‘डॉक्टर, आमच्या भावाला तुम्ही ‘शॉक ट्रीटमेंट’ देणार आहात?’

‘अहो नाही. मी ईसीटी देणार आहे. इलेक्ट्रोकन्व्हल्जिव थेरपी असं म्हणतात त्याला!’

‘म्हणजेच शॉक ट्रीटमेंट ना?’

‘हे बघा, पूर्वी जेव्हा अ‍ॅनस्थेशिया नव्हता किंवा भूल देत नव्हते तेव्हा शस्त्रक्रिया करायचे, पोट फाडायचे त्याला तुम्ही मग काय म्हणणार? तसंच जेव्हा ही थेरपी वापरायला लागले तेव्हा सुरुवातीला अ‍ॅनस्थेशिया/ भूल देत नव्हते. त्यामुळे शॉक बसल्यासारखी संवेदना व्हायची म्हणून कदाचित हे नाव पडलं असेल. पण ही उपचारपद्धती आहे आणि त्यामागे शास्त्रीय विचार आहे. यात कुठेही रुग्णाला शिक्षा देणे वगैरे हेतू नक्कीच नाही. त्यामुळे आधी हा दृष्टिकोन बदला.’

ईसीटी म्हटलं की असा शॉक पहिल्यांदा नातेवाईकांना बसतो! कारण मुळात ही उपचारपद्धती काय आहे हे नीट माहीतच नसते. ईसीटीविषयी माध्यमातून विशेषत: विविध चित्रपटांतून जे दाखवले गेले आहे त्यामुळे तर त्याला दृक्श्राव्य परिणाम आला आहे! अर्थात इतक्यात दाखवले गेलेले ‘देवराई’, ‘कदाचित’ हे चित्रपट त्याला अपवाद आहेत. त्यामध्ये पूर्ण वास्तव चित्रण करण्यात आले होते. मनोविकार बरे करण्यासाठी ‘झटके’ देऊन उपचार करण्याची पद्धत सोळाव्या शतकापासून प्रचलित आहे. तरी मेंदूला मोठा झटका बसल्याने मनोविकार बरे होतात हा शोध पहिल्यांदा हिप्पोक्रिट्सने लावला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मनोविकार हे मानसशास्त्रीय कारणांबरोबर जीवशास्त्रीय (रासायनिक) कारणांमुळे होतात असं मानलं जाऊ  लागलं होतं.

ज्युनिअर वॅग्नर या ऑस्ट्रियन फिजिशियनने मलेरिया इण्डयुस्ड फिव्हर थेरपी सुरू केली. मनोरुग्णांना १९१७ साली मलेरिया झालेल्या रुग्णांचे रक्त टोचले, त्यांना ताप आल्यावर झटके बसले. असे नऊ पैकी चार रुग्ण पूर्ण बरे झाले. पुढे वॅग्नर जॉरेग यांनी अनेक रुग्णांवर असे उपचार यशस्वी केले. याबद्दल त्यांना १९२७ मध्ये नोबेल पारितोषिकही मिळाले.

१९२१ मध्ये फ्रेडरिक बेटिंग व चार्ल्स बेंट या कॅनेडियन संशोधकांनी ‘इन्शुलिन कोना थेरपी’ सुरू केली. इन्शुलिन दिल्याने त्याचे प्रमाण वाढते. रक्तातील साखर कमी होऊन झटके येतात व रुग्ण बरे होतात असे आढळून आले. अमेरिकेत स्किझोफ्रेनियाचे अनेक रुग्ण अशा तऱ्हेने बरे करण्यात आले. त्याच वेळी मेडय़ूना या हंगेरियन फिजिशियनने एपिलेप्सी आणि स्किझोफ्रेनिया परस्परांविरोधी आहेत, असे सांगितले. त्यासाठी एपिलेप्सी/झटके आणणारी विविध रसायने वापरली. त्यातील मेट्रोझोल त्याला विशेष उपयोगी ठरले आणि मग मेट्रोझोल थेरपी सुरू झाली. त्यात १९४० साली मेट्रोझोलबरोबर स्नायू शिथिलीकरणासाठी क्युरारे वापरण्यास किंवा स्कोपोलामाइन वापरण्यास सुरुवात केली. परंतु या सर्व पद्धतींमध्ये खूप धोके व अनेक दुष्परिणाम होते. त्यामुळे सेरेलेस्टी नावाच्या इटालियन न्यूरॉलॉजिस्टने इलेक्ट्रिक शॉक देऊन झटके आणण्याची ही इलेक्ट्रोशॉक थेरपी सुरू केली. जिच्यामध्ये अनेक बदल होत गेले. सुरुवातीला भूल दिल्याशिवाय हा उपचार केला जायचा. भारतातील काही भागांत तर अगदी २०१० पर्यंत! परंतु आता संपूर्ण जगभर भूल देऊन मग विशिष्ट यंत्राचा वापर करून तसेच रुग्ण/नातेवाईकांना संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या संमतीनेच उपचार देण्याची पद्धत अवलंबिली जाते. एखाद्या छोटय़ा शस्त्रक्रियेसारखी पूर्ण काळजी घेतली जाते. ईसीटी देण्याआधी तो रुग्ण ईसीटी तसेच भूल देणे या दोन्हीसाठी पूर्णपणे ‘योग्य’ किंवा ‘फिट’ आहे का ते बघितले जाते. त्यादृष्टीने रक्त तपासणी, ईसीजी, ईईजी गरज वाटल्यास स्कॅनिंग वा तत्सम तपासण्या करून मगच ईसीटीचा निर्णय पक्का केला जातो.

तीव्र नैराश्य, आत्महत्येचा विचार येणे वा प्रयत्न करणे, अति आक्रस्ताळेपणा किंवा हिंसकपणा, उन्मादाची अवस्था, स्किझोफ्रेनिया या विकारांमध्ये जास्त करून हा उपाय योजला जातो. त्यामुळे लक्षणे लवकर नियंत्रणात येतात, औषधांचाही चांगला परिणाम होतो व रुग्ण समुपदेशनालासुद्धा योग्य प्रतिसाद देऊ  शकतो. काही वेळा दीर्घकालीन विकाराचा परिणाम कमी करण्यासाठी हा उपाय वापरला जातो.

उपचारादरम्यान होणारा तात्पुरता स्मरणशक्तीवर परिणाम (त्या दरम्यान घडणाऱ्या गोष्टी, भेटायला आलेले लोक वगैरे विसरणे) सोडला तर बाकी काही दुष्परिणाम आढळून येत नाहीत! या उपचारांमुळे मेंदूतील रासायनिक असंतुलन लवकर दूर होण्यास मदत होत असते. त्या त्या जीवरसायनाशी संबधित रिसेप्टर्सचे कार्य चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे लवकर नियंत्रित व बरी होतात. तसेच मेंदूतील या बदलामुळे औषधाचाही परिणाम चांगला होत असतो.

थोडक्यात ही उपचार पद्धती ‘वरदायीच’ आहे. इलेक्ट्रिक शॉकने धक्का द्यायची शिक्षा नाही. मनोविकार (तीव्र) लवकर बरे करण्याचा/ नियंत्रित करण्याचा तो एक प्रभावी उपचार आहे!

-डॉ. अद्वैत पाध्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Adwaitpadhye1972@gmail.com