‘माझी राजस्थानला बदली झाली, तेव्हापासून मला सारखी चिंता लागून राहिलीय की माझं तिथे कसं होणार? नवीन ठिकाणी मी कसं जमवून घेणार? मी राहणार कुठे? खाण्यापिण्याचं कसं करणार? एक ना दोन. एक तर तिकडची हवा विषम. जेवण अगदी वेगळं. माझे मित्र सांगताहेत की तू उगाच बढतीसाठी अर्ज केलास. इथे काय वाईट होतं, चांगला बायकोपोरांसोबत राहत होतास, त्यांनी असं म्हटलं की मला आणखीनच ताण येतो. एकदा वाटतं की सरळ बदली मागे घ्यावी आणि बढतीही. पण बायको मला सांगतेय की सगळं व्यवस्थित होईल. ती म्हणते मी तुझ्याबरोबर एक महिनाभर येऊन राहते, तुझं सगळं स्थिरस्थावर झालं की मी परत येईन. मी म्हटलं मुलाचं काय? तर ती म्हणाली तो राहील आईकडे व्यवस्थित. मला माझीच लाज वाटतेय. माझा दहा वर्षांचा मुलगा आई-बाबांशिवाय राहू शकतो आणि मी एवढा चाळिशीचा माणूस नको त्या चिंता करत बसलोय.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुला बढतीचा अर्ज करताना कल्पना नव्हती का बदलीची?’

‘खरं तर होती. म्हणजे, बदली होऊ शकते हे माहीत होतं, पण आपली होईल असं वाटलं नव्हतं. किंवा होऊ नये असंच वाटत होतं!’

‘तुला जे प्रश्न पडलेत, माझं कसं होईल वगैरे वगैरे, त्यांच्या मुळाशी काय आहे असं वाटतं?’

‘मी कधी घरापासून लांब राहिलेलो नाही. लहानपणापासून म्हणाल तर माझी शाळासुद्धा घराजवळ होती. आता बँकसुद्धा चालत जाण्याच्या अंतरावर आहे.’

‘याचा अर्थ असा की एका आरामदायी क्षेत्रात तू कायम राहतो आहेस. या क्षेत्राच्या बाहेर पडायची तुला सवयच नाही. म्हणून या क्षेत्राच्या बाहेर पडायच्या नुसत्या विचारानेच तुला धडकी भरते.’

‘हा शब्द बरोबर आहे. खरंच धडकी भरते मला. कुठे जाऊ नि काय करू असं होतं मला. यासाठी काही गोळ्या असतील तर द्या मला. अशा असुरक्षित ठिकाणी जाऊन एवढी र्वष तिथे काढायची हा विचार सहनच होत नाही.’

‘असुरक्षितता कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे की तुझ्या आत आहे? तुझ्या ऑफिसमधले वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी बदली होऊन गेलेले तू पाहिले असशीलच. त्यामुळे त्यांचं काय वाईट झालं?’

‘खरं आहे तुम्ही म्हणता ते. माझा बॉस मला सांगतोय की आपल्या बँकेची तिथली शाखा तुझ्या हाताखाली असेल. त्या शाखेचा विकास करायची जबाबदारी माझ्यावर आहे.’

‘म्हणजे हे केवढं मोठं नवं दालन तुझ्यासमोर उघडतंय. वरचं पद, पगारातील वाढ, वेगळी आव्हानं, तुझं व्यवस्थापनकौशल्य दाखवण्याची संधी या सगळ्याच गोष्टींकडे तू दुर्लक्ष करतो आहेस आणि चिंतांबरोबर वाहवत जातो आहेस. चिंताविरोधी औषधांचा तुला काही काळ उपयोग होईल, पण त्याबरोबर तुला तुझं आरामदायी क्षेत्र विस्तारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.’

ज्याला आपण सुरक्षित सुरक्षित आयुष्य म्हणतो ते खरंच तितकं सुरक्षित असतं का? आयुष्यात निश्चित असं काय असतं? ज्या आरामदायी क्षेत्राची आपल्याला सवय झालेली असते त्या क्षेत्राला आपण गृहीत धरलेलं असतं. जणू त्या क्षेत्रातच सुरक्षितता आहे असं आपल्या मनाने पक्कं ठरवलेलं असतं. त्यापासून थोडं जरी लांब जायची वेळ आली तरी आपण अस्वस्थ होतो. आपल्या आयुष्यात अनपेक्षित बदल तर सोडाच, पण अपेक्षित बदलही आपल्याला नको असतो. कुठल्याही बदलाकडे कसं बघायचं हे शेवटी आपल्यावर आहे. त्यातल्या नकारात्मकतेबद्दल तक्रार करायची की सकारात्मकतेबद्दल आनंद व्यक्त करायचा ही निवड आपल्या हातात आहे.

विज्ञान भैरव तंत्रात एक ध्याननिधी सांगितला आहे – अशी कल्पना करा की तुम्ही धरणीवर मोकळ्या आकाशाखाली उभे आहात. तुमच्या हृदयापासून बाहेरच्या दिशेने जायला तुम्ही सुरुवात करता. हळूहळू तुमचं अस्तित्व विस्तारतंय आणि सगळ्या सृष्टीशी एकरूप होतंय. तुमच्या आणि संपूर्ण अस्तित्वामधल्या सीमारेषा मिटून जाताहेत. तुमच्या आरामदायी क्षेत्राला मर्यादाच उरत नाहीत. एक अमर्याद आणि अनंत आरामदायी क्षेत्र तुमच्यासाठी उपलब्ध झालंय आणि सगळीकडेच सुरक्षितता जाणवते आहे. अगदी खरी खरी सुरक्षितता.

drmanoj2610@gmail.com

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security issue comfortable area
First published on: 19-10-2017 at 00:36 IST