तोंडाचे आरोग्य हा आपल्याकडचा दुलक्र्षित विषय. पाठय़पुस्तकातून कितीही शिकलो तरी दोन वेळा दात घासणे आपल्याला त्रासदायकच वाटते. लहान मुले मोठय़ांचेच अनुकरण करत असल्याने आणि त्यातच जंक फूड, गोड पेयाचे प्रमाण वाढल्याने पुढच्या पिढीतील दातांच्या समस्या अधिक वाढताना दिसताहेत. दात झिजून असह्य़ वेदनांना सामोरे जायचे नसले तर प्रतिबंधात्मक उपायांकडे लक्ष द्यायला हवे. उद्या म्हणजेच २० मार्च रोजी जागतिक मुखारोग्य दिन आहे.
त्यानिमित्त दंतपंक्तींच्या आरोग्याविषयी..
मुखाचे आरोग्य हा तसा गंभीर पण अनेक वर्ष दुर्लक्षिला गेलेला मुद्दा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मुखाचे आरोग्य हा केवळ दात किंवा तोंडाच्या वासापुरता मर्यादित विषय नाही. तोंडामधील कोणतीही वेदना, तोंडाचा किंवा घशाचा कर्करोग, तोंडामधील जखमा, जन्मजात व्यंग, हिरडय़ा दुखणे, दातांचे झिडणे, दात पडणे आणि दातांमध्ये पोकळी निर्माण करण्यास कारणीभूत ठरणारे आजार या सगळ्यांचा मुखाच्या आरोग्याशी संबंध आहे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच मुखाचेही आरोग्य महत्त्वाचे आहे.
देशातील प्रत्येकालाच कधी ना कधी मुखारोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातही दातांचे प्रश्न ही मोठी समस्या आहे. यासाठी कारणीभूत ठरते ते दातांवरील प्लाक. जीवाणू, अन्नकण, अनेक दिवस दातात राहिलेले अन्न तसेच जिवाणूंनी अन्नकणावर केलेल्या प्रक्रियेने तयार झालेल्या आम्लामुळे हे प्लाक तयार होते. दात व हिरडय़ांवरील प्लाकचे हे आवरण नियमितपणे व्यवस्थित काढले नाही तर जिवाणूंमुळे तयार झालेल्या आम्लात दात झिजायला सुरुवात होते. मुखाच्या आरोग्याविषयी आता जागृती होत असली तरी आजही ग्रामीण भागातील बहुतांश लोकांच्या दातांच्या समस्या माहितीच्या अभावामुळे होतात. तर दातांच्या उपचारांच्या वाढलेल्या खर्चामुळे शहरातील लोक दातांच्या समस्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत दंतवैद्याकडे जाणे लांबणीवर टाकतात. अमेरिका तसेच चीनप्रमाणे दातांचा आरोग्यविमा काढता येत नसल्याने असह्य़ त्रास होईपर्यंत लोक दातांवर खर्च करत नाहीत.
मुखारोग्याच्या समस्या सर्वच वयोगटात आढळतात. मात्र त्यातही लहान मुलांमध्ये तोंडामधील समस्या जास्त असतात. इंडियन डेंटल असोसिएशनने नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय पाहणीत १५ वर्षांखालील तब्बल ७० टक्के मुलांना हिरडय़ांची दुखणी आहेत. या पाहणीत चार लाख मुलांची पाहणी करण्यात आली. त्यातील ४० टक्के मुलांचे दात ओळीत नाही. दात वेडेवाकडे येत असलेल्या मुलांसोबतच दात झिजण्याची समस्याही वाढत असल्याचे या वेळी दिसून आले. आमच्या फोर्टिस रुग्णालयाकडून गेल्या पाच वर्षांत विविध शाळांमधील घेतलेल्या शिबिरांमध्येही वेडेवाकडे आलेले दात, दातांमधील पोकळी, वास आणि अस्वच्छ दात या सर्वसामान्य समस्या दिसल्या.
मुलांमधील मुखाच्या ७० टक्के समस्या या जंक फूड, गोड पेय आणि दात घासण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होतात. बदलत्या जीवनशैलीमुळे जंक फूडचे प्रमाण वाढत आहे. कॅण्डी, चिप्स, कूकीज, फ्रेन्च फ्राइज, बर्गर्स, पिझ्झा, काबरेनेटेड पेय या खाद्यपदार्थामुळे दात दुखणे, हिरडय़ा दुखणे, दुधाचे दात पडणे आणि कायमस्वरूपी दातांची झीज अशा समस्या होतात. वेडेवाकडे दात नीट करण्यासाठी तसेच दातांमधील पोकळ्या भरणे आदींसाठी आता नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. मात्र मुखाचे आरोग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावी ठरतात.
दात साफ करण्यासाठी फ्लुरॉइड असलेल्या टूथपेस्ट वापरणे योग्य ठरते. मात्र टूथपेस्टमधून जात असलेल्या अतिरिक्त फ्लुराइडमुळे १२ वर्षांखालील मुलांच्या दातावर डाग पडण्याची समस्याही गंभीरपणे पाहायला हवी. लहान मुलांसाठी फ्लुराइड नसलेल्या टूथपेस्ट वापरणे हिताचे ठरते. दात पांढरेशुभ्र करण्याचा दावा करणाऱ्याही काही टूथपेस्ट बाजारात आहेत. त्यात दातांचे ब्लिचिंग जेल वापरलेले असते. या टूथपेस्ट रोज वापरणे तसे सुरक्षित असले तरी त्यांचा खूप जास्त वापर केल्यास दातांवरील आवरण निघून जाण्याचा धोका असतो. या व्हाइटनिंग प्रक्रियेत दातांची मजबुती कमी होण्याचीही शक्यता असते.

मुलांनी जंक फूड खाणे टाळायला हवे. पालकांनी मुलांच्या खाद्यपदार्थाकडे लक्ष देऊन दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. मुलांची नियमित दंततपासणी करून दातांच्या समस्या पूर्वावस्थेतच दूर करायला हव्यात. ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या दातांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. दातांचे आरोग्य चांगले नसले तर तुम्ही काहीही खाल्ले तरी तुम्हाला समस्या निर्माण होणार. दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ करणे, दातांमधील अन्नकण काढून टाकणे आणि चार-सहा महिन्यांनी ब्रश बदलणे तसेच वर्षांतून दोनदा दंतवैद्याकडे जाणे या चांगल्या सवयी आहेत.
डॉ. अजय माथूर, दंतवैद्य