‘राहुल गांधींचा ‘पिडी’ खेळ’ हा लेख (२७ डिसें.) म्हणजे तर्कहीन पण रेटून केलेली प्रचारकी मांडणी. त्यांनी केलेला विघटनकारी नेत्याबरोबर काम केल्याचा आरोप तद्दन खोटा आणि खोडसाळ आहे. ज्या मोदींचे पोवाडे लेखक अनिल बलुनी गात आहेत आणि नोटाबंदी आणि जीएसटी यांचे वर्णन ते धाडसी निर्णय असे करत आहेत त्या वेळी अर्थव्यवस्था गर्तेत सापडली याचा त्यांना विसर पडला असावा. दलित आणि अल्पसंख्याक यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या जिग्नेश मेवाणी व त्याला सहानुभूती देणारे राहुल हे जर विघटनकारी असतील तर राज्यघटना बदलण्याची वल्गना करणाऱ्या केंद्रीय मंत्री महोदयांना काय म्हणावे? पंतप्रधानांनी पूर्ण प्रचारात विकासाचा उल्लेख न करता माजी पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि सेनाप्रमुखांवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत कट केल्याचा आरोप करण्यापर्यंत मजल मारली. त्याचा खुलासा बलुनी यांनी केला तर बरे होईल. शेती क्षेत्रातील वाताहत आणि ‘न भूतो..’ अशी बेरोजगारी यांमुळे विविध समाजघटक त्रासले आहेत. मग त्यांनी हार्दिक पटेल किंवा अल्पेश ठाकोर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तर ते जातीयवादी ठरवणे ही दिशाभूल ठरते. मणिपूर आणि गोव्यामध्ये न मिळालेले बहुमत आणि स्थापन केलेली सरकारे यासाठीही पाठ थोपटून घेणे याचा राजकीय नैतिकतेशी मेळ बसत नाही. पारदर्शक आयुष्याचा सल्ला अनाठायी वाटतो, कारण देशाने पंतप्रधानांच्या खासगी आयुष्याची चर्चा करणे सुज्ञपणे टाळली आहे. अखेरीस २००४च्या फील गुड आणि शायनिंग इंडियाचे स्मरण ठेवावे.

– वसंत नलावडे, सातारा

 

‘इंदिरा-युग’ही विसरून चालणार नाही..

‘राहुल गांधींचा ‘पिडी’ खेळ!’ हा लेख (२७ डिसें.) वाचला. राज्यकर्ते राहुल गांधींच्या अचानक बदलत चाललेल्या रूपाच्या बाबतीत किती संवेदनशील बनत चालले आहेत ते या लेखातून दिसून आले. गुजरातमधील काँग्रेसच्या वाढलेल्या जागा बघता राहुलचा ‘फिल गुड फॅक्टर’ समजू शकतो, पण प्रस्थापितांच्या जागांची झालेली गळती बघता या स्थितीतही भाजपच्या ‘प्रो-इन्कम्बसी’चेच तुणतुणे वाजवण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणावे, हाही प्रश्नच आहे. गुजरातमध्ये राहुल गांधींनी समाजवादी राजकारणाची झूल उतरून केलेले राजकारण यांना घृणास्पद वाटते, पण याच निवडणुकीत मोदींनी पाकिस्तानचा आसरा घेऊन माजी पंतप्रधानांवर घेतलेल्या संशयाचा यांना लगेच विसर कसा पडतो? उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींनी मशिदीला दिलेल्या भेटी म्हणजे ‘धर्माधारित’ राजकारण; मग तिथेच राहुल गांधी श्रीराम मंदिरात का नाही गेले म्हणून त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे करून केल्या जात असलेल्या राजकारणाला कोणती उपमा द्यायची? एका पक्षाच्या अध्यक्षांचे निवडणुकीच्या काळात चित्रपट बघणे म्हणजे त्यांना निवडणुकांचे गांभीर्य नसणे; पण पंतप्रधान म्हणून देशाच्या कारभाराचा गाडा हाकायचा असताना एका राज्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी तब्बल ३५ सभा घेण्यासाठी वेळ देणे म्हणजे पंतप्रधान पदाचे किती ते गांभीर्य! ‘अल्पकालीन’ मोदीयुगाचा अभिमान असावा, पण दीर्घकालीन ‘इंदिरा-युग’ही विसरून चालणार नाही!

– रवींद्र अण्णासाहेब देशमुख, मु. ढोकसाळ, ता. मंठा (जालना)

 

कुलभूषणप्रकरणी मोदींनी भाष्य करावे

‘पाकिस्तानी पाखंड’ हा अग्रलेख (२७ डिसें.)वाचला. त्यातून पाकिस्तानी राज्यव्यवस्थेची केलेली चिरफाड आणि भारतीय सत्ताधीशांकडून व्यक्त केलेली अपेक्षा योग्य आहे. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडेही कुलभूषण कुटुंबीय भेटीचा मुद्दा नेता येईल. आपल्या देशात मानवाधिकारावर काम करणाऱ्या, अभ्यास असणाऱ्या आणि सदैव जागरूक असणाऱ्या मंडळींनी या मुद्दय़ालाही त्याज्य न मानता रान पेटवायला हवे. भारतीय प्रसारमाध्यमांनीही या अपमानास्पद वागणुकीच्या मुद्दय़ाची वात सतत पेटती ठेवून संपूर्ण भारत आणि मानवतेचाच अपमान झाल्याची भारतीयांची प्रबळ भावना पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचवली पाहिजे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्याने निर्माण केलेल्या भारताच्या ओळखीचा कस तर लावावाच, सोबतीने सर्व रूढ राजकीय रीतिरिवाज (प्रोटोकॉल) बाजूला ठेवून या विषयावर स्वत: भाष्य करावे; किंबहुना या मुद्दय़ाच्या सुताचा वापर करून पाकिस्तानच्या राजकीय भूमिकेबाबत किमान शाब्दिक स्वर्ग गाठावा.

– आशुतोष भालचंद्र सावे, जुहू (मुंबई)

 

जाधव यांचा सरबजीत होऊ  न देणे गरजेचे

‘पाकिस्तानी पाखंड’ हे संपादकीय  वाचले. कुलभूषण दोन वर्षांपासून पाकिस्तानी कैदेत असणे हे भारतासाठी निश्चितच भूषणावह नाही. जो देश जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतो, स्वप्नपूर्तीसाठी ज्या शक्तिशाली नेत्याकडे खूपच आशेने पाहतो त्या मोदींसाठी तर हे एखाद्या कलंकापेक्षा कमी नाही. जर अमेरिकेसारखे राष्ट्र रिमांड डेव्हिससारख्या सीआयएच्या गुप्तचराला (ज्याने पाकिस्तानात जाऊन दोन आयएसआयच्या अधिकाऱ्यांची हत्या केलेली असते) त्याला विनासायास सोडवून आणते किंवा ज्युएल कॉक्ससारखा गुप्तचर जो पाकिस्तानी विमानतळावर शस्त्रांसहित पकडला जाऊनही अलगद सुटू शकतो, तर महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणारे आम्ही अमेरिकेच्या मागे का असावे? उलट यास एक संधी समजून ‘काश्मिरात सर्जिकल करण्यापेक्षा पाकिस्तानातच ते कसे करता येईल ते पाहावे.’

लेखात म्हटल्याप्रमाणे कुलभूषण यांना सोडवणे मोदींसाठी मोठी गोष्ट नाही. यासाठी त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेपेक्षा आंतरदेशीय प्रतिमेचा जास्त उपयोग होऊ  शकतो. तेव्हा पाकिस्तानवर प्रत्यक्ष हल्ला करून कुलभूषण यांचा सरबजीत होऊ  न देणे व त्वरित सुटका करणे गरजेचे आहे.

– सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड</strong>

 

पाकचा दुतोंडीपणा जगासमोर आणावा

‘पाकिस्तानी पाखंड’ हे संपादकीय (२७ डिसें.) वाचले. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानला मिळालेले शस्त्र ठरले आहे, ज्याचा वापर ते भारताला टोचण्यासाठी व भारताची वैश्विक स्तरावर नालस्ती करण्यासाठी वापरले जाते. कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी देऊन त्यांनी जगासमोर आपला मानवतावादी बुरखा चढवला, पण प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मात्र नातेवाईकांना वाईट वागणूक देऊन व त्यांच्यावर भाषेचे बंधन टाकून त्या भेटीतला ओलावा पूर्णपणे शोषून घेतला. अर्थातच पाकिस्तानकडून सौहार्दपूर्ण वागणुकीची अपेक्षाही नव्हती, पण इतक्या खालच्या दर्जाला उतरून त्यांनी त्यांची हीन पातळी दाखवून दिली आहे. आता भारताच्या परराष्ट्र खात्याने आपला सर्व जोर पाकिस्तानचा दुतोंडीपणा जगासमोर आणणे व कुलभूषण यांना सोडविण्यासाठी लावला पाहिजे.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

कुसंस्कृतीच्या पडछाया

‘पाकिस्तानी पाखंड’ हा अग्रलेख वाचला. मुळात पाकिस्तानकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. मंगळसूत्र, बांगडय़ा, कुंकू या भारतीय संस्कृतीने मान्य केलेल्या सौभाग्याच्या खुणा आहेत. तिहेरी तलाक पद्धतीने एका झटक्यात पत्नीचा अव्हेर करणाऱ्या इस्लामी धर्मवेडय़ा लोकांना या सौभाग्य अलंकारांची महती कशी पटेल? मरणाच्या दारी उभे असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेली पाशवी वागणूक त्यांच्या कुसंस्कृतीच्या पडछाया आहेत हे एकदा समजले की त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही. काचेच्या भिंतीआडून घडवलेली ती भेट म्हणजे ‘ओलावा’च्या नावाखाली दाखविलेला ‘दुरावा’ होता हे कुणीही समजू शकेल. आता मंगळसूत्र काढल्याचे दु:ख न करता भारतीय राज्यकर्त्यांनी कुलभूषण जाधव यांना भारतात परत येण्यासाठी निकराचे प्रयत्न करावेत.

– सूर्यकांत भोसले, मुलुंड (मुंबई)

 

स्पर्धापरीक्षा देणारे विद्यार्थी गोंधळलेले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी अनेक परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये शासननिर्णयांनुसार समाजातील विविध घटकांसाठी आरक्षणाची तरतूद असते. पण समांतर आरक्षणाच्या मुद्दय़ावरून २०१७ या वर्षांत घेतल्या गेलेल्या सर्व परीक्षांचे निकाल रखडत आहेत. जे निकाल लागत आहेत त्यांच्याविरोधात ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण’ तसेच उच्च न्यायालयांमध्ये दावे दाखल होत आहेत. त्यातच काही वृत्तपत्रांमध्ये ‘मागासवर्गीयांना खुल्या गटातून अर्ज भरण्यास आयोगाची मनाई’ अशा प्रकारचे वृत्त प्रसारित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडालेला आहे. वर्षांनुवर्षे अभ्यास करून ऐन परीक्षेच्या वेळी जर असे प्रकार होत असतील तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आयोगाने व शासनाने याची त्वरित दखल घ्यावी व खुलासा करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करावे, जेणेकरून विद्यार्थी फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करू शकतील.

– नीलेश पाटील, धुळे</strong>

 

कितीही ऊर बडवा, उत्सव साजरा होणारच..

‘तो विषय संपला, आता उत्सवही नको’ हे पत्र (लोकमानस २७ डिसें.) वाचले. मुळात विषय जेथे संपतो तेथूनच तर उत्सवाचा जन्म होतो. रणस्तंभाचा इतिहास सर्वश्रुत आहेच. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रणस्तंभास मानवंदना दिली होती, तेव्हापासून दरवर्षी १ जानेवारी रोजी विविध जातीधर्माचे लोक एकत्र येऊन ५०० शूर महार सैनिकांना मानवंदना देतात. त्यामुळे कितीही ऊर बडवा, उत्सव तर साजरा होणारच!

– अविनाश शरद निकाळजे, पुणे

 

गारेगार प्रवास म्हणजे कसा?

मुंबईत वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाली. मुंबईत दररोज ७५ लाख प्रवासी लोकलने प्रवास करीत असतात. त्यांच्या अनेक समस्या असतानाही एकाच वेळेत सामान्य, महिला, प्रथम दर्जा असलेले प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. प्रत्येक मिनिटाला महत्त्व देणारे प्रवासी लक्षात घेता भविष्यात वातानुकूलित सेवा वाढल्या तर प्रवाशांना किती सोयीचे होईल याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. अल्प उत्पन्न असलेले प्रवासी यातून कसे प्रवास करू शकतील याचाही विचार व्हायला हवा, जेणेकरून त्यांचा प्रवास सुखद होईल. गारेगार प्रवास म्हणजे कसा असायला हवा हे प्रथम ठरवलेले अधिक बरे.

– गजानन मालवणकर, नवीन पनवेल