धर्मनिरपेक्षतेची स्पष्ट व असंदिग्ध व्याख्या नाही..

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

‘निवडक धर्मनिरपेक्ष?’ हा अन्वयार्थ (२२ जुलै) वाचला. ‘धर्म’ व ‘निरपेक्ष’ असे दोन शब्द मिळून बनलेल्या ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाची स्पष्ट व असंदिग्ध व्याख्या नाही. राजकीय नेते आपापल्या सोयीनुसार याची व्याख्या ठरवत असतात. इंग्रजीत ‘सेक्युलर’ हा शब्द उपयोगात आणतात. त्याचा अर्थ- ‘कोणत्याही धर्माशी अथवा आध्यात्मिक बाबींशी संबंधित नसलेला’ असा आहे. हा शब्द भारताच्या राज्यघटनेत १९७६ साली झालेल्या घटनादुरुस्तीनंतर प्रविष्ट झाला. सुरुवातीच्या काळात भारतीय राज्यघटनेने धार्मिक कार्यात ‘राज्य/ राज्यसंस्थेत (स्टेट)’ हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध केलेला नव्हता. राजकारणात शीर्षस्थ स्थानी असणाऱ्यांनी धर्मानुसार रीतिरिवाज पाळावे किंवा नाही याचा ऊहापोह अनेकदा झाला आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित होते. राष्ट्रपतींचा मंदिराच्या समारंभात सहभाग नेहरूंना आवडला नव्हता व त्याबाबत त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी वेळोवेळी भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेटी दिल्याचे दाखले आहेत. वर्षभरापूर्वी निवडणुकीच्या काळात तर अशा भेटींना भरपूर प्रसिद्धी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

भारतात राजकारण धर्म व जात यांभोवती सदैव घुटमळत असते. सर्व राजकीय पक्षनेत्यांचा धर्मनिरपेक्षपणा हा बेगडीच असतो. शरद पवार हेही त्यास अपवाद नाहीत. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेची स्पष्ट व असंदिग्ध व्याख्या नसल्याने बेगडी नेत्यांचे फावते व ते त्यांच्या सोयीनुसार धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे ठरवतात. धर्मनिरपेक्षता नुसती घटनेत असून चालत नाही, तर ती वागण्यात, बोलण्यात व व्यवहारात प्रकट व्हायला हवी. धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे जनतेला जाणवायला हवे व त्यासाठी सरकारची कृती तशी हवी. प्रसंगानुरूप धर्मनिरपेक्षतेचे राजकारण्यांचे आचरण लोकांच्या नजरेत येते व स्मृतीत घर करून बसते आणि निवडणुकीच्या वेळी मतदानाची दिशा ठरवते.

– रवींद्र भागवत, कल्याण पश्चिम (जि. ठाणे)

हे म्हणण्यास मुस्लीम नेते तयार होतील काय?

‘निवडक धर्मनिरपेक्ष?’ हा अन्वयार्थ (२२ जुलै) फक्त शरद पवारांनाच नव्हे, तर ‘बहुसंख्य हिंदूंचा सतत तेजोभंग आणि मुस्लिमांतील धर्माधांचे तुष्टीकरण म्हणजेच धर्मनिरपेक्षता’ ही नीती राजकारणात जे जे अवलंबितात त्या सर्वानाच लागू पडणारे आहे. या पक्षपाती नीतीमुळे भारतीय राजकारणाची फार मोठी हानी झाली. जे हिंदू कधीही हिंदुत्ववादाकडे आकर्षित झाले नव्हते, ते मोठय़ा प्रमाणावर आकर्षित झाले (यादृष्टीने काँग्रेससकट तथाकथित धर्मनिरपेक्षवादी पक्ष हे भाजपचे उपकारकर्तेच आहेत!). तर ‘धर्मनिरपेक्ष, पुरोगामी म्हणजे हिंदूद्वेष्टा आणि मुस्लीमअनुनयी’ अशी प्रतिमा बहुसंख्य हिंदूंच्या मनात तयार झाली. त्यामुळे खऱ्या धर्मनिरपेक्ष चळवळी व व्यक्ती अप्रिय आणि निष्प्रभ झाल्या. तर दुसरीकडे मुस्लिमांतील धर्माध संघटना आणि नेते यांना अनायासे बळ आणि प्रोत्साहन मिळत गेले.

नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘या देशातील हिंदूंचा जातीयवाद ही प्रगतीला फार मोठी खीळ आहे, असे मी मानतो. मात्र इतर कोणत्याही कारणांमुळे नव्हे, पण फक्त एका कारणामुळे हिंदू जातीयवादी राष्ट्रद्रोही होऊ शकत नाहीत. हिंदुस्थानाबाहेर कुठेच हिंदूना परंपरा, इतिहास व संख्या यांचे अधिष्ठान नाही. मुस्लीम जातीयवादाची गोष्ट यापेक्षा निराळी आहे. हिंदू जातीयवादी काही निर्णायक प्रश्न उभे राहिले म्हणजे आपला हिंदुत्ववाद गुंडाळून ठेवू शकतात, याची उदाहरणे देता येतील. हिंदूधर्माची प्रतिष्ठा की भारताची प्रतिष्ठा, असा प्रश्न येईल त्या वेळी धर्म गुंडाळून ठेवून आम्ही भारताच्या बाजूने उभे राहू, असे हिंदूंपैकी बहुतेक जण सांगतील. मात्र अशा वेळी भारताच्या प्रतिष्ठेसाठी मुसलमानपण विसरू, हे स्पष्टपणे म्हणण्यास मुस्लीम नेते तयार होतील काय?’ (‘शिवरात्र’, पृष्ठ- १८२/१८३) हे एका हिंदुत्ववादविरोधी विचारवंत लेखकाचे विचार आहेत, हे विशेष!

– अनिल मुसळे, ठाणे

हिंदुत्ववादी पक्षांचे हिंदुत्वही बेगडीच!

‘निवडक धर्मनिरपेक्ष?’ हा अन्वयार्थ (२२ जुलै) वाचला. ‘‘राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येणार असल्यास खुशाल मंदिराचे भूमिपूजन करावे,’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार करतात तेव्हा त्यांच्या हेतूविषयी प्रश्न निर्माण होतो,’’ हे त्यातील म्हणणे योग्यच आहे. तसेच ‘जनतेने या मंडळींनी नाकारले, कारण या सर्वाची धर्मनिरपेक्षता बेगडी आहे असे वाटल्यामुळे,’ हे म्हणणेही योग्यच आहे. परंतु मग प्रश्न उरतो तो, सत्तेसाठी याच ‘धर्मनिरपेक्षतावादी’ पक्षांबरोबर तडजोडी करणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षांचे हिंदुत्व पारखण्याचा. सत्तेसाठी करावयाच्या राजकारणात या हिंदुत्ववादी पक्षांचे हिंदुत्वही ‘बेगडी’च म्हणावे लागेल. कारण सत्तेसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात, संख्याबळासाठी याच धर्मनिरपेक्षतावादी पक्षांची मदत घेण्यात हिंदुत्ववादी पक्षांना काही वावगे वाटत नाही. एकीकडे या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नावाने बोटे मोडायची, स्वत:ला तमाम हिंदूंचे ‘भाग्यविधाते’ समजायचे, एका विशिष्ट धर्माविरुद्ध मनात अढी ठेवून वागायचे, झुंडशाहीने या धर्मातील लोकांवर हल्ले करायचे आणि त्याच वेळी सत्तेसाठी याच धर्मनिरपेक्ष पक्षांचा आधार घ्यायचा, याला ‘बेगडी’ हिंदुत्व नाही तर काय म्हणायचे?

तेव्हा जनतेच्या दृष्टीने ‘निवडक धर्मनिरपेक्ष’ काय किंवा ‘बेगडी हिंदुत्व’ काय, दोन्ही गौण आहेत. दोन्ही विचारांचे (?) पक्ष हे सत्तेसाठी हपापलेले आहेत हेच सत्य आहे. जनतेला या ‘धर्मनिरपेक्ष’- ‘हिंदुत्व’ वादांपेक्षा देशात हवी आहे शांतता आणि देशाचा व पर्यायाने स्वत:चा आर्थिक विकास!

– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली पूर्व (जि. ठाणे)

अंतर्गतदृष्टय़ा मजबूत असू तरच परराष्ट्र धोरण खंबीर

‘तोकडी तटस्थता!’ हा अग्रलेख (२२ जुलै) वाचला आणि जे.आर.डी. टाटांच्या आत्मवृत्तातील एक प्रसंग आठवला. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांमध्ये आंद्रे व्हिशीन्स्की हे सोव्हिएत युनियनचे प्रतिनिधी होते, तर भारताचे प्रतिनिधी होते कृष्ण मेनन. व्हिशीन्स्की हे कडवे कम्युनिस्ट आणि संधी मिळेल तेव्हा अमेरिकेवर विखारी तोंडसुख घेत असत आणि अमेरिकेला कचाटय़ात पकडत असत. कृष्ण मेनन हेसुद्धा अमेरिकेवर अतिशय जळजळीत टीका करत.

जेआरडी नेहरूंना भेटत तेव्हा कधीच आपल्या व्यावसायिक अडचणीची गाऱ्हाणी सांगत नसत. पण भारताच्या हिताबद्दलच बोलत असत. एका भेटीत त्यांनी मेनन यांच्या अमेरिकेवरील विषारी टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली. तसे नेहरू उसळून म्हणाले, ‘‘कृष्ण मेनन हे युनोमधील भारताचे व्हिशीन्स्की आहेत!’’ त्यावर जेआरडींचे उत्तर मार्मिक होते. ‘‘व्हिशीन्स्की हे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या शक्तिशाली देशाचे प्रतिनिधित्व करतात. आज जगात भारताची किती ताकद आहे?’’

या प्रसंगात एकाच वेळी भारताच्या अलिप्ततेच्या धोरणाबाबत अनेक प्रश्न व उत्तरेही लपलेली दिसतात. दुसरे म्हणजे, तटस्थता टिकवायची असेल तरीही तुम्ही एक सक्षम आणि शक्तिशाली देश असावे लागता. कमकुवत देशाच्या तटस्थतेलासुद्धा आव्हान मिळू शकते. अन्यथा तटस्थता ही मजबुरी होते. त्यामुळे जागतिक पटावर सक्रिय आणि त्यासाठी सक्षम होण्यासाठी देशातील अंतर्गत व्यवस्था न्यायाची, उत्तम शिक्षण व उद्योग यांना चालना देणारी, कोणताही राजकीय हस्तक्षेप नसणारी असावी लागते. त्यामुळे तटस्थतेचे फायदे-तोटे, तटस्थेतेचे स्वरूप आणि भविष्यातील शक्तिवान परराष्ट्र धोरण यांवर सखोल परामर्श व्हायला हवा. तसे केले तर निदान हे नक्की कळेल की, अंतर्गतदृष्टय़ा खंबीर असणे हे परराष्ट्र धोरण खंबीर बनवते. तोकडी तटस्थता बदलायची असल्यास अंतर्गत मजबुतीचा शोध घ्यायला हवा. त्यासाठी काही क्षेत्रे ही राजकारणाच्या कचाटय़ातून बाहेर काढायला हवीत. अन्यथा अलिप्तता चळवळीचे गोडवे गाताना ‘गुजराल डॉक्ट्रिन’चा आपल्याला विसर पडतो आणि निरपेक्ष असल्याचे भ्रामक समाधान मात्र आपण मिळवतो.

– उमेश जोशी, पुणे</p>

..तर हा पर्याय योग्यच वाटणार!

‘न्यायपालिकेचा अधिकार बळकावू नका!’ या निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांनी खुल्या पत्राद्वारे केलेल्या आवाहनाची बातमी (लोकसत्ता, २१ जुलै) वाचली. एन्काउंटर पद्धतीचे जनक म्हणता येईल अशा व्यक्तीने आता असे काही करणे हे म्हणजे अलीकडे घडलेल्या अशा काही घटनांशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांबद्दल अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. सर्वोच्च न्यायालय आता म्हणतेय की, ‘इतके गुन्हे दाखल असताना विकास दुबेला जामीन मिळणे हे व्यवस्थेचे अपयश होते.’ जेव्हा खुनी, दरोडेखोर, बलात्काऱ्यांना न्यायपालिकेकडून शिक्षा व्हायला २०-३० वर्षे लागतात आणि तेवढी वर्षे पीडित, फिर्यादी, साक्षीदार जिवंत राहण्याचीही शाश्वती नसते, तेव्हा एन्काउंटर हा पर्याय चुकीचा वाटतच नाही. म्हणूनच आंध्र प्रदेशात घडलेल्या एन्काउंटरचे लोक मनोमन स्वागत करतात. हे नक्कीच न्यायव्यवस्थेचे अपयशच आहे; कारण नैतिकदृष्टय़ा पूर्ण चुकीचे आहे हे दिसत असूनसुद्धा विकास दुबेसारख्या अट्टल गुंडाला न्यायालयानेच जामिनावर मोकाट सोडलेले असते.

– प्रवीण प्र. देशपांडे, बोरिवली, पूर्व (मुंबई)

याची ना आत्मचिकित्सा होते ना आत्मसमर्थन..

उमेश बगाडे यांच्या ‘समाजबोध’ सदरात (२२ जुलै) ‘जातीच्या नावांमुळे जातीच्या अस्तित्वाला व अस्मितेला अचलता, बंदिस्तता व निरंतरता प्राप्त होत असते,’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत उद्धृत केले आहे. जगात कुठेही लोहार, चांभार अशी व्यवसायवाचक नामे व्यक्तींच्या समूहाला चिटकवली जात नाही, अशी स्वत:ची पुस्तीही लेखकाने जोडली आहे. भारताबाहेर आपल्यासारखी जातीव्यवस्था नसली तरी बऱ्याच कुटुंबांनी गोल्डस्मिथ, टेलर, कारपेंटर असली व्यवसायवाचक नामे आडनावे म्हणून स्वीकारलेली दिसतात. शिम्पी, सोनार, लोहार, गवळी, कासार अशी बरीच नामे जातीसह व्यवसायदर्शक आहेत. याबाबतीत ब्राह्मण जातीने खूपच बारकावा आणलेला दिसतो. जोशी, दाते, पंडित, दीक्षित, उपाध्ये, पुजारी, अभिषेकी, कुलकर्णी, पुरोहित, पुराणिक, परांजपे, धर्माधिकारी.. अशी बरीच आडनावे एकेकाळी व्यवसायभिन्नता दर्शक म्हणून प्रचलित होती. ते बारकावे आता लुप्त झाले आहेत. साठे, आठवले अशा काही विशिष्ट आडनावांचे सामाजिक अभिसरणही झालेले दिसते. पण त्यांच्या मदतीने कुणीही आत्मचिकित्सा वा आत्मसमर्थन करत नाही.

– प्रा. विजय काचरे, कोथरुड (जि. पुणे)