• डॉ. नितीन पै उदरविकारतज्ज्ञ

कामाच्या आणि जेवणाच्याही अनियमित वेळा हा दिनक्रम आता अनेकांसाठी नियमितझाला आहे! अनेकदा बाहेर खाण्यावाचूनही पर्याय नसतो. बहुसंख्य मंडळींना मग अ‍ॅसिडिटीकिंवा त्याही पुढे जाऊन अल्सरचा त्रास होतो. आज या अ‍ॅसिडिटीविषयी थोडेसे जाणून घेऊ या.

अ‍ॅसिडिटी म्हणजे काय?

आपल्या जठरात आम्ल असतेच. खाल्लेल्या अन्नाचे विघटन करणे, अन्नातील विषाणूंना मारणे आणि अन्नातील सर्व घटक एकत्र करून ते पचनसंस्थेत पुढे सरकण्यास मदत करणे हे त्या आम्लाचे नेहमीचे काम. जठरातील आम्लाचे उत्पादन वाढून जो त्रास होतो, तो म्हणजे अ‍ॅसिडिटी (आम्लपित्त). यात जळजळ होणे, पोटात दुखणे ही लक्षणे दिसू शकतात. हे पोटात दुखणेही जळजळ झाल्यासारखे दुखते किंवा तीव्र दुखते.

अ‍ॅसिडिटीत पोटात तीव्र दुखत असेल तर जठराच्या आतील अस्तर उघडे पडून तिथे अल्सर (व्रण) झालेला असू शकतो. खरे तर जठराचे आतले आवरण मजबूत असते. आम्ल सहन करण्याची क्षमता त्यात असूनही काही वेळा ते अशा प्रकारे फाटू शकते. असा अल्सर होतो तेव्हा त्या ठिकाणच्या नसा उघडय़ा पडतात आणि त्यावर आम्लाची प्रक्रिया होऊन पोटात दुखते.

जठरातील आम्ल अन्ननलिकेत आले, तर छातीमागे जळजळ होणे, छाती दुखणे, आंबट ढेकर येणे, तोंडात करपट पाणी येणे, उलटय़ा होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. याला ‘रीफ्लक्स डिसिज’ म्हणतात.

अलीकडे अ‍ॅसिडिटीवरील ‘ओव्हर द काऊंटर’ औषधांचा वापर वाढला आहे. अ‍ॅसिडिटी झाल्यावर कोणती गोळी किंवा कोणते सिरप घ्यावे हे सर्वाना माहीत असते. अ‍ॅसिडिटी क्वचितच झालेली आणि साधी असेल तर हे औषध घेऊन पाहता येईल. पण सततच अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल किंवा ती तीव्र स्वरूपाची असेल, तर सारखी ही औषधे घेत राहण्यापेक्षा डॉक्टरांकडून आधी तपासून घेतलेले बरे.

प्रत्येक जळजळ किंवा उलटी ही अ‍ॅसिडिटीच असेल असे नाही. पोटात वा छातीत तीव्र किंवा सतत वेदना होणे, वजन कमी होणे, खायची इच्छा कमी होणे, सतत उलटय़ा होणे, उलटी किंवा शौचावाटे रक्त जाणे, शौचास काळ्या रंगाची होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर मात्र त्याला केवळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्षित करू नका. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला हवी. काही रुग्णांच्या बाबतीत ही लक्षणे अन्ननलिकेच्या किंवा जठराच्या कर्करोगाची असू शकतात, गाठ झाल्यामुळे किंवा अल्सरची काही गुंतागुंत उद्भवल्यानेही ही लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत दुर्बिणीने तपासणी (एण्डोस्कोपी) केली जाते.

कोणत्याही रक्ताच्या चाचणीतून अ‍ॅसिडिटी वा अल्सर आहे की नाही ते कळत नाही. रुग्णाला तपासून त्याच्या लक्षणांवरूनच निदान होते. सर्वच रुग्णांना चाचण्या लागतही नाहीत. ८० ते ९० टक्के रुग्णांना डॉक्टरांनी सुचवल्यानुसार ठरावीक काळ गोळ्या-औषधे घेऊन बरे वाटते.

अ‍ॅसिडिटी व अल्सरचे असेही संभाव्य कारण

‘एच पायलोरी’ नावाचा एक विषाणूदेखील अ‍ॅसिडिटी वा अल्सरसाठी कारणीभूत ठरू शकतो. अस्वच्छतेची समस्या असणाऱ्या जवळपास सर्वच विकसनशील देशांमध्ये तो आढळतो. साधारणपणे १० वर्षांनंतरच्या ८० ते ९० टक्के  लोकसंख्येस दूषित अन्नपाण्यातून या ‘एच पायलोरी’ची लागण झालेली असते. अर्थात या सर्वाना अ‍ॅसिडिटी वा अल्सर होतोच असे नाही. पण जेव्हा अ‍ॅसिडिटी वा अल्सरची तीव्र स्वरूपाची लक्षणे रुग्णास दिसत असतात, तेव्हा तपासणी केली असता या विषाणूचे निदान होऊ शकते. त्यानुसार पुढील औषधे दिली जातात.

अ‍ॅसिडिटीची नेहमीची कारणे

  • चुकीची जीवनशैली
  • सततचे वा अति धूम्रपान किंवा मद्यपान
  • अतिशय तिखट मसालेदार अन्नाचे सेवन
  • ताणतणावपूर्ण जीवन
  • व्यायामाचा अभाव
  • दोन खाण्यांच्या मध्ये खूप वेळ उपाशी राहणे

हे लक्षात ठेवा

  • गरोदर महिलांमध्ये अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो, पण अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे योग्य.
  • वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांमध्ये अ‍ॅसिडिटी झाली असेल, तरीही डॉक्टरांकडून तपासून घेणे गरजेचे.

काय करावे?

  • अ‍ॅसिडिटीपासून दूर राहण्यासाठी जीवनशैलीत ठरवून सकारात्मक बदल करणे गरजेचे
  • फार वेळ उपाशी राहू नका. तीन-चार तासांनी थोडेसे काहीतरी खा.
  • तिखट मसालेदार जेवण कधीतरीच बरे
  • दारू व धूम्रपानही टाळलेलेच चांगले.
  • क्वचित अ‍ॅसिडिटी झाली तर त्यावर बाजारात ‘ओव्हर द काऊंटर’ मिळणारी ‘अँटासिड’ घेणे चालू शकेल. पण त्याचा अतिरेक नको. वारंवार होणारी किंवा तीव्र अ‍ॅसिडिटी असेल तर डॉक्टरांचा सल्ला गरजेचा.