चपराळा गावावरूनच चपराळा वन्यजीव अभयारण्याचे नाव पडले आहे. महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रुवारी १९८६ मध्ये या क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्य़ाच्या मूलचेरा आणि चार्मोशी या दोन तालुक्यांमध्ये वसले आहे. अभयारण्याचा भूभाग सामान्यत: मदानी स्वरूपाचा आहे. चपराळा गावाजवळच वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम होऊन ती प्राणहिता नावाने पुढे जाते. प्राणहिता नदी चपराळा अभयारण्याच्या पश्चिमेला अगदी जवळ आहे. नदीचे पात्र विस्तीर्ण असून नदीच्या दोन्ही काठाला झाडांची तुंबळ गर्दी आहे.
तेलंगणा राज्याला लागून असलेले महाराष्ट्रातील हे अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा म्हणून काम करतं. दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडीचे (सागवान) वन या प्रकारात हे वन मोडते. चपराळा अभयारण्यात ६९ प्रकारचे वृक्ष, २७ प्रकारच्या वेली आणि ३१ प्रकारच्या गवत प्रजाती आढळतात. अभयारण्यात बिबटय़ा, वाघ, अस्वल, रानमांजर, जंगली कुत्रे, चितळ, चौसिंगा, नीलगाय, तळस, रानडुक्कर, शेकरू, कोल्हे यांसारख्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग, धामन, घोरपड, सरडे आहेत तर घुबड, मोर, पिंगळा, पोपट, खंडय़ा, कबुतर, पांढऱ्या पाठीचे गिधाड, चिरक अशा १९३ पेक्षा जास्त पक्षांच्या जाती येथे आढळतात.
हिवाळ्यात लगाम तलाव, उर्शीकुंटा तलाव, अनखोडा तलाव, मुर्गीकुंटा तलाव यावर चक्रवाक, काळा थिरथिरा, गायबगळे, स्टॉर्क पक्षी भेट देतात. नष्ट होत चाललेल्या गिधाडांच्या तीन प्रजातींपकी दोन प्रजाती चपराळात सापडतात.
चपराळ्याला धार्मिकदृष्टय़ाही महत्त्व आहे. वर्धा-वैनगंगेच्या संगमावर वसलेल्या प्रशांत धाममध्ये हनुमान शिव दैवत आहे. महाशिवरात्रीमध्ये येथे तेलंगणा आणि महाराष्ट्रातून मोठय़ा संख्येने भाविक येतात. अभयारण्याच्या हद्दीत चपराळासह चौडमपल्ली, चंदनखेडी, सिंगनपल्ली, धन्नूर व मरकडा ही सहा गावे आहेत.
[jwplayer 8TJo58cV]
वर्धा-वैनगंगा संगमावर २ किमीची निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात आली आहे. निसर्ग परिचय केंद्रातून अभयारण्याची सविस्तर माहिती मिळते. लगाम तलाव, अनखोडा तलाव, उर्शीकुटा तलाव, मुर्गीकुटा तलाव, सीताबोडी तलाव ही येथील महत्त्वाची पानस्थळे आहेत. हिवाळ्यात परदेशी पक्षी येथे आपण पाहू शकतो. अभयारण्यात पाच पर्यटन मार्ग आहेत. चपराळा येथून वनवैभव- आलापल्ली, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, मरकडेश्वर मंदिर, चार्मोशी, कालेश्वर मंदिर व सोमनूर (प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नदीचा त्रिवेणी संगम), सिरोंचा, हत्ती कॅम्प, कमलापूर, कोलामार्का रानम्हशी संवर्धन राखीव क्षेत्र येथे पर्यटकांना जाता येते. या अभयारण्यात पर्यटकांची फारशी गर्दी दिसत नाही. ज्यांना नीरव शांतता आणि खरं जंगल अनुभवायचं त्यांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्य़ातल्या या वनवैभवाला भेट द्यायला हवी.
कधी जाल?
* १५ ऑक्टोबर ते १५ जून हा कालावधी भटकंतीसाठी उत्तम.
* जवळचे बस स्थानक : अहेरी-
४० कि.मी., गोंडिपपरी- १० कि.मी., चंद्रपूर-चपराळा- ८५ कि.मी.
* जवळचे रेल्वे स्थानक- बल्लारपूर-६५ कि.मी.
* जवळचे विमानतळ- नागपूर</p>
कुठे राहाल?
चपराळा येथे वनविभागाचे विश्रामगृह आहे. तसेच आल्लापल्ली वनविभागाचे आल्लापली आणि मरकडा वनविभागाचे मरकडा वन विश्रामगृह पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.
डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com