‘न वापरलेली नऊ..’ हे शनिवारचे संपादकीय  (२ मार्च) वाचले आणि काय वाटले? वापरलेल्या बोटाचे म्हणणे पुन्हा लक्षात आणून देण्यासाठी  हे पत्र. मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडले याचा पुरावा म्हणून शाई लावून घेण्यासाठी बहुतेक लोक नकळत म्हणावे इतक्या सहजपणे उजव्या हाताचे अंगठय़ाशेजारचे बोट पुढे करतात त्याला संस्कृत नाव तर्जनी असे आहे. तर्ज धातूचा अर्थ भीती दाखवणे, घाबरवणे असा आहे. निवडणुकीला सामोरे जाताना, उमेदवार ठरवताना तिथल्या राजकीय पक्षांना मतदारांचा धाक वाटला पाहिजे. हा आदर्श वास्तवात दिसतो का? तो दिसण्यासाठी कोणी काय करणे आवश्यक आहे हे महत्त्वाचे आहे. एखादी वस्तू अगर व्यक्ती दाखवताना, दोषारोप करतानाही तेच बोट आपोआप पुढे येते. आपण एक बोट दुसऱ्याकडे रोखतो तेव्हा उरलेली चार आपल्याकडे वळलेली असतात, असे म्हणतात. विरोधी पक्षावर टीका करताना किती लोकांना याचे भान असते हे लोकशाहीत महत्त्वाचे आहे. जे लोक या दर्शक बोटाचे सांगणे ऐकत नाहीत त्यांना लोकशाही अंगठा दाखवणार यात शंका नाही.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

 

नऊ  बोटांनी कृती करण्याची गरज

‘न वापरलेली नऊ..’ हे शनिवारचे संपादकीय वाचले. लेख वाचण्यापूर्वी शीर्षकाचा अर्थ नीट उमगला नाही; पण समारोपाच्या परिच्छेदाने विचारांना गती दिली. मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडल्यावर आपण वाटेल तसे वागण्यास मोकळे होतो व राजकारण्यांनाही पाच वर्षे मोकळे रान मिळते. ज्या दिवशी शहीद जवानांच्या आईवडिलांना व विधवेला रास्त पेन्शनसाठी कोणतीही अडवणूक न करता नोकरशाही मदत करेल किंवा सर्व देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्याला ९०% मदत पोहोचविणारी नोकरशाही निर्माण होईल त्या दिवशी खरी लोकशाही अवतरेल. सामान्य नागरिक जर सार्वजनिक नियम पाळून नागरिकत्व निभावेल ती खरी लोकशाही. अशी अनेक क्षेत्रे आहेत, की तिथे या नऊ  बोटांनी कृती करण्याची गरज कधी नव्हे ती भासू लागली आहे.

– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली

 

दहशतवाद आणि धर्म

‘पाकिस्तानी भस्मासुराचा हैदोस’ हा लेख (रविवार विशेष, ३ मार्च) वाचला. त्यात अ. का. मुकादम यांनी असं म्हटलं आहे की, भारतातील जवळजवळ सर्व उलेमांनी फक्त पाक दहशतवाद्यांचा निषेध केला, कारवाईची मागणी केली नाही. ही मागणी उलेमा आताही करू शकतात. पाकिस्तान मानेल न मानेल, ती गोष्ट वेगळी. त्याचबरोबर दुसरीकडे सर्वसामान्य भारतीय मुस्लीम बांधवांचं धर्मद्रोहाच्या कायद्याबाबतीत प्रबोधन करून त्यांना दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवू शकतात. तसं झालं तर दहशतवाद्यांचं मनोबल आपोआप खच्ची होईल.

– शरद कोर्डे, ठाणे</strong>

 

युद्धकैद्यांचे आगळेवेगळे अनुभव

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका केल्यावर त्याचा तेथे मानसिक छळ केल्याच्या बातम्याही वाचनात आल्या. शत्रुराष्ट्राचा हा एक चेहरा समोर येत असतानाच निवृत्त विंग कमांडर धीरेन्द्र सिंह जफम यांचे ‘डेथ वॉज नॉट पेनफुल’ आणि हवाई दलाचेच निवृत्त ग्रुप कॅप्टन दिलीप परुळकर यांचे ‘वीर भरारी’ या दोन्ही पुस्तकांतील मजकूर चटकन नजरेसमोर आले. ७१ च्या भारत-पाक युद्धात हे दोन्ही वीर पाकिस्तानात युद्धकैदी म्हणून तेथील तुरुंगात असतानाचे अनुभव या दोन्ही पुस्तकांत शब्दबद्ध केले आहेत. पाकिस्तानच्या तोफांनी विमानाचा वेध घेतल्यावर जफम यांनी पॅराशूटच्या साहाय्याने विमानाबाहेर उडी मारली. पण लँडिंग नीट न झाल्याने जफम यांच्या मणक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचे शरीरावरचे नियंत्रण गेले. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर अलगद उचलून जवळच्याच एका तंबूत नेऊन कॉटवर निजवले. त्या पुस्तकातील पुढील मजकूर असा –

‘‘त्याला चहा द्या रे’’ अधिकारी आपल्या एका माणसाला सौम्यपणे म्हणाला. ताबडतोब एक जवान  चहा घेऊन आला, पण चहाचा कप हातात घेण्यासाठी जफम हात पुढे नेऊ  शकत नव्हता. त्या सैनिकाच्या हे लक्षात आले. त्याने मग चमच्याने जफमला चहा पाजला. त्या  कृतज्ञतेने त्याचे डोळे पाणावले. ‘‘सिगरेट हवीय?’’ अधिकाऱ्याने विचारले. जफमने नजरेनेच होकार दिला. अधिकाऱ्याने एक सिगरेट पेटवली आणि स्वत: जफमच्या ओठांशी धरली. चहा आणि सिगरेटमुळे ताजेतवाने वाटल्यावर जफमने अधिकाऱ्याच्या शांत-सौम्य, देखण्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्याच्या मनात आले, ‘‘आम्ही खरेच शत्रू आहोत का? काही चूक किंवा गैरसमज तर नाही ना होते?’’ (पृष्ठ : २३,२४)  युद्धकैदी म्हणून पाकिस्तानच्या कोठडीत आलेल्या कटू अनुभवांबरोबरच असे गहिवर आणणारे अनेक समृद्ध अनुभव त्या पुस्तकात आहेत. मुख्य म्हणजे युद्धकैदी म्हणून भारत हा पाकिस्तानच्या सैनिकांना किती आणि कशी माणुसकीची वागणूक देतो हे पाकिस्तानात पोहोचल्याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आपल्यातील माणुसकी अधिक संवेदनशील करणारे हे अनुभव वाचायचे असतात ते न्याय्य मार्गाने आणि न्याय्य भूमिका म्हणून शत्रुराष्ट्राला धडा शिकवताना त्यात द्वेष आणि सूडभावनेचा शिरकाव होऊ  नये म्हणून..

– अनिल मुसळे, ठाणे

 

दोघांनीही संयम बाळगावा

‘डोके थंड ठेवण्याची गरज’ हा लेख (रविवार विशेष, ३ मार्च) अतिशय योग्य शब्दांत भारत-पाकमधील तणावावर भाष्य करणारा आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली, पण त्यांनी भारतद्वेष हाच राष्ट्रप्रेमाचा मापदंड ठरविल्याने आज पाकिस्तान भारतासोबत अतिशय कठोर, वाकडय़ा पद्धतीने वागत असते. काश्मीर हा फक्त बहाणा आहे. जर जनमत घेतले तर काश्मिरी लोकांनासुद्धा पाकिस्तानात जाणे नकोसेच वाटेल, कारण पाकिस्तानी जनतेची आई जेऊ  घालेना..सारखी गत आहे. त्यामुळेच सतत भारतीय सैन्यावर हल्ले झाले की भारत एकदा तरी कडक उत्तर देणारच आणि आता तर संपूर्ण जग भारताच्या बाजूने आहे. त्यामुळेच पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना सोडले. हे जे शत्रुत्व पाकिस्तानच्या रक्तात भिनले आहे आणि परिणामस्वरूप भारतीयांच्या मनातही त्याचे पडसाद उमटतात ते गैर नाहीत, पण दोघांनीही संयम बाळगायची गरज आहे.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

समाजाचे प्रतिसाद निराशा निर्माण करणारे

नाशिकच्या शहीद वैमानिकाच्या पत्नीची भावना (२ मार्च) वाचली. त्यातील ‘निनाद नसताना आमचे कुटुंब सुरक्षित राहिले तर ती त्यांना खरी श्रद्धांजली असेल’ या वाक्याने कोणी तरी चरचरीत डागणी दिली असे वाटले. आपल्या सामाजिक मानसिकतेचे अंजन घालणारे निरीक्षणच. नाशिकच्या वीरपत्नीची भावना विशिष्ट संस्कारातून आली आहे. असे संस्कार सर्वाना उपलब्ध नाहीत हे देशातील लोकांचे दुर्भाग्य. त्यामुळे आपल्या समाजाचे प्रतिसाद उथळ आणि निराशा निर्माण करणारे असतात.

– उमेश जोशी, पुणे</strong>

 

निर्मला सीतारामन यांची उपेक्षा का?

पुलवामा येथे सीआरएफ जवानांवरील आत्मघातकी हल्ला ते विंग कमांडर अभिनंदन भारतात सुखरूप येईपर्यंत माध्यमांतून सातत्याने उपेक्षित राहिलेली आणि खटकणारी बाब म्हणजे भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा कुठेही साधा नामोल्लेख न करणे ही होय. ३ सप्टेंबर २०१७ पासून सीतारामन या संरक्षणमंत्री म्हणून सक्षमपणे देशाची धुरा सांभाळत आहेत. पहिल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर तीनही संरक्षण दलातील असंख्य निर्णायक प्रसंगी त्यांची भूमिका ही वाखाणण्याजोगी आहे. युद्धजन्य परिस्थितीत  राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निर्णयाखालोखाल देशाच्या संरक्षणमंत्र्यांच्या भूमिकेला स्थान मिळते. मात्र गेल्या दोन सप्ताहांत विशेषत: देशाच्या सीमेवरील परिस्थिती आणि त्या अनुषंगाने ज्या बातम्या माध्यमांतून झळकल्या त्यात निर्मला सीतारामन पूर्णपणे दुर्लक्षित घटक ठरल्याचा प्रत्यय आला. पुरुषप्रधान संसदीय लोकशाहीत पुरुष नेत्यांच्या कितीतरी पटीने सरस कामगिरी महिला संसदपटूंची आहे हे विसरता कामा नये.

– जयवंत कुलकर्णी, नेरुळ (नवी मुंबई)

 

असे धोरण देशाच्या विकासाला मारक

‘नाणार प्रकल्प रद्द’ ही बातमी (३ मार्च) वाचली. राजकारणाने म्हणजेच पर्यायाने सत्ता संघर्षांने विकासावर मात केली. देशाला विकासाची स्वप्ने दाखवणाऱ्यांचे सत्तेसाठी लाचार होणे आज जनतेला बघावे लागत आहे. हेच पुन्हा विकासाच्या नावावर जनतेपुढे मते मागणार आहेत. ‘विकासा’साठी सत्ता मिळवायची आणि पुन्हा तोच गुंडाळायचा हे धोरण देशाच्या विकासाला बाधक आहे. सत्तेवर राहून जर देशहिताचे प्रकल्प गुंडाळायचे असतील तर मग सत्ता हवी कशाला?

– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली

 

नाणार प्रकल्प रद्द होणे चांगलेच

नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्यात आला हे योग्यच झाले. या प्रस्तावित प्रकल्पामुळे या भागातील आंबा, काजूच्या लाखो झाडांची कत्तल होणार होती. मच्छीमारांचा व्यवसाय नष्ट झाला असता. पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होऊन प्रदूषणामध्ये वाढ झाली असती. सुमारे ८ हजार कुटुंबे बाधित होणार होती. अनेक रासायनिक कारखान्यांनी संपूर्ण कोकणचा सागरी किनारा आधीच प्रदूषित झाला आहे. रायगडातील रोहे, रत्नागिरीतील खेड, लोटे येथील रासायनिक कारखाने याची उदाहरणे आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द झाला हे योग्यच झाले.

 – प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)