आजार उद्भवल्यावर त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी औषधांचा वाटा महत्त्वाचा असतो. अनेकदा डॉक्टरांचा सल्ला न घेताही रुग्ण औषधांची खरेदी करतात. सर्दी, ताप, अंगदुखी, आम्लपित्त यांसारख्या त्रासांवर डॉक्टरांच्या सल्ल्यापेक्षाही स्वमनाने औषधे घेण्याकडे अधिक कल असतो. मात्र एखाद्या आजारावरील औषधे प्रत्येक व्यक्तीसाठी लाभदायक ठरत नाही. त्यामुळे औषधांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांकडून त्याची विचारणा केल्यास भविष्यातील आरोग्याचा धोका टळू शकतो.

आजारी असल्यास बरेच जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वमनाने औषधे घेतात. बऱ्याचदा आपण स्वत: ही एखाद्यला स्वत:च्या अनुभवावरून वा माहितीप्रमाणे औषधे घेण्याचा सल्ला देत असतो. स्वमनाने औषधे घेणे याला वैद्यकीय परिभाषेत सेल्फ मेडिकेशन (Self Medication) म्हणतात. किरकोळ आजारांवर उदा. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, डोकेदुखी इत्यादी आजारांत काही औषधे कमी दुष्परिणाम करणारी आणि सुरक्षित असतात. अशी औषधे आपण फार्मासिस्टच्या (औषधविक्रेता) सल्ल्याने किंवा स्वमनाने घेऊ शकतो. अशा डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नसलेल्या औषधांना ओव्हर द काऊंटर (OTC) असे म्हणतात. मात्र या आजारांवरील एका रुग्ण घेत असलेले औषध दुसऱ्या रुग्णांसाठी परिणामकारक ठरेलच असे नाही. एखाद्या व्यक्तीला अ‍ॅलर्जी असल्यास अशा औषधांमुळे त्रास होऊ  शकतो. अ‍ॅन्टासिड, माइल्ड पेनकिलर, टॉनिक, वेदनाहारी बाम, लोशन, मलम यांसारखी फार थोडीच औषधे स्वमनाने घेता येऊ  शकतात. यातही अ‍ॅलर्जीचा मुद्दा लक्षात ठेवणे आवश्यक.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

स्वमनाने औषधे घेऊन आपले आरोग्य आपल्या हाताने धोक्यात घालू नये. औषधे दुकानात सहज उपलब्ध होतात म्हणून खाऊ  नये. शेडय़ुल एच, एचवन, एक्स या गटात मोडणाऱ्या औषधांचा डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता असते. या औषधांच्या आवरणावर यासंदर्भात ठळक सूचना दिलेली असते. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि प्रिस्क्रिप्शनशिवाय घेणे रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. बऱ्याचदा रुग्ण वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी एखाद्या डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधाने गुण आल्यास पुन्हा तपासणीसाठी डॉक्टरांकडे न जाता तेच औषध सुरू ठेवतात. त्याचे गंभीर दुष्परिणाम रुग्णाच्या प्रकृतीवर होऊन रुग्णास जीवही गमवावा लागू शकतो. उदा. उच्च वेदनाशामक औषधे (Diclofenac,Ibuprofen) ही औषधे सतत किंवा स्वमनाने घेत राहिल्यास मूत्रपिंडावर परिणाम होऊन भविष्यात मूत्रपिंड निकामी होऊ  शकते.

बऱ्याचदा फेरतपासणीला न जाता आधीच दिलेले औषध सुरू ठेवले तर त्या औषधांची सवय लागू शकते. डॉक्टर अशी औषधे कमी कालावधीसाठी देतात. पण रुग्णांकडून ती तशीच सुरू राहिली तर त्या औषधांची सवय लागते. उदा. झोपेच्या गोळ्या, खोकल्यावर कोडीन घटक असलेली सिरप.

भारतासारख्या देशात ओटीसी आणि प्रिस्क्रिप्शन ड्रग असे औषधांचे वर्गीकरण सहसा केले जात नाही आणि त्याबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती नसते. अशा वेळी औषध दुकानातील रजिस्टर्ड फार्मसिस्टची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. यामुळे नोंदणीकृत फार्मसिस्टकडून औषधांची खरेदी करावी.

प्रतिजैविकांचा अतिरेक नको

प्रतिजैविके म्हणजेच अ‍ॅन्टिबायोटिक औषधांचा वापर वाढला आहे. ‘अ‍ॅन्टी’ म्हणजे विरोध व ‘बायो’ म्हणजे जीव. जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारी औषधे म्हणजे प्रतिजैविके. जंतुसंसर्ग होऊ  नये यासाठी वापरण्यात येणाऱ्या या औषधांमुळे काही काळ रुग्णांना त्रासातून मुक्तता मिळत असली तरी त्याचे काही दुष्परिणाम होतात. उपचारासाठी एकाच प्रकारच्या औषधांचा वापर केल्यास किंवा औषधांचा पूर्ण मात्रेमध्ये घेतले नाही तर त्या आजाराच्या जिवाणू रुग्ण घेत असलेल्या औषधांना प्रतिकार करण्याची क्षमता विकसित होते. त्यानंतर हे जिवाणू अन्य औषधांनाही दाद देत नाहीत.

औषधे जबाबदारीने वापरा

* औषधे ही रासायनिक दव्ये आहेत. त्यामुळे उष्णता, दमटपणा, पाणी यामुळे त्याचे विघटन होऊ  शकते. त्यामुळे यापासून औषधे लांब ठेवावीत. एखाद्या डब्यात सर्व गोळ्या-कॅप्सूल ठेवून डबा कपाटात ठेवणे योग्य होईल. औषधांच्या बाटल्या एका ट्रेमध्ये ठेवता येतील.

* औषधे खरेदी केल्यानंतर त्यावरील मुदत दिनांक तपासून घ्या.

* दोन रुग्णांमधील आजाराची लक्षणे समान दिसली तरी आजाराची कारणे वेगळी असू शकतात. म्हणून कधीही दुसऱ्याची औषधे घेऊ  नयेत.

* घरातील सर्व औषधांची सूची बनवून औषधाचे नाव, उपयोग व त्याची एक्स्पायरी यांची नोंद करावी. मुदतबाह्य झालेली औषधे खाऊ  नये.

* नियमित औषध घेणाऱ्यांनी औषधांचे वेळापत्रक पाळणे महत्त्वाचे. दररोजची औषधे विसरू नये. आधीचा डोस विसरला म्हणून पुढच्या डोसच्या वेळी दोन्ही वेळेसचे एकदाच खाऊ  नये.

* रुग्णांनी आपण घेत असलेली औषधे तज्ज्ञ डॉक्टर, व्यायाम प्रशिक्षक यांना दाखवावीत. या यादीत कुठल्या डॉक्टरांनी कुठले औषध लिहून दिले याचाही उल्लेख असावा.

* डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेत आणि योग्य प्रमाणात घ्यावीत. औषधे वेळेत घेण्यासाठी एक वेळ ठरवून घ्यावी. काही यासाठी दिनदर्शिका, चार्ट आदी गोष्टींचा वापर करतात.

* औषधांचा दुष्परिणाम जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा. अशा वेळी डॉक्टर औषधांमध्ये फेरफार करू शकेल. मात्र औषधे टाळू नका.

* औषधे सुरू असताना दारू पिऊ नये. अनेक औषधे दारूमुळे परिणामकारक ठरत नाहीत.

* डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत औषधे घेणे थांबवू नये.

* मधुमेह, उच्च रक्तदाब या दीर्घकालीन आजारात बहुतांशी वेळा औषधे कायमस्वरूपी घ्यावी लागतात. म्हणून स्वत:च्या मनाने ही औषधे मध्येच बंद करणे धोकादायक ठरू शकते.

* वेदनाशामक औषधे भरल्यापोटी घ्यायची असतात. अन्यथा आम्लपित्ताचा त्रास होऊ  शकतो. या औषधांचा स्वमनाने अतिरेकी वापर टाळावा.

* अतिरंजित जाहिरातींना भुलून वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वत:वर औषधांचा प्रयोग करू नये.

– कैलास तांदळे, औषधअभ्यासक  (शब्दांकन – मीनल गांगुर्डे)