19 January 2021

News Flash

विदेशात गेले की मोदींची भाषा बदलते!

मोदी सरकार सत्तेत येऊन दोन वष्रे झाली.

मोदी सरकार सत्तेत येऊन दोन वष्रे झाली. त्मात्र गेल्या दोन वर्षांत सामुदायिक जबाबदारीच्या तत्त्वाला सरकारमधील भाजप, शिवसेना, अकाली दल यांनी पूर्ण तिलांजली दिल्याचे दिसते. दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीच आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत. देशात असतानाची भाषा परदेशात यू टर्न घेते. परदेश दौऱ्यावर गेल्यावर त्यांच्या तोंडची भाषा ऐकून कौतुक वाटतं. आता कुठं भारतातील सर्वात्मका दिसू लागते, सर्वधर्मसमभाव जागा होतो, भारतातील विविधतेतील एकतेचा, तरुणाईचा, महापुरुषांच्या विचारांचा स्वर ते आळवू लागतात. राज्यघटनेला धर्मग्रंथ मानतात. विकासाचा आवाज इतका बुलंद होतो की, त्या आवाजात सद्य:स्थितीतील देशात चालू असलेल्या किंवा भडकविण्याच्या तयारीत असलेल्या धार्मिक दंगली, शेतकरी आत्महत्या, समाजसुधारकांच्या हत्यांचे व त्या घडवून आणणाऱ्यांचे ‘उघड समर्थन’ केले जाते. ज्या राष्ट्रपित्याच्या नावाशिवाय यांचा एकही दिवस जात नाही त्याच ‘राष्ट्रपित्याच्या खुन्याचे उघड समर्थन’ हे सर्व झाकून जाते. दौऱ्यावरच्या भाषेच्या विरुद्ध चाललेले ‘संघ’टित प्रयत्न यांना कसे दिसत नाही. आजपर्यंत मोदी याविषयी काहीच का बोलत नाहीत? कोणीही विरोधी बोलले की भक्तमंडळी एकदम भडकून त्या मत व्यक्त करणाऱ्या माणसाला पाकिस्तानात पाठविण्याचे फर्मान काढतात. सत्तेत असलेले वाटेकरीच सरकारला ‘निजामशाही’ची उपमा देतात यावरून सरकारची सामुदायिक तत्त्वे लक्षात येतात.
– सचिन आनंदराव तांबे, पिपळसुटी, ता. शिरुर, जि. पुणे

ओव्हरड्राफ्टची जाणीव ठेवावी
गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी या वर्षी सर्व जलाशयांतील पाणीसाठे संपल्यावर नाइलाजाने जलाशयातील मृत साठय़ातून पाणी घ्यावे लागले व तेसुद्धा जवळजवळ संपुष्टात आले आहेत. एका परीने आपण जलाशयातून ओव्हरड्राफ्ट घेतला आहे. आता येणाऱ्या पावसाळ्यात व पुढील वर्षी पाणी वापरताना, घेतलेल्या ओव्हरड्राफ्टची आठवण ठेवून पाणी प्रथमपासूनच काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.
-वि. म. मराठे, सांगली

डॉ. लहाने यांना आहे तिथेच पदोन्नती द्यावी
डॉ. लहाने यांच्या बदलीची बातमी (१० जून) वाचली. ७५० कोटी रुपये आले आणि डॉक्टर गेले असेच म्हणावे लागेल. सगळे काही आपल्याच ‘तावडीत’ पाहिजे हा महापुरुषी फोटो हव्यास कोणत्या चंदनवाल्यासाठी झालाय हे सगळे जाणून आहेत. फक्त लहाने यांच्यासारखा माणूस गलिच्छ व्यवस्थेचा बळी ठरावा हाच मुळी विनोदी पराक्रम झालाय. लोकशाहीत स्वच्छ, पारदर्शक लोकांना बाजूला करण्यात सगळेच पटाईत असतात. डॉ. लहानेंमुळे काहींना त्रास होतोय, पण महाराष्ट्राच्या जनतेला, जे.जे.मध्ये नेहमी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर हवेत. शिस्तीचा बडगा उगारला की ‘मार्ड ’आंदोलन करणार अन् रुग्णांना वेठीला धरणार. यासाठी सरकारने आधी ‘मार्ड’वर बंदी घालावी. सरकारला एकच सांगणे आहे की, डॉ. लहाने यांना पदोन्नतीच द्यावयाची असेल तर आहे तिथेच द्या व महाराष्ट्राचे नेत्र नीटनेटके राहू द्या.
– भाऊसाहेब दहिफळे, अहमदनगर

गृहनिर्माण संस्थांना दिलासा
सोसायटीच्या जमिनीचे हस्तांतरण अधिक सोपे ही बातमी (१० जून) वाचली. मानीव हस्तांतरणाची प्रक्रिया सुटसुटीत केल्याने खरेदीखताअभावी अडचणी सहन करणाऱ्या हजारो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार आहे. खरेदीखतामुळे इमारत ज्या जमिनीवर बांधलेली आहे त्या जमिनीचा मालकी हक्क हितसंबंध (टायटल) गृहनिर्माण संस्थेच्या नावे होतो. गृहनिर्माण संस्थेचा कारभार सुरू झाल्यानंतर भविष्याच्या दृष्टीने मिळकतीचे खरेदीखत त्या गृहनिर्माण संस्थेच्या नावे होणे अतिशय जरुरीचे ठरते. कारण सोसायटी झाली परंतु मिळकतीचा मालकी हक्क मात्र नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण होते. मानीव अभिहस्तांतरणाकरिता आवश्यक असलेली प्रक्रिया गुंतागुंतीची आणि किचकट असल्याने त्यामुळेदेखील अनेक सोसायटय़ांचे अभिहस्तांतरण रखडलेले आहे. जाचक अटी रद्द केल्याने ही प्रक्रिया आता सोपी होणार आहे.
– सुरेश पटवर्धन, कल्याण

वर्णभेदावरून होणाऱ्या हिंसक घटना लज्जास्पद
‘काळे वास्तव’ हा अग्रलेख (३१ मे ) विचारांचे काहूर माजवत आहे. खरे तर, हे वास्तव काही अनाकलनीय नाही; पण भारतीयांना गोरेपणापुढे जग थिटे वाटते. मुळात प्रत्येक गोष्टीमध्ये रूप हे किती महत्त्वाचे आहे, हे ठसवण्याची वृत्ती अतिशय मूर्खपणाची आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित जमावसुद्धा ‘रूप’ हे यशस्वी होण्याचे महत्त्वाचे साधन आहे, असे मानते. आपल्याला जाहिरातींमधून सांगितले जाते, की हे प्रसाधन वापरा, आत्मविश्वास वाढवणारी सुंदरता प्राप्त होईल आणि जग मुठीत येईल म्हणजे काळा वर्ण असणारे सगळे अयशस्वी? भारतीयांमध्ये हे जे गोरेपणाचे अप्रूप आहे, त्याचा उपयोग पैसे कमावण्यासाठी जाहिराती करतात; पण आपण काही तरी सुज्ञ, अर्थपूर्ण दाखवावे. देश जाहिराती पाहत असतो आणि लाखो लोक अंधानुकरण करतात, हे सगळे माहीत असूनही सौंदर्य प्रसाधनामार्फत अर्थहीन गोष्टी प्रस्थापित केल्या जातात. वर्ण, जात, प्रांत, भाषा यांसारख्या भेदामुळे आपण मागासलेलेच राहू, हे कळण्याइतका शहाणपणा भारतीयांमध्ये कधी येईल, हे सांगणे कठीण; पण ‘प्रयत्नांती परमेश्वर’.
..हा भेदभाव आटोक्यात यावा यासाठी आपण, नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. अग्रलेखात सांगितलेल्या घटना, वैयक्तिक गुन्हय़ातून देशाच्या प्रगतीवर कसे पडसाद उमटतात, हे दर्शवतात. आपण जे वागणार, तसंच आपल्या देशाला पाहिलं जाणार. नागरिक देश घडवतात आणि बिघडवतातसुद्धा, हे लहानपणापासून नागरिकशास्त्रामध्ये शिकवले गेले आहे; पण शिकलेल्या गोष्टी आचरणात आणल्या जात नाहीत, तर त्यांचं महत्त्व परीक्षेत गुण मिळवण्याइतपतच असतं, तो एक दुसराच मोठा मुद्दा आहे.
या वारंवार वर्णभेदावरून होणाऱ्या घटना देशासाठी लज्जास्पद आहेत. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सर्व बाजूने विकास व्हावा लागतो आणि फक्त शिक्षण घेऊन नाही तर आपण काय शिकतो, हे आचरणात आणून सर्व प्रकारच्या भेदांचे उच्चाटन होऊ शकतं. त्यामुळे वर्ण, जात, भाषा, प्रांत यांवरून भेदभाव करून आपण भूतकाळात जात आहोत.
– प्रीती एकनाथ धांद्रूत, सायन (मुंबई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 3:20 am

Web Title: loksatta readers letter 62
टॅग Readers Letter
Next Stories
1 नैतिकतेचा मक्ता काही भाजपकडेच नाही!
2 ‘पंचवर्णा’कडे दुर्लक्ष कोणत्या हेतूने?
3 काँग्रेसवाले एवढे बिनकण्याचे?
Just Now!
X