घनदाट जंगलातून वाट काढताना अचानक वाघ समोर यावा, अंगावर रोमांच उभे राहावेत, या देखण्या-रुबाबदार प्राण्याला डोळ्यात साठवून घ्यावं आणि हा थरारक अनुभव गाठीशी घेऊन समृद्ध वनपर्यटनाचा आनंद घेऊन घरी परतावं, असा अनुभव देणारे राज्यातील वाघोबाचे आणखी एक गाव म्हणजे ‘‘पेंच व्याघ्र प्रकल्प’’.
भारत सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) २०१४-१५ मध्ये केलेल्या अभ्यासात राज्यातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांना अतिउत्तम असा दर्जा दिला आहे. म्हणजे काय तर व्याघ्र संवर्धनासाठी इथे अत्यंत पोषक वातावरण असून त्याचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट आहे.
या राखीव क्षेत्रातून उत्तर दक्षिण वाहणाऱ्या जीवनदायिनी पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे. हा व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागांत विभागला गेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प २५७.२६ चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी १९९९ मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला.
नव्यानेच मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्याचे अतिरिक्त क्षेत्र या व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरचा हा व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने संपन्न प्रदेश असून येथे गोंड आणि भिल्ल आदिवासी समाजाचे लोक राहातात. त्यांच्या जगण्याच्या अनोख्या परंपराबरोबर पळसाच्या पानापासून तयार करण्यात येणारी पत्रावळ आणि द्रोण बनवण्याचे त्यांचे कौशल्यही पाहण्यासारखे असते.
नागपूरहून अवघ्या ७० किलोमीटरवर असलेले पेंच अभयारण्य निसर्गप्रेमींना पक्षी निरीक्षकांना, छायाचित्रकारांना आणि सर्व निसर्ग पर्यटकांना सतत खुणावत असते. जैवविविधतेने समृद्ध अधिवास असलेल्या या प्रकल्पात वाघ, चित्ता, जंगली मांजर, जंगली कुत्रा, तरस, कोल्हा, सांबर, हरणं, गवे, नीलगायी, चार शिंग असलेले काळवीट, अस्वल, घुबड यांसारखे प्राणी पाहायला मिळतात.
त्याबरोबरच सर्प गरुड, राखी डोक्याचा मत्स्य गरुड, मोहोळ घार, हळदया, तांबट असे जवळपास २२५ प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. वन पर्यटनाचा समृद्ध अनुभव घ्यायचा असेल तर पेंचला आवर्जून भेट द्यायला हवी.
कसे पोहोचाल?
विमान: नागपूर ७० किमी
रेल्वे: नागपूर ७० किमी
रस्ता- नागपूरहून बससेवा उपलब्ध.
डॉ. सुरेखा म. मुळे drsurkhe.mulay@gmail.com