News Flash

घोटणचा मल्लिकार्जुन

मंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत.

Mallikarjun Devalaya
मल्लिकार्जुन मंदिर

प्राचीन ऐतिहासिक अवशेष आणि धार्मिक स्थळांनी नटलेला नगर जिल्हा हा इतिहास संशोधनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित राहिलेला दिसतो. औरंगाबाद आणि बीड या मराठवाडय़ातील जिल्ह्यंच्या हातात हात मिसळून असलेल्या नगर जिल्ह्यवर बऱ्याच ठिकाणी मराठवाडय़ाचा प्रभावसुद्धा जाणवतो. नगर जिल्ह्यचा शेवगाव तालुका हा तर प्राचीन पठणला खेटूनच वसलेला आहे. सातवाहनांची राजधानी असलेल्या पठणच्या परिसरात आजही तत्कालीन राजवटीचे अवशेष सापडतात. पुढे इ.स.च्या १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणाखुणा आजही या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. काही तग धरून आहेत तर काही मात्र पार ढासळलेल्या दिसतात. अशाच यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडवणारे सुंदर ठिकाण शेवगाव-पठण रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे स्थापत्य असलेले मंदिर आणि अर्थातच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.

घोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट महाभारतात जाते. कौरव आणि जरासंधानी विराट राजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना याठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला ‘गो-ठाण’ असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली त्यामुळे इथला देव झाला ‘मल्लिकार्जुन’ अशी आख्यायिका सांगितली जाते. यादव कालीन स्थापत्याच्या खुणा सांगणारे सुंदर असे देवालय इथे आहे. चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिमाभिमुख मंदिर मुख्य रस्त्यावर वसलेले आहे. मंदिर प्रकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा नजरेस पडतात. मुख्य मंदिर हे ६० फुट लांबी-रुंदीचे आहे. मंदिरावरील शिखर मात्र नंतरच्या काळात बांधलेले कळते. मंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्ल-युद्ध तसेच काही मिथुन शिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळई जिथे मिळतात तिथे आधारासाठी ब्रॅकेटस असतात. त्यावर कधी दोन तर कधी खांबाच्या चारही बाजूंनी यक्षाची मूर्ती कोरलेली असते. मल्लिकार्जुन मंदिरात १६ पैकी जे चार खांब मधोमध आहेत त्यावर चक्क पाच यक्ष कोरलेले आहेत एका बाजूला तीन आणि इतर दोन बाजूंवर एकेक.

असेच अजून एक स्थापत्यनवल पुढे बघायला मिळते. ते म्हणजे इथे असलेला गाभारा. साधारणत: शिवमंदिराचा गाभारा हा तीन ते चार फूट खोल असून त्यात शिविपडी असते. इथे चक्क दहा फूट खोल गाभारा असून तो दोन टप्प्यांत विभागला आहे. पाच पायऱ्या उतरून गेले की आपण एका टप्प्यावर येतो. इथे परत दोन बाजूला सपाट जागा असून एका बाजूला दरवाजा तर दुसरीकडे झरोका आहे. इथे पुन्हा चार खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. इथून अजून दहा पायऱ्या उतरून खाली गेले की मग शिविपड दिसते. या पायऱ्यांवर कोण भक्तांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. शिविपडीच्या जवळच एक पाण्याचा झरा असून तिथे कायम पाणी असते. अशा शिविलगांना ‘पाताळिलग’ असे म्हटले जाते. अंबरनाथ, त्रंबकेश्वर या ठिकाणी असे सखलात असलेले शिविलग बघता येते. पहिल्या टप्प्यावर जे दार आहे ते बाहेरील बाजूंनी द्वारशाखांनी नटवलेले आहे. कदाचित इथे गाभारा आणि त्यात मूर्ती असेल का?

मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाच्या खाली दोन्ही बाजूंना पाठीवर मुंगुसाची पिशवी घेतलेल्या कुबेराच्या सुरेख मूर्ती असून दरवाजा हा अत्यंत देखण्या अशा द्वारशाखांनी सजवलेला आहे. इथले अजून वेगळेपण म्हणजे दरवाज्याच्या डोक्यावर मधोमध असलेले ललाटिबब. इथे शक्यतो गणपती, अथवा शंकराची प्रतिमा बघायला मिळते. पण घोटणच्या या मंदिरावर हातात धनुष्य घेतलेल्या शिवाची आलीढासनातील मूर्ती आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी विद्याधर आपल्या हातात पुष्पमाळा घेऊन शिवाला वंदन करताना शिल्पित केलेले आहेत. कीरातार्जुन प्रसंग आणि त्रिपुरासुराचा वध अशा दोन प्रसंगीच शिवाच्या हातात धनुष्य दिसते. इतके आगळेवेगळे ललाटिबब अन्यत्र कुठे दिसत नाही. धनुष्यधारी शिव, आणि खांबांवर असलेली युद्धाचे प्रसंग असलेली शिल्पे यावरून हे कुठले शक्तीस्थळ असावे का या शंकेला वाव आहे. सभागृहात एक गद्धेगाळ आणि त्यावर देवनागरी लिपीत लिहिलेला काहीसा झिजलेला शिलालेख दिसतो. देवाच्या गुरवपदाचा मान अनेक पिढय़ांपासून शिंदे घराण्याकडे चालत आलेला आहे. त्यांच्याकडे काही सनदा बघायला मिळतात. शिक्षणाने अभियंता असलेले दिलीप केशव शिंदे सध्या देवाचे गुरव आहेत.

याच गावात सध्या बरीचशी बुजलेली सासू-सुनेची बारव आणि प्राचीन जटाशंकर मंदिर बघता येतात. पठणपासून जेमतेम पंधरा कि.मी. वर असणारे हे मल्लिकार्जुन मंदिर मुद्दाम वाट वाकडी करून जावे, आणि आगळेवेगळे स्थापत्य आवर्जून पाहावे असे आहे.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2017 1:37 am

Web Title: mallikarjun devalaya in pathan
Next Stories
1 जायचं, पण कुठं? : चित्रकूट धबधबा
2 कंबोडियातील तरंगती खेडी
3 लोक पर्यटन : व्रोस्लाव : बुटक्यांच्या दुनियेची  सफर
Just Now!
X