जपानी मेंदूज्वर हा डासांमार्फत होणारा आजार आहे. भारत, चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया, बांगलादेश येथे अधिक प्रमाणात आढळतो. साधारणपणे डुकरांमध्ये जपानी मेंदूज्वराचे विषाणू जास्त आढळतात. त्यांना चावा घेतलेल्या क्युलेक्स डासांच्या मादीने मानवाला चावा घेतल्यास या विषाणूंचा प्रसार होतो. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ होते. पूर्व विदर्भात भात शेतीच्या पट्टय़ात या डासांची उत्पत्ती होण्याचे प्रमाण जास्त आहे.

मेंदूज्वराची लक्षणे डास चावल्यावर ९ ते १२ दिवसानंतर लक्षणे दिसू लागतात. या रोगाचा अधिशयन काळ ५ ते १५ दिवसांचा असतो. मध्यवर्ती चेतासंस्थेवर-मेंदूवर या रोगाचा प्रभाव दिसून येतो. अनेकदा या रोगाची बाधा होऊनही काही व्यक्तींमध्ये बरेच लक्षणे दिसून येत नाहीत. माणसाला झालेला जंतूसंसर्ग त्या व्यक्तीपुरताच मर्यादित राहतो. विदेशी प्रवासी जर ग्रामीण भागात एक महिन्याहून अधिक काळ वास्तव करणार असेल तर त्यांनाही या रोगाची बाधा होण्याची शक्यता असते. या रोगाची साथ कधीही येत नाही. परंतु अत्यवस्थ रुग्णांपैकी २० ते ५० टक्के व्यक्ती दगावतात. मृत व्यक्तींमध्ये ६५ वर्षांवरील व्यक्तीचे प्रमाण जास्त आढळते. यंदा विदर्भात पाऊस कमी पडला असल्यामुळे रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु पाऊस वाढल्यावर रुग्ण वाढू शकतात.

लक्षणे

  • ताप, डोके दुखी, मळमळने
  • ओकारी येणे, जुलाब होणे
  • मेंदूवर सूज आली असेल तर बोलताना जीभ अडखळणे
  • हात-पाय थरथरणे, चालताना पाय लटपटणे
  • अर्धागवायू होणे
  • गोंधळलेली मन:स्थिती

संभाव्य गुंतागुंत

महिलांना या रोगाची लागण प्रसूतिपूर्व काळात गरोदरपणाच्या ६ महिन्याच्या कालावधीत झाल्यास गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसुती संभवते. अत्यवस्थ व्यक्ती मृत्यूच्या तावडीतून सुटतात, त्यापैकी दोन तृतीयांश व्यक्तींना लुळेपणा, कंपवात, मानसिकतेत बदल, मतिमंदपणा इत्यादीची बाधा होऊ शकते.

रोगनिदान

या रोगाचे निदान रक्तद्रव्याची तपासणी करून तसेच पाठीच्या मणक्यातील पाणी तपासणी करून करता येते.

उपचार

या रोगावर कोणतेही प्रभावी औषध नाही. सहाय्यक उपचार, चांगली शुश्रूषा करणे, यास विशेष महत्त्व आहे. संशयित रुग्णास रुग्णालयात दाखल करावे. हाता- पायात लुळेपणा आलेल्या रुग्णांना पुढे भौतिकोपचार आणि व्यावसायोपचार देणे आवश्यक असते.

डॉ. अविनाश गावंडे, नागपूर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिबंधात्मक उपाय

  • घर व परिसरात स्वच्छता ठेवा
  • डासांपासून संरक्षण आणि त्यांची उत्पत्ती थांबवणे
  • डास चावल्यास तेथे निलगिरीचे तेल लावा
  • डुकरांमध्ये विषाणू वाढत असल्यामुळे परिसरातील या प्राण्यांचा बंदोबस्त करा
  • एक वर्षांवरील व्यक्तींना प्रतिबंधक लस घेता येते
  • गर्भवती स्त्रिया, आजारी व्यक्ती, ह्रदयविकार, किडनी विकार, यकृतविकार, कर्करोगग्रस्तांना लस देता येत नाही
  • लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा