‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता..’ या उपक्रमात घेतलेल्या अंजली भागवत यांच्या मुलाखतीचा सारांश (२५ जुलै) वाचला. ‘सध्याच्या खेळाडूंमध्ये उत्कटतेचा अभाव जाणवतो’ हे त्यांचे निरीक्षण अगदी खरे आहे; परंतु त्याचे मूळ कारण वेगळे आहे असे वाटते. खेळाडूंचे खेळावर प्रेम नसणे, त्यांना खेळापेक्षा पदके, झटपट यश यातच रस असणे, हे उत्कटतेच्या अभावाचे मूळ कारण वाटत नाही. इंटरनेट, समाजमाध्यमे, जागतिकीकरण अशा कारणांमुळे जग खूप जवळ आले आहे. अहोरात्र माहितीचा भडिमार आणि ‘एक्सपोजर’चा अतिरेक होतो आहे. शाळेतील अभ्यासाखेरीज बुद्धिबळापासून टेनिस आणि क्रिकेटपर्यंत डझनभर खेळ खेळणे, पोहणे, ‘बॉलीवूड डान्स’पासून ‘भरतनाटय़म’पर्यंत नृत्य, व्हायोलिन ते गिटार अशी वाद्ये, असे सगळेच मध्यमवर्गीय शहरी मुलांना करायला मिळते. निम्न उत्पन्न गटात किंवा खेडोपाडी हे सारे निदान बघायला तरी मिळतेच. पालकांची इच्छासुद्धा पाल्यांना हे सगळेच ‘भरभरून’ देण्याची असते. नकळत्या वयात इतक्या साऱ्या गोष्टी रोज थोडय़ाशा वेळात अनुभवायच्या असतील तर त्यातील एखाद्याच गोष्टीवर उत्कट प्रेम बसणार तरी कधी आणि कसे?  कशातच धड जीव नाही म्हटल्यावर मग खेळाच्या आनंदापेक्षा पदके आणि प्रसिद्धी याकडेच ओढा असणार (आणि तीही मिळणार नाहीतच!) हे ओघानेच आले. असंख्य पर्यायांचा अतिरेक, त्यातून एकाची निवड न करता आल्यामुळे येणारी चंचलता आणि ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी परिस्थिती जर प्रयत्नपूर्वक टाळता आली नाही तर उत्कटतेचा स्पर्श होणे शक्य नाही असे वाटते.

– विनीता दीक्षित, ठाणे</strong>

यूजीसीने दिलेली माहिती अर्धसत्य सांगणारी..

‘अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही’ ही यूजीसीने न्यायालयात दिलेली माहिती (वृत्त : लोकसत्ता, २५ जुलै) अर्धसत्य सांगणारी आहे. यूजीसीची तत्त्वे बंधनकारक असली तरी राज्य शासनाने त्या त्या परिस्थितीत त्यांस मान्यता दिली तरच विद्यापीठांना यूजीसीच्या तत्त्वाप्रमाणे काम करता येते. याव्यतिरिक्त सध्या आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ आणि महासाथ नियंत्रण कायदा लागू असल्याने त्या त्या राज्यात त्या वेळी असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार राज्य शासनास आहे. या कायद्यानुसार इतर सर्व कायदे बासनात गुंडाळून ठेवावे लागतात व आपत्ती व्यवस्थापनासच प्राधान्य द्यावे लागते. यूजीसीनेसुद्धा आपल्या २९ एप्रिल २०२० च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शेवटच्या चार ओळींत हे मान्यच केलेले आहे.

असे नसते तर, महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम १७ मार्च रोजी टाळेबंदी जाहीर केली त्या वेळी अनेक विद्यापीठांत परीक्षा सुरू होत्या; मात्र टाळेबंदी जाहीर होताच विद्यापीठांनी या परीक्षा रद्द केल्या. या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठांना कोणी दिला होता? यूजीसीने तर त्या वेळी कोणतेही परिपत्रक काढले नव्हते. यूजीसीचे परिपत्रक २९ एप्रिल रोजी आले. खरे तर यूजीसीचे परिपत्रक निघेपर्यंत विद्यापीठांना परीक्षा घेता आल्या असत्या. तरीही विद्यापीठांनी परीक्षा १७ मार्चनंतर सुरू ठेवल्या नाहीत. कारण राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू करून टाळेबंदी जाहीर केली होती. याचाच अर्थ असा की, आपत्ती व्यवस्थापन कायदा व महासाथ नियंत्रण कायदा  यूजीसीच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांना अधिक्रमित करू शकतो आणि असे नसेल तर विद्यापीठांनी कोणत्या कायद्याच्या आधारे या परीक्षा रद्द केल्या याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. अन्यथा कोणत्याही कायद्याचा आधार नसताना विद्यापीठांनी स्वत:हूनच परीक्षा रद्द केल्या असे समजून अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या घोळासाठी विद्यापीठांनाच जबाबदार धरावे लागेल.

– डॉ. राजेंद्र कांकरिया (माजी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ), पुणे</strong>

थोरल्या पातीने लक्ष देण्याची गरज..

कुष्ठरुग्णांच्या पुनरुत्थानासाठी ज्यांनी आपले सर्व आयुष्य वेचले, अपार कष्टाने व प्रचंड इच्छाशक्तीने ‘आनंदवन’सारखे नंदनवन उभारले व तीर्थस्थळाप्रमाणे पवित्र केले, त्या बाबा आमटे यांच्या आनंदवनातील आनंद कसा हिरावून घेतला जात आहे याचा प्रत्यय या संदर्भात दोन भागांत प्रसिद्ध झालेली ‘दुभंगलेले आनंदवन’ ही वृत्तमालिका (लोकसत्ता, २५ व २६ जुलै) वाचून आला. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध वाचून विद्यमान व्यवस्थापनाकडून संवेदनशून्य कारभाराचे दर्शन झाले. बाबांचे त्या ठिकाणी असणाऱ्या कुष्ठरोग्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे हे उद्दिष्ट होते. उत्पादननिर्मिती करून नफेखोरी करणे हा खचितच उद्देश नव्हता. ठेकेदारीच्या माध्यमातून आर्थिक उत्कर्ष व संस्थेचा कारभार कॉर्पोरेट पद्धतीने करण्याचे समर्थन जर धाकटी पाती करणार असतील, तर बोलणेच खुंटले. मध्यंतरी वर्धा येथील गांधी ट्रस्टमधील संस्थांतर्गत वादाच्या बातम्या माध्यमांत झळकत होत्या. त्यामुळे सांप्रतकाळी आदर्शवत असे काही उरणारच नाही काय, अशी भीती वाटते व साऱ्यांचेच पाय मातीचे हे कळून चुकले. शेवटी आनंदवनच्या कारभारात थोरल्या पातीने लक्ष घातल्यास सुधारणा होऊ शकेल. अजूनही वेळ गेलेली नाही.

– जयंत पाणबुडे, सासवड (पुणे)

मौन बाळगून समस्या सुटणार नाही..

‘दुभंगलेले आनंदवन’ या वृत्तमालिकेत आनंदवनाची दुर्दशा वाचली. लहानपणी शालेय पुस्तकात बाबा आमटे आणि त्यांच्या या कार्याविषयी वाचले होते. नंतरही माध्यमांतून माहिती मिळत होती. कुष्ठरोग्यांसाठी पुनर्वसन प्रकल्प इतक्या मोठय़ा प्रमाणात कोणी उभारल्याचे ऐकिवात नाही. तसेच त्याचा विस्तार आणि पीडित वर्गाला मिळालेली नवीन जीवनाची दिशा याबाबत अनेक दाखले ऐकले आणि  वाचले होते. तसेच यानिमित्ताने प्रकाश आमटे यांचे नाव फार वेळा वाचल्याचे स्मरते. तेच या संस्थेत गेली १५ वर्षे आले नाहीत हे फारच धक्कादायक आहे.

बाबा आमटे यांचे मूळ उद्दिष्ट जर आता पूर्ण होत नसेल, तर त्या वेळचे सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना दु:ख होणे साहजिकच आहे. तसेच आमटेबंधू यांनी मिठाची गुळणी धरून समस्या सोडवण्यास मदत होणार नाही. आयत्या मिळालेल्या संस्थेवर येऊन बसलेले बाजूला केल्याशिवाय या वनात परत आनंद निर्माण होणार नाही. मात्र, त्यासाठी पुढाकार घ्यायला कोणी तयार नाही असे दिसते. तेव्हा आपल्या हाताने आपलेच राज्य घालवणे आणि ते उघडय़ा डोळ्यांनी पाहात बसणे याशिवाय काय वेगळे घडणार?

– दिनेश कुलकर्णी, नाले गाव (जि. अहमदनगर)

बाबा आमटेंच्या स्मृतिवस्तू पाहायला मिळाव्या

‘आनंदवन’ म्हटले की बाबा आमटे व साधनाताई आमटे यांचेच नाव आधी आठवते. तीच महारोगी सेवा समितीची वा सर्व प्रकल्पांची ओळख आहे. ज्या बाबा व ताईंनी जिवाचे पाणी केले, रक्त आटवले त्यांच्या आठवणी जपाव्यात, पण त्यांची विटंबना होते आहे. बाबा व ताईंची ज्या घरात प्राणज्योत मालवली त्या ठिकाणची अवस्था फारच वाईट आहे. त्या घराला कुलूप आहे. बाबांच्या अंत्यविधीस देण्यात आलेला तिरंगा, त्यांनी वापरलेल्या वस्तू, कॉट, गाडी, त्यांनी वापरलेले कपडे, चप्पल, काठी, जेवणाची भांडी वगैरे साहित्य आहे. तसेच ताईंचेही आहे. हे सामान एका खोलीत ठेवले आहे. ते भेटीस आलेल्या लोकांना पाहण्यास ठेवावे अशी साधी मागणी होती. त्याची साधी निगा नाही ना स्वच्छता. त्याच बाबा व ताईंच्या घरातील दुसऱ्या खोलीत पाच वर्षे डॉ. शीतल आमटे यांचे लाडके कुत्रे ठेवले जात व त्या ठिकाणी इतरांना जाण्यास बंदी होती व आहे. इतकी विटंबना का व कशासाठी?

आजही कोणी विचारले की बाबा व ताई ज्या घरात आयसीयू केले होते ते कुठे आहे? उत्तर मिळत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. आनंदवनात कोणाला अत्यंत कठीण परस्थितीत गाडी  हवी असेल तर मिळत नाही. पण शीतल यांचे नवे कुत्रे पुण्याहून आणण्यासाठी इनोव्हा जातात. त्यांना फिरायला व हॉस्पिटलला जायचे असेल तर याच इनोव्हा गाडय़ा वापरल्या जातात. कुत्रे संस्थेचे आहेत की व्यक्तिगत आहेत?

आज आनंदवनात प्रचंड दहशत शीतल व गौतम यांची आहे. कोणी कोणाला बोलत नाही. बोलले तर लगेच चौकशी होते. हाकलून देईन, पगार बंद करेन, अशा धमक्या दिल्या जातात. ज्या बाबांनी व ताईंनी प्रेमाने माणसे आपली केली त्या संस्थेत अशी अमानवी वागणूक मिळणे धक्कादायक आहे.  ‘आनंदवन’शी, बाबा आमटेंशी मी ३६ वर्षांपासून निगडित आहे. भारत जोडो अभियानातही होतो. ‘लोकसत्ता’तील आनंदवनाशी संबंधित दोन्ही बातम्यांशी (२५ व २६ जुलै) मी सहमत आहे.

– दगडू लोमटे , अंबेजोगाई

कुरुंदकरांच्या धर्मविषयक मतांबाबत गैरसमज नको!

‘लोकमानस’मध्ये ‘हे म्हणण्यास मुस्लीम नेते तयार होतील काय?’ हे वाचकपत्र (२३ जुलै) आणि त्यावर बेतलेले ‘गरज आहे ती मुस्लिमांवर विश्वास दाखवण्याची..’ (२४ जुलै) अशी दोन पत्रे वाचली. पहिल्या पत्रात नरहर कुरुंदकरांच्या काही विधानांचा उल्लेख आहे आणि त्याचाच आधार घेऊन दुसरे पत्र आहे. पहिल्या पत्रात दिलेली विधाने ‘शिवरात्र’ या लेखसंग्रहातून घेतल्याचा उल्लेख आहे. ही विधाने ज्या लेखातली आहेत तो लेख १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जी. एम. बनातवाला हे संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असताना दिलेल्या एका मुलाखतीच्या निमित्ताने लिहिला होता. त्या लेखाचे शीर्षकही ‘श्री. बनातवाला यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने..’ असे आहे. पत्रात दिलेली सर्व विधाने वा प्रश्न या लेखात विविध ठिकाणी आलेली आहेत. मुळात या लेखात जे प्रश्न विचारले आहेत, ते बनातवाला यांना विचारलेले आहेत. विशेषत: ‘अशा वेळी आपण धर्म गुंडाळून ठेवू आणि भारताच्या प्रतिष्ठेसाठी मुसलमानपण विसरू हे स्पष्टपणे म्हणण्यास ते तयार आहेत काय?’ यातले ‘ते’ म्हणजे बनातवाला आहेत हे लेखातील त्याअगोदरच्या वाक्यावरून अगदी स्पष्ट होते. दोन्ही पत्रलेखकांनी मांडलेली मते ही त्यांची स्वत:ची आहेत आणि तो त्यांचा अधिकार मान्य आहे. परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक जडघडणीत मोठा वाटा असणाऱ्या विचारवंत कुरुंदकर गुरुजींच्या सर्वच धर्माविषयीच्या मतांबाबत कोणाचाही गैरसमज होऊ नये !

– शुभानन आजगांवकर, ठाणे