‘शिक्षणातील दहा गाभा तत्त्वांपकी वैज्ञानिक दृष्टिकोन हे पहिले तत्त्व आहे. याचा अभाव आपल्या शिक्षणात दिसून येतो’ असे निरीक्षण ‘कसा रुजावा वैज्ञानिक दृष्टिकोन?’ या पत्रात (लोकमानस १५ सप्टें.) आहे, त्याच्याशी मी पूर्णत: सहमत आहे. प्राथमिक शिक्षणापासून पदवीपर्यंतच्या शिक्षण क्रमात वैज्ञानिक दृष्टिकोन संवर्धनाचा जाणीवपूर्वक समावेश करायला हवा. पण हे होणे दुरापास्त आहे. कारण (१) अभ्यासक्रम ठरविणाऱ्या समित्यांचे बहुतांश सदस्य हे श्रद्धाळू, देव-धर्मभक्त असतात. जिथे श्रद्धा असते तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन संभवत नाही. (२) शालेय शिक्षक, प्रशालांतील अध्यापक हे बहुसंख्येने रूढीग्रस्त श्रद्धाळू असतात. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे संशोधकांची आणि त्यांनी लावलेल्या शोधांची नावे, त्यांचे थोडेफार चरित्र, त्यांच्या बालपणीचे खरे-खोटे किस्से यांची माहिती, ‘विज्ञानाचे फायदे आणि तोटे’ याविषयी ठरावीक पठडीतील निबंध लिहिणे, पाठ केलेले ठरावीक मुद्दे वाद-विवादात मांडणे अशी त्यांची कल्पना असते. (३) बहुसंख्य महाविद्यालयीन प्राध्यापकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वावडेच असते. एखाद्या तत्त्वाची, नियमाची चिकित्सा कशी करावी, ते वास्तवाशी कसे ताडून पाहावे, मूलभूत विचार कसा करावा, तर्कशुद्ध युक्तिवाद कसा मांडावा, याविषयी ते विद्यार्थ्यांना काहीच सांगत नाहीत. तसेच देव-धर्म-श्रद्धा यांनी सतत दुमदुमत असणारे आपले सामाजिक वातावरण वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी पूरक नाही. किंबहुना हानीकारक आहे.

– प्रा. य. ना. वालावलकर

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

घरकामगार धोरणानंतर कंत्राटीकरणाचा धोका?

घरेलू कामगारांना महिना नऊ हजार रुपये पगार (आठ तास कामासाठी) आणि वार्षिक १५ दिवस रजा आदी तरतुदींचा समावेश केंद्रीय श्रमखात्याने प्रस्तावित केलेल्या नव्या धोरणामध्ये आहे (संदर्भ : ‘घरकामगारांचे सुखसमाधान’- लोकसत्ता ८ सप्टेंबर) पण हे सर्व नियमानुसार व सही-शिक्क्याने झाल्यास या नऊ हजारांतून व्यवसाय कर व सेवा कर वजा केल्यास कामगारांच्या हाती पाच ते सहा हजार रुपयेच पडणार. यातून पळवाट किंवा या महागाईवर उपाय म्हणून केरलादीचे काम करणारी ‘क्लीनिंग एजन्सी’ निघाली, तर घरेलू कामगार बेकार तरी होतील किंवा त्यांच्या कामाचे कंत्राटीकरण होऊन कॉन्ट्रॅक्टरच गबर होतील.
– सुमेधा लोटलीकर, ठाणे पश्चिम

केवढा हा विरोधाभास!

‘गुळासारखा गुळदगड’ आणि ‘वार्ता विघ्नाची नुरवी’ हे दोन्ही लागोपाठचे (१६ व १७ सप्टेंबर) अग्रलेख. परंतु दोघांत अगदी टोकाचा विरोधाभास. पहिल्यात महाराष्ट्राला व देशाला आपली प्रतिगामी ओळख विसरून पुरोगामित्वाकडे कशी वाटचाल करता येईल हे अगदी आजच्या उदाहरणांसह स्पष्ट करणारा. समाजजीवन आणि राजकारण यांपासून धर्म हा चार हात लांबच ठेवावा हे अतिशय नेमक्या आणि मार्मिक भाषेत वाचकांसमोर मांडणारा हा अग्रलेख प्रशंसनीयच. सरकारवर एक दबावगट म्हणून वृत्तपत्रांची भूमिका असते, ती या लेखाने पार पाडली.
परंतु दुसरा अग्रलेख अगदी याउलट. या संपूर्ण लेखाचा रोख किंवा दिशा गणेशाचे आगमन होते आहे म्हणून श्रीगजाननाला संपूर्ण शरण जाऊन आपली (राज्याची) सुख-दुखे त्याच्यासमोर मांडून, ‘तूच आता कर्ता-धर्ता’ या प्रकारची आहे. ‘तू आमचा पिता आहेस, तूच आमचा त्राता आहेस’ हे असले वाक्य एखाद्या विद्यार्थ्यांने लिहिलेल्या निबंधाला १० पैकी १० गुण मिळवून देईलही. परंतु एका, लोकांच्या कसोटीला उतरलेल्या दैनिकाच्या अग्रलेखात असे अलंकारिक शब्द शोभत नाहीत. ‘लोकसत्ता’चा वाचकवर्ग विचार करणारा आहे आणि विचारी वाचकांची मते घडविण्याचे काम एरवी अग्रलेख करीत असतात.
महाराष्ट्राला दुष्काळाने ग्रासले, हे श्रीगणेशाला का सांगायचे? मागच्या १५-२० वर्षांत ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी पाणी जिरवण्यासाठी जनतेचा पैसा न वापरता त्यावर इमले उभारले, म्हणून आजही पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यात श्रीगणेशाची काय चूक? ..हे म्हणजे ‘द गार्डियन’सारख्या दैनिकाने युरोपात स्थलांतरित होत असलेल्या सीरियन/ कुर्दाचे गाऱ्हाणे ‘देवाच्या लाडक्या पुत्रा’समोर मांडण्यासारखे झाले.
अखेर, देशाची घटना हाच आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. मग कुणी भगवद्गीतेला किंवा कुराणाला राष्ट्रीय ग्रंथ जाहीर करा, अशी कितीही मागणी करो. तसे झालेले नाही, त्यामुळे या मागण्या निर्थक बरळणेच मानून त्याकडे दुर्लक्ष करावे. राज्यघटनेला अनुसरून सरकारने आणि माध्यमांनी धर्मनिरपेक्ष राहावे, ही अपेक्षा.
– अभिजीत भुजाडी, पुणे.

हतबलतेला बळी पडू नये

‘वार्ता विघ्नाची नुरवी’ या अग्रलेखातून (१७ सप्टें.) बाप्पाशी साधलेला संवाद यथायोग्य वाटला. गतवर्षीच्या संकटांना तोंड देताना मनाला विघ्नहर्त्यांची ओढ लागलेली असते. आता अनंत चतुर्दशीपर्यंत त्याच्या सहवासात राहून, थकलेलं मन आणि शरीर पुन:प्रज्वलित करून पुढील सुखदु:खांच्या प्रवासासाठी सज्ज व्हायचं. पण म्हणून, विघ्नहर्ता बाप्पा आपली सारी विघ्नं, संघर्ष नाहीसे करील हा विचारच मुळी हतबलतेचं लक्षण आहे. ‘बुद्धीचं दैवत’ असलेला बाप्पा अशा हतबलतेच्या, अगतिक विचारांपासून दूर राहण्याची बुद्धी आपणा सर्वाना देवो, एवढीच हतबलतेला बळी न पडलेल्या एका भक्ताची मागणी.
– अन्वय वसंत जावळकर, अमरावती.

तरुणांची चौकस बुद्धी जाते कुठे?

‘धर्मनिरपेक्षतेची अग्निपरीक्षा’ हा योगेंद्र यादव यांचा लेख (देशकाल, १६ सप्टेंबर) वाचला आणि पटला. ‘सामाजिक समता’ हे राज्यघटनेतील मूल्य धर्मनिरपेक्षता या तत्त्वातून अभिव्यक्त होते. सद्य:स्थितीत या तत्त्वाचा अर्थ कसा बदलला आहे, हे योगेंद्र यांनी त्या लेखात नेमकेपणाने सांगितले आहे. सध्या हे तत्त्व जोपासणाऱ्यांनाच देशद्रोही ठरवण्यापर्यंत काही महाभागांची मजल जाते; कारण धर्मनिरपेक्षतेतला गर्भितार्थ समजण्याएवढी त्यांची वैचारिक पातळी खोल नसते, हेच असावे. व्यावहारिक पातळीवरदेखील एखाद्या गोष्टीची चर्चा करताना हे तत्त्व जोपासणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही दोन धर्मामधील अथवा त्या धर्माच्या लोकांमधील गुणदोष सांगितले, तर ती व्यक्ती एका धर्मा‘विरुद्ध’ आणि दुसऱ्या धर्माच्या ‘बाजूने’ बोलत आहे, अशी निर्थक समजूत करून घेणारे (आणि काही वेळा तशी बोंबच अधिक करणारे) लोक भरपूर आहेत. भारतात प्रत्येक धर्मात असे गट आहेत की जे त्या-त्या धर्माच्या तरुणांच्या मनावर, त्या-त्या धर्माच्या कट्टरवादाची मोहोर उमटवू पाहतात. हा ‘आभासी कट्टरवाद’च, कारण वास्तवात जर धार्मिक कट्टरवाद म्हणजे स्वत:च्या धर्माचे काटेकोरपणे पालन, तर या ‘आभासी कट्टरवादा’चा भर स्वत:चा धर्म सोडून इतर धर्मीयांना किती तुच्छ लेखतो अथवा त्यांचा किती द्वेष करतो, यावरच असतो.
या आभासी कट्टरवादालाच राष्ट्रप्रेम, राष्ट्रकारण अशी नावे दिली जातात आणि तरुणांना ती पटतात.. तेव्हा असे वाटते की, अशा वेळी कुठे जाते एकविसाव्या शतकातल्या -संगणक युगातल्या- तरुणांची चौकस बुद्धी? समाजाबद्दल या तरुणांमध्ये विविध कारणांनी उदासीनता आहे, रोषही आहे. या भावनांचा गैरफायदा काही स्वार्थी मंडळी, तरुणांना धर्माच्या नावाखाली भडकावून घेत आहेत. आजच्या तरुणांना ‘फुकट मिळालेले स्वातंत्र्य’ उपभोगताना, पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी ज्या सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी रक्ताचे पाणी केले, त्यांची आठवणही अशा वेळी येत नाही!
– विलास लक्ष्मण शिंदे, विक्रोळी पार्कसाइट (मुंबई)