‘अजित पवारांना निर्दोषत्व’ ही बातमी (लोकसत्ता, ६ डिसेंबर) वाचली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधीक्षकांनी त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. अजित पवार यांनी दोन आठवडय़ांपूर्वी बंडखोरी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हाही सिंचन घोटाळ्यातील फायली बंद केल्या होत्या. याचा अर्थ, आता विरोधकही याबद्दल आवाज उठवणार नाहीत. जेव्हा हा गैरव्यवहार झाला, त्याविरोधात अभियंता विजय पांढरे यांनी आवाज उठवला होता. त्यांना तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी वेडे ठरवले. पांढरे यांची मानसिक स्थिती बिघडलीय, असे निर्लज्ज उद्गार काढले. तेव्हा पांढरे मात्र एकटे शांतपणे आणि तळमळीने भ्रष्टाचार कसा झाला, ते सांगत होते. पांढरे यांना आणि सामान्य जनतेलाही अशी अपेक्षा होती की, फडणवीस सरकार भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा करेल; पण त्या सरकारने त्या दृष्टीने ठोस पाऊल उचलले नाही. आताचे सरकार काही करेल अशी अपेक्षादेखील नाही. ज्या गैरव्यवहारामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, आता त्यावर पांघरूण घालून आम्ही शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत, हे दाखवले जाईल. इथून पुढे कुणी अधिकारी विजय पांढरे यांच्यासारखी कृती करायला धजावणार नाही. शेतकरी अधिक पिचला जाणार. आता हे निर्दोष नेते लवकरच मंत्रिपदाची शपथ घेतील. हे सगळे संतापजनक आहे.

– सतीश देशपांडे, खुडूस (ता. माळशिरस, जि. सोलापूर)

इतक्यात निष्कर्षांप्रत येणे आत्मघातकी ठरेल!

‘हिंदुत्व : भाजपचे आणि शिवसेनेचे’ हा अब्दुल कादर मुकादम यांचा लेख (६ डिसेंबर) वाचला. लेखात भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात गुणात्मक फरक कसा आहे, याबाबत लेखकाने केलेली चर्चा अतिउत्साही आणि वास्तवाला सापेक्ष-नैतिक चौकटीत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न वाटतो. मुदलातच तिपाईवर उभ्या असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन १५ दिवस पूर्ण झाले नसताना, शिवसेनेच्या हिंदुत्वाला भाजपच्या हिंदुत्वापेक्षा गुणात्मकदृष्टय़ा वेगळे करून आर्थिक-भौतिक विकासाशी जोडण्याचा महाराष्ट्रातील काही उत्साही पुरोगाम्यांनी चालविलेला खटाटोप अंगलट येण्याचीच अधिक शक्यता आहे. उभय पक्षांच्या स्थापनेवेळी उपलब्ध असलेली समाज-भौतिकी परिस्थिती, राजकीय अग्रक्रम वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या हिंदुत्व संकल्पनेत तात्त्विक फरक दिसत असला, तरी मागील चार दशकांच्या त्यांच्या एकत्र संसारात व्यावहारिक पातळीवर कमालीचे साधर्म्य दिसून आले आहे. परंपराभिमान मिरविणे असो की अस्मितांना कुरवाळणे; भाजपपेक्षा सेना दोन पावले पुढे राहिली आहे. मुंबईमधील कामगारांचे संप उधळून लावणे असो की बाबरी मशीद पडल्याचा अभिमान बाळगणे असो, बागेमधील प्रेमी युगुलांना दमदाटी करणे असो की सरकारी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यापासून त्याला धडा शिकविण्यापर्यंतचा संपूर्ण व्यवहार ‘धर्मनिरपेक्षते’च्या कोणत्या वर्गकोटीत बसतो, याचे उत्तर लेखक देतील काय?

भाजपचे हिंदुत्व मुस्लीम द्वेषावर जसे पोसले आहे, तसे शिवसेनेचे हिंदुत्व अराजकाच्या टोकावर उभे राहिले आहे. बहुसंख्याकवाद हाच उभयतांच्या हिंदुत्वाचा आधार आहे. भाजपच्या हिंदुत्वाचे दुष्परिणाम आज संपूर्ण देश अनुभवतो आहे. अशा स्थितीत सत्ताभिलाषेपोटी तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी हिंदुत्ववादी पक्षाशी केलेल्या सोयरिकीची तटस्थ समीक्षा करण्याऐवजी शिवसेनेच्या हिंदुत्वालाच नेमस्त चौकटीत टाकण्याचा चालविलेला प्रयत्न अंगलट येण्याचीच शक्यता आहे. भगवी वस्त्रे टाकून शुभ्र वस्त्रे परिधान केल्याने हिंदुत्वाची जातकुळी बदलत नसते. सेनेच्या हिंदुत्वाला पारखण्यासाठी आणखी काही वेळ जाऊ द्यावा लागेल, इतक्यात निष्कर्षांला येणे आत्मघातकी ठरेल.

– प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे, नांदेड</strong>

आता साखर उद्योगानेच योग्य तो तोडगा काढावा

‘अर्थशास्त्राच्या बांधावरून..’ या सदरातील राजेंद्र सालदार यांचा ‘यंदाचा हंगाम धकून जाईल; पुढे?’ हा लेख (५ डिसेंबर) वाचला. लेखात काटेमारी, सरकारी मदत अन् ऊस क्षेत्रावर निर्बंध या तीन घटकांवर विवेचन आहे. लेखकाने मांडलेले मुद्दे शेतकऱ्यांची सद्य:स्थिती दर्शवतात. साखरसम्राटांसाठी ऊस उत्पादक हा निव्वळ ‘उत्पादक’च असतो. हे साखरसम्राट ऊस कवडीमोलाने खरेदी करतात, तेव्हा होणाऱ्या यातना शेतकऱ्याशिवाय आणखी कोण समजणार? वजन काटय़ातला घोळ तर सर्वदूर परिचित आहे. सरकार या उद्योगात मदत करू शकते, पण त्यांनाही मर्यादा आहेत. निव्वळ साखर उद्योग नसून, राज्यात हजारो उद्योगधंदे आहेत. प्रत्येकाला अनुदान देत गेल्यास राज्य भिकेला लागण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे साखर जगतानेच यावर योग्य तो तोडगा काढावा. ऊस क्षेत्राचे ठरावीक विभाग पाडून त्यांच्या लागवडीवर काटेकोर लक्ष ठेवायला हवे.

– संतोष काशिद, कवठे (ता. कराड, जि. सातारा)

किती काळ बोटी उलटत राहणार?

‘मालवण येथे बोट उलटून महिलेचा बुडून मृत्यू’ ही बातमी (लोकसत्ता, ६ डिसें.) वाचली आणि अंगावर सर्रकन काटा आला. गोष्ट २०१६ च्या दिवाळीतल्या पाडव्याच्या संध्याकाळची. आम्ही पती-पत्नी, आमच्या दोन मुली, जावई आणि दोन वर्षांची नात दिवाळीत मालवणला गेलो होतो. दिवाळी असल्याने देवबाग अतिशय निवांत होते, बोट सफर घ्यायला कुणी नसल्याने आम्हा पाच जणांसाठी बोट सुटली. आम्हाला लाइफ जॅकेट्स दिली गेली नसल्याचे आम्हा कुणाच्याच लक्षात आले नाही. बोट संगमावर गेली, तोच एक मोठी लाट आली आणि क्षणार्धात आमची बोट उलटून आम्ही सगळे पाण्यात पडलो. बोटवाला ‘बोट पकडून ठेवा,’ अशा सूचना देऊ  लागला. पण ते अजिबात सोपे नव्हते. पाण्याचा जोर आणि हेलकावे घेणारी जड बोट. श्वाससुद्धा घेता येत नव्हता. १०-१५ मिनिटे गेली असतील, एक बोट जवळ आली. त्यांच्याकडे लाइफ जॅकेट्स होती, ती त्यांनी आमच्याकडे टाकली. तोवर त्याने शिडी पाण्यात सोडली. ती हातात धरून आम्ही बोटीत चढलो. अक्षरश: त्या पाडव्याला आम्हा सर्वाना जीवदान मिळाले असे म्हणायला हवे.

बाहेर आलो. एका बोटवाल्याने चहा पाजला आणि म्हणाला, ‘‘कृपया पोलीस तक्रार करू नका, नाही तर ऐन दिवाळीत आमचा व्यवसाय बुडेल. आता लाइफ जॅकेट दिल्याशिवाय आम्ही बोट समुद्रात लोटणार नाही, हा आमचा शब्द.’’ आम्ही त्यावर विश्वास ठेवला. पण ताजी बातमी वाचली आणि लिहिल्यावाचून राहवले नाही. तीन वर्षे उलटून गेलीत, तरी बोट उलटलेल्या बातम्या अजूनही अधूनमधून वाचायला मिळतात. आता तरी याकडे गांभीर्याने बघायला हवे. सुरक्षेचे नियम पाळले जायलाच हवेत. शिवाय या दुर्घटना टाळणे आपल्यासुद्धा हातात आहे. भरतीची वेळ, बोटीतली गर्दी, लाइफ जॅकेट हे सगळे पाहिल्याशिवाय कुणी बोटीत बसू नये, ही कळकळीची विनंती.

– नीलिमा बोरवणकर, पुणे</strong>