पूर्वी मधल्या वेळचे खाणे हा प्रकार विशेष नव्हता. सकाळी लवकर न्याहरी होत असे. त्यामुळे दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवणही लवकरच होई. आता मात्र जेवणांच्या वेळा बदलल्या. रात्री खूप उशिरा जेवले जाते आणि दोन जेवणांच्या मध्ये भूक लागते. हल्ली ‘दोन-दोन तासांनी थोडे खा’ ही गोष्ट प्रचलित आहे. परंतु असे दोन-दोन तासांनंतरचे खाणे प्रत्येकाच्या प्रकृतीला मानवेलच असे नाही. ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे अशांना दर दोन तासांनी खाल्लेलेही पचू शकेल, पण इतरांना आधीचे खाल्लेले अन्न पचण्याआधीच पुन्हा खाल्ल्यास त्रास होऊ शकतो.

मधल्या वेळचे खाणे म्हणजे दुपारी चार वाजताचे खाणे असे मानले जाते. पण मधली वेळ ही दुपारचे जेवळ कधी झाले यावर अवलंबून असलेली चांगली. दुपारच्या जेवणानंतर तीन ते चार तासांनी मधल्या वेळचे खाणे खाल्ले तर चांगले. शिवाय मधल्या वेळचे खाणे झाल्यावर साधारणत: चार ते पाच तासांनी रात्रीचे जेवण असावे.

  • मधल्या वेळी काय खावे हे व्यक्तीची प्रकृती आणि ऋतूनुसार बदलते. पण हे खाणे पोटभर नसावे. पुढच्या जेवणापर्यंत पोटाला आधार मिळणे आणि पुढच्या कामासाठी ऊर्जा मिळणे हा त्याचा उद्देश असतो.
  •  मधुमेही व्यक्तींनाही अनेकदा सारखी भूक लागते आणि दर २-३ तासांनी खावेसे वाटते. परंतु दोन वेळा व्यवस्थित चौरस आहार आणि मधल्या वेळी हलके खाणे घेतल्यास मधुमेह्य़ांनाही रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. अर्थात या मंडळींना मधल्या वेळी खाण्यासाठी कोणते पदार्थ चालतील याविषयी प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यायला हवे.

पावसाळ्यातली मधली वेळ

  • पावसाळ्यात मधल्या वेळी सूप, आल्याचा वा दालचिनीचा चहा या गरम पेयांची जोड हलक्या खाण्याला द्यायला हवी.
  • या दिवसांत अग्नी मंद झालेला असतो. मधल्या वेळी भूक लागत असली तरी ती खोटी भूक असते. त्यामुळे या वेळचा आहार हलका हवा. खाकरा किंवा खाकऱ्याचे चाट, कणकेची बिस्किटे, मूगडाळीचे धिरडे असे पदार्थ खाता येतील. पाऊस सुरू झाल्यावर भजी वा वडे खाण्याची इच्छा होणारच. पण ते शक्यतो कमी खाल्लेले किंवा टाळलेलेच बरे.

वयानुसार मधल्या वेळी काय खावे?

लहान मुले

लहान मुलांना संध्याकाळी खेळायला जायच्या आधी मधल्या वेळचे खाणे आवश्यक असते. हा आहार थोडा, पण पोषक असावा. लहान मुलांना मधल्या वेळी गोड किंवा थोडे जड पदार्थ चालू शकतात. खेळातून शारीरिक हालचाल भरपूर होत असेल तर हे अन्नपदार्थ त्यांना पचतात. शेंगदाण्याचा लाडू, चिक्की, दाणे- फुटाणे, ग्लासभर दूध व कणकेची बिस्किटे वा कणकेची नानकटाई, थालिपीठ, धिरडे, इडली असे पदार्थ मुलामुलींना देता येतील. काहीच नसेल तर पोळीबरोबर साखरआंबा, मुरांबा वा गूळ-तूप पोळीही या वेळी देता येईल.

तरुण

तरुणांनाही थोडे जड पदार्थ मधल्या वेळी चालतील, पण त्याचे प्रमाण कमी असावे. भेळ, फरसाण असे पदार्थ मधल्या वेळी थोडे जास्त खाल्ले गेले तर रात्रीच्या वेळी मात्र मूगडाळीची खिचडी, ताक असे हलके जेवण बरे. ढोकळा, इडली, लाडू, चिवडा, थालिपीठ, भेळ हे पदार्थ तरुणांना मधल्या वेळी बेताने खाता येतील.

वयस्कर मंडळी

या लोकांना दुपारचे जेवण लवकर पचत नाही. वृद्ध लोक साधारणत: दुपारी थोडा वेळ झोप घेतात आणि उठल्यावर लगेच चहाबरोबर मधल्या वेळचे खाणे होते. या वेळी फारशी भूक नसते. त्यामुळे खाणे हलके व पोषक हवे. ज्वारी, साळी वा मक्याच्या लाह्य़ा, चहाबरोबर २-३ टोस्ट, सातूचे वा लाह्य़ांचे पीठ दूध-साखर वा ताकाबरोबर घेता येईल. भाजणीची चकली चहाबरोबर बेताने खाता येईल. खाकरा, चिवडा वा फोडणी दिलेले कुरमुरे चालू शकतील. सकाळी सुकामेवा खाल्ला नसेल तर दुपारी थोडासा खाता येईल किंवा गूळपापडीची वडी, खोबऱ्याची वडी एखादी तोंडात टाकता येईल. खारीक, भाजलेले खोबरे, भाजलेली खसखस, साखर आणि थोडी सुंठ या पाच वस्तूंची एकत्र पूड करुन पंचखाद्य घरात तयार करून ठेवता येईल.