डॉ. अस्मिता सावे, आहारतज्ज्ञ

फळे, विविध प्रकारच्या डाळी, धान्य या पिष्टमय पदार्थातून शरीराची साखर किंवा ग्लुकोजची आवश्यकता पूर्ण होत असते. मात्र साखरेचा वापर केलेल्या पदार्थाच्या अतिसेवनाने स्वादुपिंडावर ताण येऊन जीवनशैलीजन्य आजार होऊ  शकतात. सणासुदीच्या दिवसात तर कसलीही काळजी न करता मोठय़ा प्रमाणात साखरेचे पदार्थ खाल्ले जातात. वर्षांतून एकदा खाल्ले तर काही होत नाही, असे म्हणणाऱ्यांनी वर्षभरातील सण, दैनंदिन खाण्याच्या पद्धतीचा विचार केला तर आपल्या शरीराची आवश्यकता आणि साखरेचे प्रमाण यामधील तफावत लक्षात येईल.

दररोजच्या आहारातील भात, डाळ, भाजी, पोळी, सलाद, फळे या पदार्थामधून शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. त्याव्यतिरिक्त चहा, कॉफी, मिठाई, चॉकलेट, केक, शीतपेय या पदार्थातून शरीराला अतिरिक्त साखर दिली जाते. परिणामी वजन वाढणे, हृदयविकार, यकृताचे आजार, दातांना किडणे, मूत्रपिंडाचे त्रास होऊ  शकतात. साखरेमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे किंवा क्षार यांचा अभाव असतो आणि कबरेदकांचे प्रमाण जास्त असते. कबरेदकांमुळे शरीराला केवळ उष्मांक मिळतो. त्यामुळेच अतिप्रमाणात चहा आणि साखरेचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधिवात हे आजार निर्माण होतात. शरीरातील इन्सुलीन साखर पचवण्यातच खर्ची पडते आणि त्यातूनच मधुमेहासारख्या आजाराची शक्यता वाढते. साखर पचवण्यासाठी स्वादुपिंडाला फार मेहनत घ्यावी लागते आणि या कामासाठी स्वादुपिंडातील इन्सुलीन खर्ची होते. त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलीनची कमतरता निर्माण होऊन मधुमेहाचा संसर्ग होतो. यासाठी दैनंदिन आहारात साखरेचे प्रमाण गरजेपुरते ठेवावे. अमेरिकेच्या आरोग्य संघटनेनुसार दिवसाला सहा चमचे किंवा ३८ ग्रॅम साखर खाऊ  शकता. यातून शरीराला १५० उष्मांक मिळतो.

साखरेऐवजी..

साखरेचा शरीरासाठी काहीच उपयोग होत नसून त्याचे दुरुपयोग जास्त आहे. अनेकदा साखरेऐवजी मध, गूळ, खजूर, बीट, दालचिनी हे पदार्थ साखरेला पर्याय म्हणून सांगितले जातात. मात्र याचा किती प्रमाणात वापर केला जातो याचाही विचार करणे आवश्यक आहे. अनेकदा साखरेच्या चवीपर्यंत पोहोचण्यासाठी गूळ, मध यांचा वापर वाढवला जातो. त्यामुळे आहारातील साखरेचा वापर कमी करणे हाच पर्याय आहे. अनेकदा जेवल्यानंतर गोड खावेसे वाटते. अशा वेळी मिठाई खाण्याऐवजी नैसर्गिक खाद्यपदार्थ प्रमाणात खावेत.

साखर कशी तयार होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सल्फर डायऑक्साइड वायू, फॉर्मालीन, रिफायनिंग आणि ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट उसाचा रस आटवला जाऊन पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. रासायनिक पदार्थाचा वापर केला असल्याने साखर खराब होत नाही किंवा कीड लागत नाही. एक ग्रॅम साखरेतून ११६ उष्मांक (कॅलरी) मिळतात. एक कप चहामध्येही अनेक जण दोन चमचे साखर घेतात. एक चमचा साखरेतून दोन गव्हाच्या पोळ्या खाण्याइतके उष्मांक आपल्या शरीराला मिळतात. या पांढऱ्याशुभ्र साखरेचा धोका आपण वेळीच ओळखला नाही तर  ‘साखरेचे अति खाणार त्याला देव नेणार’ तसेच ‘मुंगी होऊन साखर खाण्यापेक्षा हत्ती होऊन लाकडे तोडा’ म्हणजेच अंगमेहनत करा आणि मधुमेह टाळा असे वाक्प्रचार वापरात येतील.