25 February 2021

News Flash

उलटय़ा राजकीय ‘नियोगा’चे प्रयोग!

जिवंतपणी ज्या सावरकरांना संघाने काही किंमत दिली नाही, उलट विरोधच केला

(संग्रहित छायाचित्र)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने केंद्र सरकार पुरस्कृत कार्यक्रमाचे वृत्तांकन (लोकसत्ता, २४ जानेवारी) वाचले. हा राजकीय नियोगाने जनक मिळवण्याचा प्रकार आहे. ‘महाभारत’काळी नियोग प्रथा होती. म्हणजे कूस उजवत नसेल तर शेजारीपाजारी/ इकडेतिकडे करून वंशाला दिवा निर्माण करणे. रा. स्व. संघावर पुराणकाळाचा खूप पगडा आहे. त्यामुळे त्यांनी नियोगाची प्रथा उलट करून अनेक राष्ट्रीय नेते आमच्याच विचारांचे होते आणि आमचे राजकीय पूर्वजच होते असे शाबीत करण्यासाठी त्यांना वापरायचा कार्यक्रम अनेक वर्षे राबवला आहे. अतिराष्ट्रवादाचा गजर करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचे देश स्वतंत्र करण्यात काहीच योगदान नव्हते, उलट ब्रिटिशधार्जिणे धोरणच राबवले होते असा इतिहास आहे. हाच इतिहास त्यांना आज अडचणीचा ठरतोय असे दिसते.

त्यावरचा उपाय म्हणून इतिहास सोईस्करपणे बदलून प्रस्थापित करण्याचे कारस्थान राबवले जात आहे. त्याचाच भाग म्हणून अशा महापुरुषांच्या मांडीवर बसण्याचे प्रकार चालू आहेत. त्यामुळेच क्रांतिकारी धर्मसुधारक विचारांचे समतावादी असलेल्या विवेकानंदांना संघाचा टिळा लावणे, कडव्या हिंदुत्वाचे विरोधक आणि साम्यवादी विचारांच्या नेताजींचा उदोउदो करण्याचा अचानक पुळका येणे, कॉम्रेड भगतसिंगांचे कट्टर सहकारी राहिलेल्या राजगुरूंना मृत्यूपश्चात संघात घेणे, संघावर दोन वेळा कडक बंदी घालणारे आणि अंतर्बाह्य़ गांधीवादी असलेले काँग्रेसी सरदार पटेल आमचेच म्हणून मिरवणे.. असे अनेक उलटय़ा राजकीय नियोगाचे प्रयोग सुरू आहेत. जिवंतपणी ज्या सावरकरांना संघाने काही किंमत दिली नाही, उलट विरोधच केला, ते सावरकर त्यांच्या प्रायोपवेशनानंतर आता संघाचे ‘आयडॉल’ आहेत.

– संदीप ताम्हनकर, पुणे

दोन सत्तास्थाने निर्माण होण्याच्या भीतीमुळेच..

‘काँँग्रेस कार्यकारिणीत खडाजंगी; राहुल गांधी यांची मध्यस्थी, अध्यक्षपद निवडणूक जूनअखेर!’ ही बातमी (लोकसत्ता, २३ जानेवारी) वाचली. काँग्रेसला अद्यापही पूर्णवेळ अध्यक्ष नेमता आलेला नाही. पक्षांतर्गत निवडणुका आणि पूर्णवेळ अध्यक्ष या २३ ज्येष्ठ नेत्यांच्या रास्त मागणीची ‘बंडखोर’ म्हणून संभावना करून अध्यक्षपदाची निवडणूक येनकेनप्रकारेण टाळण्यासाठी ‘निष्ठावंत’ प्रयत्न करत आहेत. त्यामुळे निष्ठावंत कोणास म्हणावे- पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या की एका कुटुंबाशी, हा प्रश्न उपस्थित होतो. निवडणुकांमधील अपयशाच्या गालबोटामुळे राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारण्यास कचरत असावेत. पण १९९७ नंतर न झालेली कार्यकारिणी समितीची निवडणूक घेण्याचीही मानसिकता दिसत नाहीये. गांधी कुटुंबीय सोडून दुसरे कोणी अध्यक्ष झाले, तर पक्षांतर्गत दोन सत्तास्थाने निर्माण होतील. या भीतीमुळेच सध्या तरी आगामी विधानसभा निवडणुकांचे कारण पुढे करून पक्षांतर्गत निवडणुका टाळल्या जात आहेत असेच दिसते. वास्तविक निवडणुकांच्या आधी अध्यक्षाची निवड होऊन नवनियुक्त अध्यक्षास कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळायला हवी होती.

– नितीन गांगल, रसायनी

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काही किंमतच नाही?

‘सकळिकांचें राखों जाणे’ हा अग्रलेख (२२ जानेवारी) वाचला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारने कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे इथे दोन महिने चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अजिबात किंमत नाही? मग सरकार रा. स्व. संघाच्या तालावर नाचते आहे काय, असा प्रश्न पडल्यास वावगे ठरू नये.

– विकास गोरखनाथ खुरमुटे, कंडारी बु. (ता. बदनापूर, जि. जालना)

मूळ प्रश्नांना हात न घालताच कारवाई..

‘दोष हा कुणाचा?’ हा डॉ. नितीन जाधव आणि डॉ. स्वाती राणे यांचा ‘रविवार विशेष’मधील लेख (२४ जानेवारी) भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेच्या अहवाल व कारवाईच्या निमित्ताने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडणारा आहे. सरकारी रुग्णालयांतील सुविधा व त्यांची घेतली न जाणारी काळजी हा एक यक्षप्रश्नच आहे. सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय साधनांची खरेदी हीसुद्धा महत्त्वाची बाब असून, त्यासाठी निघणाऱ्या निविदा आणि कमीत कमी किमतीच्या साधनांची निवड यामध्ये ती साधने वापरणाऱ्या मंडळींचा सहभागच नसतो. त्यामुळे रुग्णालयात आलेली साधने काहीअंशी बरोबर नसली तरी तशीच वापरली जातात; कारण ती देणाऱ्या कंपनीशी रुग्णालयाचा संबंधच येत नाही. ही साधने दुरुस्त करण्याचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात येते. त्यांच्यावर कुणाचा अंकुश असतो, ते कळायला मार्ग नाही. एकूणच सरकारी रुग्णालयांतील तांत्रिक साधनांची देखभाल ही रामभरोसेच चालते. त्यात मनुष्यबळाची कमतरता. भंडारा येथील घटनेतही या मूळ प्रश्नांची दखल घेणे गरजेचे होते, पण तसे न होता डॉक्टर व परिचारिकांना निलंबित करून वा बदली करून हे प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

अर्थव्यवस्थेच्या भरभक्कम आधाराविना भरारी

‘पन्नाशीचे भान’ हा ‘अन्वयार्थ’ (२२ जानेवारी) अगदी आवश्यक अशा वेळीच प्रसिद्ध झाला आहे. पण याने अननुभवी आणि शेअर बाजार म्हणजे झटपट परतावा देणारे जुगाराचे साधन समजणारे कितपत सावध होतील याची शंकाच आहे. कारण आजवरच्या अनुभवावरून अशा गुंतवणूकदारांनी चाणाक्षपणा दाखविण्यापेक्षा ‘लोभात दौडले सारे वीर’ असेच झाले आहे. वास्तविक ‘सेन्सेक्स’ने ५० हजाराचा टप्पा गाठणे याचा अर्थ १९८६ ‘सेन्सेक्स’मध्ये गुंतवलेल्या शंभर रुपयांचे आज तब्बल ५० हजार होणे. म्हणजे इतका प्रचंड परतावा यातून आजवर मिळाला आहे. (तोही करमुक्त. २०१८ च्या अर्थसंकल्पात या करसवलतीत थोडे बदल करण्यात आले आहेत,) पण खुद्द गुंतवणूकदार मालामाल झाल्याचे प्रमाण मात्र खूप कमी आहे. याचे कारण ‘बी फीअरफुल व्हेन अदर्स आर ग्रीडी, बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फीअरफुल!’ हा वॉरन बफे यांचा यशस्वी होण्याचा मूलमंत्र गुंतवणूकदारांनी आजवर क्वचित अमलात आणला. किंबहुना त्यात सांगितलेल्या गोष्टींच्या नेमके विरुद्ध वर्तन केले असेच दिसते.

२००४ ते २००८ या कालावधीत शेअर बाजारातील तेजीला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भरीव वाढीचा भरभक्कम आधार होता. पण सध्याच्या तेजीच्या कारणांना असा भरभक्कम आधार नाही. भविष्यात अपेक्षेप्रमाणे अर्थव्यवस्थेने वृद्धिदर गाठला नाही, तसेच त्या त्या देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या धोरणानुसार आजचा परकीय गुंतवणुकीचा ओघ आटला तर त्या वेळी होणारी ‘सेन्सेक्स’ची संभाव्य गटांगळी आजवरची सारी तेजी धुऊन काढणारी असेल. आजवरचा अनुभव हेच सूचित करतो. तेव्हा वॉरन बफे यांच्या सल्ल्यानुसार सद्य:स्थितीत ‘फीअरफुल’ राहणेच उत्तम!

– अनिल मुसळे, ठाणे

खेळाडूंची दुखापत ही सततच्या व्यग्र खेळाचा परिणाम

‘धुंद आणि भान’ हे संपादकीय (२३ जानेवारी) वाचले. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने प्रभारी कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यापासून नेतृत्व केले आणि संघाला अनपेक्षित मालिकाविजय मिळवून दिला. विदेशी भूमीवर खेळताना पहिला सामना गमावल्यानंतर मालिकाविजय मिळवणे ही गोष्ट भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दुर्मीळ बाब. खेळाडूंची दुखापत ही सततच्या व्यग्र खेळाचा व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) व्यवस्थापनातील दोषाचा परिपाक आहे हे अगदी योग्य. टी-ट्वेंटीसारख्या झटपट सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली असेलही; पण अस्सल क्रिकेटशौकिनांसाठी आजही कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरू असतानाच, तिथे ‘बिग बॅश लीग’ ही स्थानिक क्रिकेट स्पर्धा सुरू होती, त्यात खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू पाहिले तर गुणवत्तेला प्रचंड वाव आहे हे प्रकर्षांने जाणवते. त्यामुळे भारताविरुद्ध खेळताना चार जागतिक दर्जाचे गोलंदाज सतत गोलंदाजी करत राहिले हे गुणवत्ता आटल्याचे लक्षण नसून त्या गोलंदाजांची आक्रमक वृत्ती दाखवणारे आहे. त्यांच्या जागी नवोदितांना संधी देणे हे संघ व्यवस्थापनालादेखील सोयीचे वाटले नसावे.

कर्णधार हा त्याच्या निर्णयांमधून संघाला दिशा देत असतो. आक्रमकपणा हा देहबोलीतून दिसण्यापेक्षा तो मैदानावरील निर्णयांमधूनदेखील दाखवला जाऊ शकतो, हे अजिंक्य रहाणेने दाखवून दिले. शांत आणि संयमी खेळाडूंसाठी निर्णयप्रक्रिया खूप साधी आणि सरळ असते. ‘डीआरएस’ कधी घ्यावा आणि कधी घेऊ नये हे महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे यांसारखे संयमी खेळाडू चाणाक्षपणे हेरतात. पण त्याच वेळी विराट कोहलीसारखी अतिआक्रमकता किती धोकादायक असते हेदेखील आपण पाहिले आहे.

– अतुल नरसिंग पवार, जातेगाव (जि. पुणे)

विभक्तींच्या अर्थभेदाकडे दुर्लक्ष..

‘चतुर्थी विभक्तीचा कार्यक्षम ‘प्रत्यय’’ हा संपदा देशपांडे यांच्या संशोधनावर आधारित राधिका कुंटे यांचा लेख (‘विवा’, २२ जानेवारी) वाचला. चतुर्थी विभक्तीच्या व्याप्तीचे संशोधन संपदा देशपांडे करतात, ही अभिमानास्पद बाब आहे. मराठीतील सातही विभक्तींचा आवाका, व्याप्ती आणि गरज नसलेल्या विभक्तीबाबत साधारण ५० वर्षांपूर्वी डॉ. ग. मो. पाटील यांनी संशोधन केले होते. मात्र फक्त चतुर्थी विभक्तीचा निरनिराळ्या बोली भाषांतील अभ्यास हे संशोधनाचे निराळे क्षेत्र आहे. मराठी भाषेत द्वितीया आणि चतुर्थी या दोन विभक्तींचे प्रत्यय स, ला, ते स, ला, ना, ते असे सारखेच असून त्यांच्या अर्थभेदासाठी एक सोपा नियम आहे. वाक्यात द्वितीया आहे की चतुर्थी हे समजण्यासाठीचा नियम असा की, ज्याला द्यायचे त्यांची चतुर्थी विभक्ती, अन्यथा द्वितीया विभक्ती. असे असताना लेखिकेने काही द्वितीया विभक्तीची वाक्ये चतुर्थी विभक्तीची म्हणून दिली आहेत. ‘मी त्याला पुस्तक दिले’ हे वाक्य चतुर्थीचे आहे. मात्र, ‘त्याला थंडी वाजते’, ‘तो अभ्यासाला बसला’ आणि ‘मी पुण्याला गेले’ ही वाक्ये द्वितीया विभक्तीची आहेत.

– जगन्नाथ पाटील, नालासोपारा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 12:32 am

Web Title: loksatta readers mail loksatta readers reaction zws 70 6
Next Stories
1 खायचे दात आणि दाखवायचे दात..
2 माहितीच्या संरक्षणाची हमी कोण देणार?
3 म्हणे ‘कायदे बदलता येत नाहीत’..
Just Now!
X