महाबळेश्वरला गेल्यावर जी ठिकाणे अगदी आवर्जून पाहिली जातात, त्यातले एक म्हणजे आर्थरसीट पॉइंट. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १४७३ मीटर अर्थात ४४२१ फूट इतकी आहे. इथून दिसणारा देखावा केवळ नयनरम्य असतो. इथून खालच्या बाजूला दिसणारे चंद्रगड, मंगळगड हे किल्ले अतिशय देखणे दिसतात. पायथ्याशी असलेल्या ढवळे गावातून चंद्रगडाला वळसा घालून ढवळ्या घाटाने पाच तासांची चढण चढून आले की आपण येतो ते आर्थरसीट पॉइंटच्या खाली. मुळात याचं नाव आहे मढीमहाल. मग मढीमहालाला आर्थरसीट पॉइंट असे नाव कुठून पडले? त्याच्या पाठीशी एक करुण कहाणी आहे. सर चार्ल्स मॅलेट हा १७९१ साली पुणे दरबारात रेसिडेंट होता. त्याचा मुलगा आर्थर मॅलेट. हा आर्थर मॅलेट मुंबईहून महाबळेश्वरला येण्यासाठी निघाला. त्या काळी हा प्रवासमार्ग काहीसा विचित्र होता. मुंबईहून बाणकोट बंदरापर्यंत बोटीने प्रवास. मग तिथून पुढे सावित्री नदीच्या काठाने महाबळेश्वरकडे असा हा मार्ग होता. हा आर्थर मॅलेट त्याची पत्नी आर. वाय. सोफिया आणि जेमतेम ३२ दिवसांची मुलगी एलेन यांच्यासह मुंबईहून बाणकोटकडे निघाला खरा, परंतु त्याची बोट ऐन वादळात सापडली. त्यात बोटीवरील तेरा खलाशी, मॅलेटची पत्नी आर. वाय. सोफिया आणि त्याची जेमतेम ३२ दिवसांची मुलगी एलेन हॅरिएट यांना जलसमाधी मिळाली. बाणकोटच्या हिम्मतगडाच्या थोडेसे खालच्या अंगाला त्यांचे दफन केले गेले. तिथेच त्यांचे स्मरणस्थळ आहे. सुघड दगडी चौथरा, कळाशीदार स्तंभ आणि त्यावर संगमरवरी शिलाफलक लावला आहे. आर्थर मॅलेट पुढे महाबळेश्वरला पोहोचला. कामातून सवड काढून तो सावित्री नदीच्या उगमाशी एका कडय़ाच्या टोकाशी मढीमहालाशी अत्यंत दु:खित अंत:करणाने टक लावून तासन्तास पाहत बसे. ती जागाच आता आर्थरसीट म्हणून ओळखली जाते. या ठिकाणाहून किंचित खालच्या बाजूला भरोबाचं ठाणं आहे. आर्थरसीट बघायला आल्यावर क्षणभर आर्थर मॅलेटची आठवण जरूर काढावी.

ashutosh.treks@gmail.com