‘केरळचे संकट आपणच ओढवलेले!’  हे वृत्त (१९ ऑगस्ट) वाचले. सध्या केरळ या निसर्गसुंदर राज्यात पावसाने थैमान घातले आहे. या अनुषंगाने पश्चिम घाट समितीचे माधवराव गाडगीळ यांनी पुरामुळे केरळच्या झालेल्या दैनावस्थेमागे अर्निबद्ध बांधकामे आणि निसर्ग समतोल बिघडणारे बेकायदा खाणकाम जबाबदार असल्याचे मत नोंदवले आहे. पश्चिम घाट पर्यावरण संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या शिफारशींना सरकारने केराची टोपली दाखवली आहे. तसेच संपूर्ण भारताचा पर्जन्यमान या विषयीच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या अभ्यासात भारतीय पर्जन्यमानाने आपले ताळतंत्र बदलले असल्याचे निरीक्षण नोंदवले होते आणि त्यामागेही निसर्गातील मानवी हस्तक्षेप हेच कारणीभूत असल्याचे समोर आले होते. या अभ्यासाकडेही सरकारने डोळेझाक केली आहे.

‘नेमिचि येतो पावसाळा’ याप्रमाणेच अनेक राज्यांत तुंबणारं पावसाचं पाणी आणि त्यामुळे नागरिकांचं विस्कळीत होणारं जनजीवन हा आता देशवासीयांना जडलेला जणू शापच ठरला आहे. नगर विकासाचे सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ विकास करण्याच्या नावाखाली ही राज्ये नियोजनाच्या पूर्ण अभावामुळे, वाढत्या लोकसंख्येमुळे, साधनसामग्रीवर पडणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत. समाजातील सर्वच घटक (राजकारणी, बिल्डर, सामान्य नागरिक) या अध:पतनाची जबाबदारी ‘इमानेइतबारे’ पार पाडीत आहेत. अस्मानी आणि सुल्तानी अशी दोन प्रकारची संकटे मानवी संहाराला कारणीभूत ठरतात. अशा संकटांचा सामना करावयाची आपत्ती व्यवस्थापन नावाची व्यवस्था आपल्याकडे नावापुरती आहे. आज केरळमध्ये जे झाले आहे ते भविष्यात इतर राज्यांचे व शहरांचेही कमीअधिक प्रमाणात  होणार आहे. असे होऊ   द्यायचे नसेल तर सर्व राज्य सरकारांनी यातून योग्य तो बोध घेऊन त्या दिशेने पावले उचलणे गरजेचे आहे. पाऊस आला धावून आणि अक्कल गेली वाहून, अशी आपली गत झालेली आहे.

– बाळकृष्ण शिंदे, पुणे

 

छद्मविज्ञानाचा प्रसार काळजी वाढवणारा

‘मानवाचे अंती एक गोत्र’ हा रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचा लेख (१८ ऑगस्ट) वाचला. खरोखरच आपल्याकडे छद्मविज्ञानाचा प्रसार काळजी वाटावी इतका सर्वत्र झालेला दिसून येतो. कालबाह्य़ व जुनाट धार्मिक रूढी आणि परंपरा यांची घातक मुळे समाजात खोल खोल रुजवण्यात या छद्मविज्ञानाचा फार मोठा भाग आहे. तथाकथित सुशिक्षित पण चिकित्सेत शून्य असणाऱ्या मंडळींना अधिकच चिकित्साशून्य करणारे हे छद्मविज्ञान भल्याभल्यांचा बुद्धिभेद करण्यास समर्थ आहे. याबाबतीतील किती तरी कटू अनुभव मला स्वत:ला आले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वरच्या वर्गाना विज्ञान विषय शिकवणाऱ्या एका शिक्षिकेला अशाच कोणत्या तरी व्रताच्या वैज्ञानिक अधिष्ठानाबद्दल विचारले असता, त्यांनी हसून ‘‘आपण ते बसवू ना विज्ञानात,’’ असे उत्तर दिले होते. मुंबईतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांनी मला त्यांच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी साक्षात साईबाबा त्यांच्या खांद्यावर बसून ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्याचे सांगितले आहे. हे सर्व भयानक आहे. छद्म्विज्ञानाने आपला समाज कसा कर्करोगाप्रमाणे पोखरला आहे हे समजण्यासाठी उपरोक्त दोन उदाहरणे पुरेशी आहेत. सरतेशेवटी जातिसंस्था. आपल्या रक्तात मुरलेल्या या जातिसंस्थेचा पाया आणि मूलाधार म्हणजे छद्मविज्ञान. रवींद्र रुक्मिणी यांनी जेनोमिक कुंडलीचे उदाहरण दिले ते चांगलेच आहे. जातिसंस्थेच्या दुष्परिणामांबद्दल आजवर कित्येकांनी किती तरी सांगून झाले, पण ही जातिसंस्था जुनाट रोगाप्रमाणे आमच्या समाजपुरुषाच्या शरीरात घुसून अशी काही मुरून बसली आहे की, आमची कधीतरी तिच्यापासून सुटका होईल की नाही याची शंका वाटते.

– मनीषा जोशी, कल्याण</strong>

 

आदर वाटावा असे क्रिकेटपटू

‘वाडेकरांचा वारसा’ हा अग्रलेख (१८ ऑगस्ट) वाचला. स्थितप्रज्ञ, सुसंस्कृत ही वाडेकरांविषयीची विशेषणे मनाला भावली. त्यांच्याबाबत एक आठवण सांगावीशी वाटली. वर्ष १९७५ किंवा १९७६. पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत वाडेकरांचे भाषण होते. जागतिक वर्चस्वाचे शिखर, ते सर्वबाद ४२ ने इंग्लंडमधील मानहानी आणि त्यानंतर निवृत्ती यामुळे वाडेकरांबाबतच्या संमिश्र भावनेने या भाषणाला हजर होतो. त्यात त्यांच्या शांत आणि अभिनिवेशविरहित बोलण्याने त्यांनी श्रोत्यांना आपलेसे केले. नंतरच्या प्रश्नोत्तरांत इंग्लंडमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाचे कारण ‘आम्हाला गर्व झाला होता आणि त्यात आम्ही सैलावलो होतो’ इतक्या स्वच्छपणे सांगितले होते.  क्रिकेटमध्ये राजकारण असते का? या प्रश्नावर थोडी उसंत घेत, ‘राजकारण कुठे नसते?’ असे अतिशय सौम्य भाषेत विचारले होते. त्या वेळेस भाषण संपल्यावर त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झाल्याचे जाणवले होते. अग्रलेखातील त्यांची स्वभाववैशिष्टय़े त्या भाषणात अनुभवायला मिळाली होती, म्हणून हा पत्रप्रपंच.

-उमेश जोशी, पुणे

 

संयमित खेळाडू

‘वाडेकरांचा वारसा’ हा अग्रलेख  वाचला. खरोखर त्यांचा आदर्श घ्यावा असे त्यांचे कर्तृत्व होते. आजच्या पिढीला झगमगाट आणि प्रसिद्धी यांची घाई असते. त्यातूनच मग अनेक जण मॅच फिक्सिंगसारख्या प्रकारात दोषी ठरले. अनेकांची कारकीर्द अकालीच संपली. या पाश्र्वभूमीवर वाडेकर यांनी जो आदर्श निर्माण केला तो महत्त्वाचा आहे. एक संयमित खेळाडू म्हणून त्यांचा गौरव यापुढेही होत राहील.

-विशाखा जोशी, खारघर (नवी मुंबई)

 

भाजप व संघाने विचारमंथन करावे

‘वाजपेयींची घडण’ हे विनय सीतापती यांचे टिपण (बुकमार्क, १८ ऑगस्ट) वाचले. या टिपणामधून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे अटलजी व राजकुमारी कौल यांचे संबंध भावनिकपेक्षा वैचारिक होते. ते सर्वसाधारण वाजपेयींच्या टीकाकारांना वाटतात तसे हीन दर्जाचे नव्हते तर ते उच्च दर्जाचे आणि प्रगल्भ होते. त्यांच्या प्रभावामुळे तर वाजपेयी प्रखर हिंदुत्ववादी ते उदारमतवादी घडले. वाजपेयींच्या या वैशिष्टय़ांची त्यांना पुरेपूर साथ मिळाली व त्यांचे जीवन फुलले. दुसरी गोष्ट म्हणजे जर भाजप आणि संघाने त्यांच्या विचारसरणीत वाजपेयींसारखाच बदल करण्याचे ठरवले तर ती वाजपेयींना खरी श्रद्धांजली ठरेल. संघ आणि भाजपने स्वीकारलेला हिंदुत्ववाद हा किती बेगडी आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. जातीय ध्रुवीकरणामुळे मतपेढी राखता येते व निवडणुका जिंकता येतात याही विचारांना फारसा आधार नाही. परंतु त्यामुळे गोरक्षक व झुंडीने हल्ला करणाऱ्यांना मात्र बळ मिळते व जनतेत घबराट निर्माण होते. हे साध्य करून जर सत्ता मिळवता येते असे उद्दिष्ट असेल तर मात्र भाजप व संघाची कीव कराविशी वाटते. वाजपेयीनंतरची भाजप त्यांच्याच उदारमतवादी विचारसरणीनुसार घडवता येईल का, याबद्दल पक्षाने व संघाने जरूर विचारमंथन करावे.

-दत्तात्रय नारायण फडके, डोंबिवली

 

सिद्धूच्या भेटीने काय साध्य होणार?

माजी क्रिकेटपटू व सध्या पंजाबचा मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू याने इम्रान खान यांच्या शपथविधीच्या निमित्ताने पाकिस्तानात जाऊन, भारतीय जवानांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानी लष्करप्रमुखांची ‘शांततेसाठी’ गळाभेट घेतल्यामुळे व त्याचे समर्थन केल्यामुळे सिद्धूवर टीकेचा भडिमार होत आहे. यावरून एक गोष्ट आठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस आणि त्यांच्या नातीच्या विवाहाचे औचित्य साधत पाकिस्तानला अचानक भेट दिली.  भारत-पाक संबंध आता सुधारतील, अशी भाबडी आशा त्या वेळी व्यक्त केली गेली. मात्र मोदींच्या भेटीनंतर सीमेवर शांतता प्रस्थापित झाली नाहीच. उलट अतिरेक्यांचे हल्ले वाढले. मोदींच्या भेटीने जे साध्य झाले नाही ते सिद्धूच्या भेटीने कसे काय साध्य होणार? वास्तविक उथळ स्वभावाच्या या नेत्याला पाकिस्तानला जाण्याची परवानगी द्यायला नको होती.

– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)

 

कोणतेही शहर सर्वार्थाने उत्तम असणे कठीणच

‘पायतळी अंधार’ या ‘रविवार विशेष’मधील (१९ ऑगस्ट) सर्वच लेख विचारप्रवर्तक असून चांगली शहरे म्हणून निवड झाली असतानाही ती कशी अनेक बाबतीत उणी आहेत हे अधोरेखित करणारी आहेत. तसं बघायला गेलं तर भारतातील कुठलंच शहर सर्वार्थाने उत्तम शहर असणं कठीणच आहे, कारण प्रगतीचा वेग आणि लोकसंख्या वाढ यांचे गुणोत्तर कायम विषम आहे. पण म्हणून उत्तम शहर शोधूच नये का? तर यातील एका लेखाचे शीर्षक आहे ‘वासरात लंगडी गाय’. तोच निकष पुणे, नवी मुंबई आणि ठाणे यांना लावला असावा. लंगडी गाय चारही पायांवर उभी राहण्यासाठी या मानांकनांचा सकारात्मक उपयोग होईल असे वाटते. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या पुण्यात पाणी, वाहतूककोंडी असे प्रश्न आहेतच, पण सर्वसामान्य नागरिक मनापासून ओला, सुका कचरा वेगळा करत आहेत, प्रत्येक सोसायटी गांडूळ खत बनवत आहेत हे अभिनंदनीय आहे. नवी मुंबईत सततची वाहतूक असूनही ती आखीव-रेखीव असल्याने व लोकांनी तशी ठेवल्याने त्यांच्याकडूनही शिकण्यासारखे बरेच काही आहे.  मध्यवर्ती शहर असल्याने ठाण्यात वाहनांची झिम्मड उडते, त्यामुळे वाहतूक  कोंडी, रेल्वे स्टेशन जुने असल्यामुळे तिथे वाढविण्यासाठी जागाच शिल्लक नाही हे वास्तव आहे. म्हणूनच सगळ्या त्रुटींसकट चांगल्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील चार शहरे आली आहेत, याचा राजकारण बाजूला ठेवून आनंद घ्यावा.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)