतो. हिमोग्लोबिनचे खरे काम म्हणजे शरीरात ऑक्सिजन पोहोचवणे आणि शरीरातील कार्बन डाय ऑक्साईड बाहेर टाकायला मदत करणे. हे काम नीट न झाल्यामुळे पेशींमधील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे सतत डोके दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, खूप दीर्घ श्वास घ्यावा लागणे असे त्रास होऊ शकतात. सल्फरसारख्या वायूमुळेही श्वासनलिका व फुप्फुसाचे अस्तर खराब होते आणि त्यातून ऑक्सिजनची देवाणघेवाण होण्यात अडथळे यायला लागतात.
hlt02’ कारखान्यांच्या धुरामधून कार्बनचे कण श्वासनलिकेत जाऊन चिकटून बसतात आणि ते काढता येत नाहीत. त्यामुळे ऑक्सिजनची देवाणघेवाण तर मंदावतेच, पण त्या अडकून राहिलेल्या कार्बन कणांच्या विरोधात शरीराची प्रतिकारशक्ती सतत प्रयत्न करत राहते. यातून पुढे फुप्फुसाचे आकुंचन व प्रसरण पावणे नीट होत नाही आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. फुप्फुसात म्यूकस नावाचा स्राव सतत तयार होत असतो. या म्यूकसमध्ये आगंतुक कण अडकत असतात व तो स्राव घशात येऊन आपण नकळत तो गिळत असतो. पण म्यूकस स्राव घट्ट होऊन आतच साचून राहिला तर त्यात जंतूसंसर्ग होऊ शकतो. या तक्रारी सुरू होतात आणि फुप्फुस हळूहळू खराब होऊ लागते.
* कार्बनचे कण (कोल टार) आणि प्रदूषक वायूंमुळे नाक चोंदल्याची भावना होणे, वास नीट न समजणे, नाक बंद राहिल्याने कामात लक्ष न लागणे, चिडचिडेपणा अशा समस्या उद्भवतात.

अ‍ॅलर्जी म्हणजे काय?

शरीराची प्रतिकारशक्ती म्हणजे बाहेरून अनाहूतपणे शरीरात जाणाऱ्या पदार्थासाठी शरीराचा प्रतिसाद असे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. हा प्रतिसाद जेव्हा प्रमाणाबाहेर असतो तेव्हा त्याला ‘अ‍ॅलर्जी’ म्हणता येईल. नाकात धुलीकण गेल्यावर एखादी शिंक येणे, नाकातून थोडेसे पाणी येणे, नाक बंद वाटणे हे साहजिक आहे. पण दोन-तीन तास सारख्या शिंका, नाकातून पाणी वाहणे सुरूच राहिले तर ती अ‍ॅलर्जी. प्रत्येक अवयवानुसार अ‍ॅलर्जीची लक्षणे वेगळी असू शकतात. नाकासंबंधीच्या अ‍ॅलर्जीत वर म्हटल्याप्रमाणे शिंका, नाकातून पाणी येणे, नाक बंद वाटणे, खाजणे, कोरडा खोकला येणे, नाकाबरोबर घशात, डोळ्यांत खाज येणे ही लक्षणे दिसतात. श्वासनलिकेच्या वा फुप्फुसांविषयीच्या अ‍ॅलर्जीत खूप खोकला येणे, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. नाकातून श्वासनलिकेमार्फत फुप्फुसापर्यंत जाणारा मार्ग एकच असतो. त्यामुळे नाकात अ‍ॅलर्जी झाली तर त्याला नाकाबरोबरच छातीच्या अ‍ॅलर्जीचाही त्रास होऊ शकतो.

प्रदूषणाची अ‍ॅलर्जी

अ‍ॅलर्जीत ठरावीक ऋतूंमध्ये होणारी अ‍ॅलर्जी आणि वर्षभर होणारी अ‍ॅलर्जी असे दोन प्रकार आहेत. प्रदूषणात समाविष्ट असलेल्या विविध वायूंच्या विरोधात किंवा धुळीविरोधात होणारी अ‍ॅलर्जी ही वार्षिक स्वरूपाची असते. ही धूर आणि धुळीची अ‍ॅलर्जी हल्ली मोठय़ा प्रमाणावर दिसते. मोठय़ा शहरांमध्ये दररोज व सातत्याने वाहनांच्या व इतर प्रदूषणात फिरणे अनेकांना भाग पडत असल्यामुळे त्यासाठी संवेदनशील असलेल्या व्यक्तींना वर्षभर कमी-अधिक प्रमाणात अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.

प्रतिबंध कसा करता येईल?

*मुळात प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.
* वैयक्तिक पातळीवर प्रदूषणाचा फारच त्रास होत असल्याचे लक्षात आल्यास प्रदूषण सर्वाधिक असतानाच्या काळात शक्यतो बाहेर जाणे टाळावे.
* बाहेर फिरताना चांगल्या दर्जाचे मास्क वा हेल्मेट घालून वा रोज स्वच्छ धुतलेले फडके नाकावर बांधून फायदा होतो.
* काही व्यवसायच असे असतात की त्यातील लोकांना अगदी सातत्याने प्रदूषणाला सामोरे जावे लागते. या लोकांनी कटाक्षाने प्रदूषणाविरोधात काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी घेऊनही म्हणावा तसा फायदा होत नसल्यास अशा व्यक्तींना व्यवसायात बदल करण्यासही सुचवले जाते.
* प्रदूषणाची व धुळीची अ‍ॅलर्जी असलेल्यांना विशिष्ट उपचारांद्वारे प्रतिकारशक्तीचा अ‍ॅलर्जिक प्रतिसाद नियंत्रित करण्याची हळूहळू सवय करता येऊ शकते.
* रोगप्रतिकारशक्तीचे कार्य योग्य चालावे यासाठी अर्थातच जीवनशैलीत सुसंगत बदल करून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे गरजेचे आहे.
– डॉ. निखिल गोखले, कान-नाक-घसातज्ज्ञ (शब्दांकन- संपदा सोवनी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2016 3:33 am

Web Title: pollution troubles
टॅग : Pollution
Next Stories
1 राहा फिट! : आहार परीक्षाग्रस्तांचा
2 प्रकृ‘ती’ : संप्रेरकामुळे अतिरक्तस्राव
3 आयुर्मात्रा : उन्हाळय़ातील पेये
Just Now!
X