‘बब्बुलस्तुवर: शीत: कुष्ठकासामयापह:।
आमरक्तातिसारघ्न पित्ताशरेदाहनाशन:।।
बब्बुलस्य फलं रूक्षं विषदं स्तम्भनं गुरू।
बब्बुलस्य तु निर्यासीग्राही पित्तानिलापह:।।
रक्तातिसारपित्तास्त्र मेह प्रदरनाशन:।
भग्नसन्धानक: शीत: शोणितस्त्रुतिवारण:।।’ द्र. गु.वि. पृष्ट १८७
आपल्या रोजच्या व्यवहारात, संसाराची वाटचाल करताना अनेक कमी-अधिक कठीण प्रसंगांना तोंड देत असतो. ‘संसारात सुख नाममात्र व दु:खाचे काटे खूप’ असे म्हटले जाते. त्यावेळी डोळय़ासमोर ओसाड रानावनातील पाने नाममात्र व काटे भरपूर अशी बाभूळ डोळय़ासमोर येते.
आपली नेहमीची काटेरी बाभूळ, बब्बूळ, बब्बूल, बर्बुर (संस्कृत), कीकर, बाबुल (हिंदी), बावळ (गुजराथी), शमीरूकु (कोंकणी), कुरूवेलम (मल्याळम), करूवेल (तेलुगू) अशा विविधा नावांनी ओळखली जाते. ‘देवबाभूळ’ ही बाभळीची दुसरी जात. किंकिरात, कासेबाभूळ, कोकई (मराठी) या नावांनीही बाभूळ ओळखली जाते. नेहमीची बाभूळ कमी पावसाच्या कोरडय़ा प्रदेशात, काळय़ा जमिनीत होते. त्याचा गोंद व साल औषधात वापरतात. झाड सुमारे सहा ते सात वर्षांचे झाल्यावर साल काढतात आणि सुकवून ठेवतात. अशी सुकवलेली साल एक वर्षांनी वापरावी. बाभळीचे झाड सहा ते सात वर्षांचे झाल्याशिवाय त्यात उपयुक्त द्रव्य तयार होत नाही. ही साल संग्राहक आहे. बाभळीचा गोंद स्निग्ध, ग्राही, पौष्टिक व पाचक गुणांचा आहे. बाभूळशेंगेत २२ टक्के कषाय द्रव्य असते.
देवबाभळीचा वृक्ष बाभळीच्या तुलनेत कमी उंचीचा असतो. यास बाभळीसारखेच काटे व पिवळी फुले येतात. या झाडावर लाखेचे किडे आपल्याभोवती कोष करतात. बहुतेक सर्व प्रकारच्या आयुर्वेदीय दंतमंजनात बाभळीच्या आंतरसालीचा आवर्जून समावेश असतो. अकाली दात हलणे, दातातून रक्त येणे, दात किडणे अशा तक्रारीत बाभूळसालीच्या चूर्णाचे मोठेच योगदान आहे. गुदभ्रंशविकारात बाभूळ सालीच्या दाट काढय़ात कापूस भिजवून गुदभागी ठेवावा. गुदाचा भाग बाहेर येणे थांबते. घशाची कोरड व त्यामुळे कोरडा खोकला येत असल्यास बाभळीचा गोंद तोंडात धरावा. कष्टाने लघवी होत असल्यास बाभळीचा गोंद गरम पाण्याबरोबर घ्यावा. अतिसार, जुलाब या तक्रारीत बाभळीची कोवळी पाने चावून खावीत. पिसाळलेली कुत्री किंवा रानावनातील कोल्हे यांसारखे प्राणी चावल्यास देवबाभळीचे मूळ थंड पाण्यात उगाळून दिवसातून दोन वेळा घेतल्याने विष वाढत नाही. एके काळी ग्रामीण भागात ताडीची दारू गाळण्यापूर्वी बाभळीची साल ताडीत मिसळत असत. त्यामुळे ‘नितळ’ अशी ताडी प्यावयास उपलब्ध होत असे. ह. प. औषधालयाच्या स्वस्तिक व मयूर दंतमंजनात बाभूळशेंग वापरतात.