सोहमची आई काळजीतच कन्सल्टिंग रूममध्ये आली. ‘‘डॉक्टर तीन दिवस झाले, अजून ताप उतरत नाही. पॅरेसीटमॉलच्या तीन-चार बाटल्या संपल्या. कुठला ताप असेल हा?’’ सोहमच्या आईचा प्रश्न ऐकून मला आमच्या शिक्षकांचे वाक्य आठवले. असे कुठल्याही आईने विचारले की सर म्हणत- तापाचे नाव आम्ही अकराव्या दिवशी ठेवतो. पण आत्ता हे वाक्य ऐकण्याच्या मन:स्थितीत सोहमची आई नव्हती. पूर्ण लक्षणे विचारल्यावर कळले- ताप, सर्दी, खोकला ही सगळी व्हायरल फिवर म्हणजे विषाणूजन्य तापाची लक्षणे होती. हे सांगितल्यावर सोहमच्या आईचा पुढचा प्रश्न तयार होता. ‘डॉक्टर, हे व्हायरल म्हणजे नेमके काय?’ मलाही जाणवले, आपण सहज व्हायरल म्हणून विषय संपवतो. पण आईसाठी हे व्हॉट्स अ‍ॅपवर एखादी पोस्ट व्हायरल झाली म्हणण्याएवढे साधे नसते. म्हणून मी जरा विस्ताराने सांगितले. कुठलाही व्हायरल आजार किंवा ताप म्हणजे मुदतीचा ताप. म्हणजे तो आपोआप त्याचा वेळ घेऊन बरा होणार आहे. नियमित होणाऱ्या सर्दी-खोकल्याचे बहुतांश वेळा व्हायरल हेच निदान असते. यात सुरुवातीला तरी लक्षणे नियंत्रित ठेवणारी औषधे घेतली तरी पुरेसे ठरतात. तीही खूप जास्त प्रमाणात नको. तापाचे औषध हे ताप नियंत्रित करणारे असावे. तो ताप दाबणारे नसावे. कारण तसे केले तर निदान नीट होत नाही.

‘‘डॉक्टर आजकाल तापासाठी पॅरेसीटमॉलसोबत इतर औषधांचे कॉम्बिनेशन उपलब्ध आहे.’’ मला ही शंका अपेक्षित होतीच. तापासाठी आजवरच्या इतिहासात पॅरेसीटमॉल हे सर्वोत्तम औषध आहे. ताप कमी करणाऱ्या औषधांचे कॉम्बिनेशन ताप लवकर कमी करते पण वैद्यकीय शास्त्र अशा कॉम्बिनेशन औषधांना मान्यता देत नाही, तसेच भीतीपोटी ताप येण्याअगोदरच पॅरेसीटमॉल देणेही चुकीचे आहे. कारण यामुळे ताप गेलाय की नाही हे लक्षात येत नाही.

‘बरं किती ताप होता?’ माझ्या प्रश्नाने सोहमची आई चक्रावून गेली. ‘मी मोजला नाही.’ मला चांगले ठावूक होते. बऱ्याचदा अंग गरम लागणे म्हणजे ताप, असा पालकांचा समज असतो. पण तापमापकाने (थर्मामीटर) ताप मोजला जात नाही आणि तो ९८ च्या वर असत नाही तोपर्यंत ताप किती आहे किंबहुना आहे की नाही, हेही निश्चित करता येत नाही. खरे तर प्रत्येक सुजाण आईकडे एक तापमापक असणे गरजेचे आहे.

‘डॉक्टर काही तपासण्या गरजेच्या आहेत का?’ नशीब थोर की सोहमची आई तपासण्या घेऊन अमुक पेशी कमी झाल्या, तमुक पेशी वाढल्या म्हणून आली नव्हती. कारण आजकाल तापाचे बहुतांश रुग्ण तपासण्यांची फाइल आणि पेशींचा विषय घेऊनच समोर येतात. वैद्यकीय पेशा हे नाव बदलून वैद्यकीय ‘पेशी’ असे आमच्या व्यवसायाचे नामकरण करावे इतपत हे फॅड वाढले आहे. मी सोहमच्या आईला समजून सांगितले- बहुतांश तापांचे निदान हे सात दिवसांपर्यंत होऊन जाते. सात-आठ दिवसांच्या पलीकडे ताप राहिला तरच तपासण्या गरजेच्या असतात, त्याही अगदी मोजक्या. म्हणून तपसण्या हा विषय सध्या बाजूला ठेवा. मी प्रिस्क्रिप्शन दिले. त्यात एखादे तरी प्रतिजैविक (अँटीबायोटिक) सोहमच्या आईला अपेक्षित होते. तिने प्रश्न विचारण्याअगोदरच मी सांगितले. प्रत्येक तापाला प्रतिजैविकाची गरज असतेच, असे नाही आणि विषाणूजन्य तापाला तर मुळीच नाही. जर विषाणूजन्य तापात प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे संसर्ग झाला तर क्वचितच प्रतिजैविकाची गरज पडते. प्रतिजैविकाचा हट्ट धरणारे बरेच पालक भेटतात, तसेच गरज असताना प्रतिजैविक नाकारणारेही भेटतात. माझा निर्णय मात्र सोहमच्या आईने मान्य केल्यामुळे कौतुक वाटले. बरं डॉक्टर ताप पॅरेसीटमॉलने उतरलाच नाही तर काय करू. एक सांगू का. पूर्ण अंग ओल्या कपडय़ाने पुसून घ्या. हे आजवरचे तापावरचे सर्वोत्तम औषध आहे.

डॉ. अमोल अन्नदाते amolaannadate@yahoo.co.in