‘राज्याची आर्थिक स्थिती मजबूत ’आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुलाखतीत सांगितल्याचे (रविवार विशेष, २४ फेब्रु.) वाचले.  तर मग काही दिवसांपूर्वी खर्चात कपात करण्यासाठी वित्त विभागाने १५ फेब्रुवारीनंतर खर्च करण्यावर र्निबध का घातले? वस्तुस्थिती अशी आहे की, राज्याचे हिशेब रोख तत्त्वावर ठेवले जात असल्याने राज्याने किती दायित्व निर्माण करून ठेवले आहे याची आकडेवारी उपलब्ध होऊ  शकत नाही. असे दायित्व फक्त कर्जाचेच नाही तर प्रलंबित देयकांचेसुद्धा आहे. आर्थिक स्थिती जर मजबूत आहे तर मग आरोग्य, शिक्षण इत्यादी क्षेत्रांत मूलभूत सेवा पुरविताना पुरेसा निधी का पुरवला जात नाही? हजारोच्या संख्येने आज कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्याचा सरकार पुरवीत असलेल्या सेवांवर विपरीत परिणाम होतो आहे. मुनगंटीवर व मुख्यमंत्र्यांची अंगणवाडी नसेलही परंतु इतर मंत्र्यांचे काय? त्यावरही प्रकाश टाकणे गरजेचे होते. राज्याच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलाची आकडेवारी भरभक्कम दिसते. हे बाळसे आहे की सूज, हे समजायला हवे. विकासकामे वेगाने सुरू असणे हे काही आर्थिक सुदृढतेचे लक्षण नसते. आर्थिक क्षमता नसतानाही ऋण काढून लग्न समारंभावर खर्च करण्यासारखेच हे आहे. असो, राज्याची आर्थिक स्थिती मजबूत खरोखरीच असेल तर ती तशी राखणाऱ्या वित्तमंत्र्यांचे कौतुकच करायला हवे.

– रवींद्र भागवत, सानपाडा (नवी मुंबई)

 

न खेळता नोंदविलेल्या निषेधाचे मूल्य मोठे

पाकिस्तानशी द्विराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट न खेळण्याचे धोरण असावे, मात्र वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर बहिष्कार घातल्यास भारताचे नुकसान होईल असे गावस्कर यांचे मत आहे. त्याअगोदर त्यांनी हादेखील विचार करायला हवा की, संपूर्ण देशातील जनता पाकिस्तानच्या विरोधात आहे. भारताशी नेहमीच शत्रुत्व ठेवणाऱ्या पाकिस्तानशी खेळ आणि युद्ध या दोन्ही रणांगणावर शत्रूसारखेच ठेचले पाहिजे. अशा या शत्रूला क्रिकेट मैदानावरील पराभूत केल्याची नोंद फक्त क्रिकेटच्या इतिहासात ठेवली जाईल. तर युद्धभूमीवर शत्रूला नामोहरम केल्याची नोंद सर्व जगाच्या इतिहासात राहील. पाकिस्तानशी खेळून वर्ल्डकप जिंकल्यानंतर आपले खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड कोटय़वधी रुपये कमावतील, पण इतिहासात नोंद होईल ती अशी की, या देशाने फक्त पैसे आणि बक्षिसे जिंकण्यासाठी शत्रूशी खेळ मांडला. एका वर्ल्डकपमध्ये शत्रूवर बहिष्कार टाकल्याची किंमत ही वर्ल्डकप जिंकून कमावलेल्या बक्षिसांच्या मूल्यापेक्षा निश्चितच जास्त असणार. पाकिस्तानशी न खेळता नोंदविलेल्या निषेधाचे मूल्य ती स्पर्धा जिंकल्यावर मिळणाऱ्या पैशांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ व अभिमानास्पद असेल. कारण स्वदेशापेक्षा काहीही मोठे असूच शकत नाही.

– स्नेहा राज, गोरेगाव (मुंबई)

 

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणे चुकीचेच

यवतमाळमधील काश्मिरी विद्यार्थ्यांना काही लोकांनी मारहाण केल्याची बातमी (२२ फेब्रु.) वाचली. काश्मीरमध्ये नोकरीच्या व शिक्षणाच्या सोयीसुविधा मर्यादित आहेत, त्यामुळेच काश्मीरमधील विद्यार्थी संपूर्ण भारतात शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी स्थलांतर करतात. काश्मीरमधील सर्वच तरुण, नागरिक दहशतवादी नाहीत. जे लोक दहशतवादाकडे वळतात त्यांच्यावर गुप्तचर संस्थांची करडी नजर असते. त्यामुळे अतिउत्साही नागरिकांनी कायदा हातात घेऊ  नये. काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणे म्हणजे काश्मीर पाकिस्तानला दिल्यासारखे होईल. त्यांना जर मारहाण केली तर त्यांनाच भारत नकोसा वाटेल व नंतर यातलेच काही विद्यार्थी दहशतवादी बनण्याचा धोका आहे.

– किशोर केमदारणे, परांडा (उस्मानाबाद)

 

‘त्या’ भावांना व्यवस्थेने आव्हान दिले नाही हे दुर्दैव

‘आटपाट नगरातले मोठे..’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, २३ फेब्रु.) वाचला. आपल्या वडिलांची स्वप्ने जनतेच्याच खिशात हात घालून साकार करणारे हे आटपाट नगरातील दोन व्यावसायिक भाऊ  नक्की मोठे कशामुळे झाले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात  सरकारी व्यवस्थेला रस नव्हता!  कोणत्याही पक्षाचे सरकार कोणत्याही राज्यात किंवा केंद्रात येऊ  देत, परंतु यांच्या नवनवीन उद्योगधंद्यांच्या प्रगतीत आडकाठी कधी आली नाही! यांच्या उद्योग परवानग्या पर्यावरणवाद्यांपासून ते समाजवाद्यांपर्यंत कोणीही कधीही अडवल्या नाहीत. अगदी स्थानिकांनीही राजकीय पक्षांचा आसरा घेत यांच्या प्रकल्पाविरोधात उठाव केले गेले नाहीत हे आश्चर्यकारक आहे.

आता हे सारे स्वप्नवत कसे झाले?  तर याला आपली निवडणूक व्यवस्था कारणीभूत आहेत असे वाटते. कोणत्या राजकीय पक्षाकडे किती राजकीय देणग्या आल्या, त्या कोणाकडून आल्या, त्यातून निवडणुकीत नक्की किती खर्च झाला इत्यादींचा परीक्षित (ऑडिटेड) ताळेबंद, अहवाल सर्वसामान्य मतदाराला माहितीच्या अधिकारात कधीही मिळू नये अशी भक्कम व्यवस्था केली गेली. साऱ्याच पक्षांत, एकमेकांत कितीही राजकीय वैमनस्य असले तरीही पक्षीय आर्थिक स्थिती, माहिती अधिकारात न येण्याविषयी त्यांची भक्कम एकजूट होती! या आपल्या राजकीय पक्ष व त्यांच्या आर्थिक स्थिती गुप्ततेचा फायदा उठवत आटपाट नगरातील वडिलांनी व त्यांच्या दोन मुलांनी स्वत:च्या उद्योगजगताचे भरभक्कम नवनिर्माण करत असताना आपली कोणतीही अंतर्गत व्यवस्था त्याला आव्हान देऊ   शकली नाही हे दुर्दैव आहे!

– प्रवीण आंबेसकर, ठाणे</strong>

 

अवास्तव आणि भाबडी

‘आता विचारस्वातंत्र्यसेना काढावी का?’ ही बातमी (२३ फेब्रु.) वाचली. नाटय़संमेलाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांची कळकळ आणि तळमळ कोणाच्याही मनाला भिडेल अशी असली, तरी अगदी वास्तववादी नाटके लिहिणारे लेखकही किती भाबडे (नाइव्ह ) विचार करणारे असतात ते पाहून गंमत वाटते. प्रतिभासंपन्न व सर्जनशील लेखक व कलावंत यांना शासनाने व समाजाने एकत्र येऊन आर्थिक विवंचनेतून मुक्त करावे ही त्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा उदाहरणादाखल पाहा. शासनाने हे करायचे म्हटले तर प्रथम नोकरशाहीला प्रतिभासंपन्न लेखक इत्यादींचे निकष ठरवण्याचे काम दिले जाईल. मग विहित नमुन्यानुसार अर्ज करण्याबाबत विज्ञापन (म्हणजे जाहिरात हो!) प्रसिद्ध करण्यात येईल. कदाचित क्लास वन, क्लास टू अशा श्रेणी ठरवण्यात येतील आणि हल्ली वाचकांएवढय़ाच संख्येने लेखक झालेले असल्यामुळे ‘सरकारमान्य व अनुदानित’ लेखक होण्यासाठी असंख्य आवेदनपत्रे येतील. मग प्रादेशिक तत्त्वावर प्रत्येक विभागात किती लाभार्थी ते ठरवण्यात येईल. आधार, पॅन इत्यादी कागदपत्रांच्या प्रती वगैरे ‘साहित्य’ जमवण्यात आणि मंत्रालयात आपली वर्णी कशी व कोणाचा ‘वरदहस्त’ (गडकरी यांचा शब्द आहे हा. सत्ताधाऱ्यांची स्वत:बद्दलची कल्पना नकळत व्यक्त करणारा!) लागेल याची कल्पना करण्यात साहित्यिक गढून, बुडून जातील. एकूण प्रकार फार्सिकल कॉमेडीच्या अंगाने प्रथम  पडद्याआड आणि यथावकाश पडद्यावर येईल किंवा एखादा सरकारमान्य नसलेला खरा प्रतिभाशाली लेखक त्यावर ‘राग दरबारी’सारखी छान कादंबरी लिहील..

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

 

.. ते अधिक जोखमीचे, खडतर असेल

नाटय़संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचे भाषण वाचल्यावर सुझी कासीम या अमेरिकी लेखिकेचे विधान आठवले. “Our freedoms are vanishing. If you do not get active to take a stand now against all that is wrong while we still can, then may be one of your children may elect to do so in the future, when it will be far more riskier – and much, much harder.”

(Suzy Kassem, Rise Up and Salute the Sun: The Writings of Suzy Kassem) आपले स्वातंत्र्य नष्ट होत आहे आणि आताच जर तुम्ही कार्यरत होऊन जे काही चुकीचे घडते आहे त्या?विरुद्ध उभे ठाकला नाहीत आणि जे काही शक्य आहे ते केले नाही तर भविष्यात तुमची मुले ते करण्याचा प्रयत्न करतील, पण त्या वेळी ते अधिक जोखमीचे आणि खडतर असेल.

 – अशोक वासुदेव बक्षी, सातारा

 

सर्व बाजूंनी विचार होणे आवश्यक

‘उडणे आणि टिकणे’ हा अग्रलेख (२३ फेब्रु.) वाचला. कोणतेही कार्य करण्यामागचे इंगित हे दुसऱ्यांशी स्पर्धा करणे नसून काहीतरी उत्तम घडवून आणण्याचे असावे. बोइंग विमान कंपनीची बी-७४७ विमानाची निर्मिती व तिला प्राप्त झालेले अर्धशतकीय यश याला आव्हान देण्यासाठी एअरबसने जम्बोपेक्षा वरचढ ‘सुपर जम्बो’ची निर्मिती केली. परंतु अग्रलेखात सांगितल्याप्रमाणे या ए-३८० विमानाला ऐन-तारुण्यात अखेरची घरघर लागलेली आहे. याचे मुख्य कारण काय? तर एअरबसचा बोइंगचे पाय खेचण्याचा उद्देश. त्यामुळे तो स्वत:चेच नुकसान करून बसला. अशा स्थितीत कोणत्याही विमानाची निर्मिती करण्याआधी दूरदृष्टी ठेवून चारही बाजूने विचार होणे आवश्यक ठरते. आता असली नामुष्की ओढवल्यानंतर तरी पुढे एअरबस किंवा इतर विमान कंपन्या दक्षता बाळगतील ही अपेक्षा..

    – श्रुती रतन रेखाते, नागपूर</strong>

 

हा कूटनीतीचाच भाग नव्हे काय?

‘पाकिस्तानचे पाणी रोखणार’ ही बातमी(२२ फेब्रु.) वाचली. इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल, की यात हत्यारांऐवजी टोमॅटो, बटाटे, रुई आणि पाणी यांसारख्या वस्तू वापरल्या जात आहेत. हा एक कूटनीतीचाच भाग नव्हे काय? कदाचित परिणाम दिसण्यास काही अवधी लागेल, पण प्रत्यक्ष युद्ध करण्यापेक्षा हा मार्ग नक्कीच चांगला.

– संजय पालीमकर, दहिसर (मुंबई)