महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील चंद्रपूर जिल्हा हा सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न आहे. इथे देवस्थाने, मंदिरे, मूर्ती यांचे वैविध्य पाहायला मिळते. भद्रावतीमध्ये असलेले श्री भद्रनाग मंदिर हेसुद्धा असेच एक वैशिष्टय़पूर्ण ठिकाण आहे. हे मंदिर नागाचे आहे. गर्भगृहात नागाची प्रतिमा कोरलेल्या एका मोठय़ा पाषाणाची मूर्ती ठेवलेली दिसते. अनेक मंदिरांत महिलांना प्रवेशासाठी आंदोलने होत असताना या मंदिरात गर्भवती महिलांना प्रवेशास मनाई आहे. मंदिराच्या दगडी खांबांवर कुंभ शिल्पित केलेले दिसतात; परंतु याव्यतिरिक्त इतर काही कलाकुसर दिसत नाही. गाभारा पूर्वाभिमुख असून सभामंडपात एक विष्णूची मूर्ती दिसते. आवारात एक सप्तमातृकांचा वेगळ्याच धाटणीचा पट्टा ठेवलेला दिसतो. मंदिरच्या आवारात पायऱ्या असलेली खडकात खोदलेली एक विहीरसुद्धा आहे.
याच परिसरात सात नाग आहेत आणि ते एकमेकांचे बंधू आहेत, असे सांगितले जाते. त्या सात नागांची स्थाने जवळपासच्या परिसरातच आहेत. त्यातला एक हा भद्रनाग, दुसरा नागसेन, तिसरा दुधाळा तलावावरचा, चौथा मोबाळा गावचा चिंतामणी नाग, पाचवा बारी सोसायटीजवळचा नाग, सहावा निलांबरी मंदिरातला नाग आणि सातवा भटाळा इथला नाग. हे सर्व नागबंधू एकमेकांना भेट देतात अशी इथे श्रद्धा आहे. भद्रनाग मंदिराच्या नागाच्या मूर्तीखाली एका चौकोनी ओटय़ावर कोणा नागराजस्वामींची समाधी आहे, असे सांगतात. त्या ओटय़ावरच नंतर नागाची प्रतिमा बसवली गेली; पण हे नागराजस्वामी कोण, कोठले, याचा काही पत्ता लागत नाही.