विझत्या निखाऱ्यास फुंकर मारून धगधग..

‘दुवा की दुखणे?’ हा अग्रलेख (५ मार्च) वाचला. हा दुवा तर नाहीच, पण असाध्य नसले तरी लवकर बरे होण्यासारखे हे दुखणे नाही. नजीकच्या काळात असलेल्या राज्यस्तरीय निवडणुका संपेपर्यंत तरी जखमेवरची काढलेली ही खपली सलत राहण्याचा संभव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरू घराण्याला राजकीय अनुभव आहे. इंदिरा गांधींच्या धडाडीच्या कार्यवाहीचा तर विरोधी पक्षातील अटलबिहारी वाजपेयींकडून गौरव करण्यात आला होता. तरीदेखील आणीबाणी घोषित करण्याची चुकीची पावले त्यांनी उचलली होती. २१ महिन्यांची आणीबाणी संपल्याला ४३ वर्षे उलटून गेली. हळूहळू आणीबाणी स्मृतिआड होत होती. विरोधकांचा त्या भांडवलाचा प्रभावही कमी झाला होता. आणीबाणीच्या स्मृती हळूहळू खोलवर पुरल्या जात होत्या. पण विरोधकांना फुंकर मारून पेटवायला राहुल गांधींनी पुन्हा धगधगता निखारा त्यांच्या हाती दिला आहे. याला राजकीय अपरिपक्वता समजायचे की धूर्त धोरण, ते काळच ठरवेल.

– शरद बापट, पुणे

‘आणीबाणी’-विधानांस सद्य:स्थितीचा संदर्भ..

‘दुवा की दुखणे?’ हे संपादकीय (५ मार्च) वाचले. राहुल गांधी यांनी आणीबाणीवर स्वत:चे मत आताच का मांडले, यास देशातील सद्य: परिस्थितीचा संदर्भ आहे. देशाचे सरन्यायाधीश निवृत्त झाल्यावर अवघ्या काही महिन्यांतच सत्ताधारी पक्षाच्या कोटय़ातून राज्यसभेची खासदारकी स्वीकारतात, यावरून सारे स्पष्ट होते. दुसरा मुद्दा पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांचा. या राज्यांत काँग्रेसला किती जागा मिळतील वा पक्ष कोणत्या राज्यात सत्तेत सहभागी होऊ शकेल, हे निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईलच. पण राहुल गांधी व पर्यायाने काँग्रेस पक्ष लवकरच कात टाकतील, ही आशा.

– डॉ. शैलेश कदम, जिंतूर (जि. परभणी)

..तर भाजपला फार काही करण्याची गरज नाही!

समोर मोठेच आव्हान उभे असताना, काँग्रेस पक्षाने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, तिथेच माशी शिंकते आहे. याचसंदर्भात ‘दुवा कीदुखणे?’ या संपादकीयातून (५ मार्च) काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले आहे. आता वास्तविक राहुल यांनी गांभीर्याने निर्णय घेण्याची वेळ आली आहे.  संपादकीयात म्हटल्याप्रमाणे, आता गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेसने नेतृत्वाचा विचार करायला हवा. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारता’चे ‘मिशन’ हाती घेतलेच आहे; मात्र काँग्रेस नेत्यांची अशीच कार्यपद्धती राहिली तर भाजपच नव्हे तर इतरांनाही विशेष प्रयत्न करण्याची गरजच नाही. देशाला एका प्रबळ विरोधी पक्षाची नितांत आवश्यकता आहे; मात्र याबाबत काँग्रेसकडून अपेक्षाभंगच होताना दिसतो.

– अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)

हे तर ‘राष्ट्रीय जनुकीय गुणा’स साजेसेच!

‘दुवा की दुखणे?’ हे संपादकीय (५ मार्च) वाचले. जयप्रकाश नारायण यांनी त्यांना इंदिरा गांधींनी अटक केली त्या वेळी ‘विनाशकाले विपरीत बुद्धि:’ असे उद्गार काढले होते, त्याची आठवण झाली. आत्मनाशाची प्रेरणा किंवा हौतात्म्याची हौस राहुल गांधी यांना अलीकडच्या काळात चुकीच्या वाटेवर नेत असावी. वर्तमानावर भाष्य करण्याची वेळ आली की भूतकाळात घुसण्याच्या आपल्या राष्ट्रीय जनुकीय गुणाचा उल्लेख व्ही. एस. नायपॉल यांनी त्यांच्या ‘इंडिया : अ वूण्डेड सिव्हिलायझेशन’ या पुस्तकातही केल्याचे आठवले!

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई)

लसीकरणाचा सुखद अनुभव..

करोना लसीकरणाच्या बातम्या (लोकसत्ता, २ व ३ मार्च) वाचून मन साशंक होते. पण ४ मार्चला मात्र वांद्रे-कुर्ला संकुलातील चित्र बदलल्याचे अनुभवले. आम्ही ज्येष्ठ नागरिक दुपारी दीड वाजता संकुलात पोहोचलो. आधीच नोंदणी केलेले आणि नोंदणी केली नसलेल्यांच्या रांगा वेगवेगळ्या होत्या. लोकांना बसण्याची भरपूर सोय होती. ऊन कुठेही लागले नाही. रांगा भराभर पुढे सरकत होत्या. प्रवेश केल्यापासून मदतसाठी जागोजागी कर्मचारी उपलब्ध होते. कुठेही अडचण न येता नागरिक प्रत्यक्ष लसीकरण कक्षापर्यंत पोहोचू शकत होते. लसीकरणानंतर ३० मिनिटांची प्रतीक्षा संपल्यावर सव्वातीन वाजता आम्ही परतीच्या वाटेला लागलो. दाट लोकवस्तीच्या मुंबईमध्ये असा अनुभव सुखदच म्हणायाला हवा!

– ज्योती रोद्द, मुंबई

सर्वासाठी एकच रांग, वेळेआधीच बंद..

मी आणि माझ्या पत्नीने  ू६्रल्ल.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावरून लसीकरणासाठी नोंदणी केली. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा आम्ही २ वाजता दहिसर पूर्वमधील जम्बो लसीकरण केंद्रावर पोहोचलो तेव्हा केंद्राच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर लागलेला मोठी रांग पाहून चकितच झालो. तेथे नोंदणी केलेल्यांसाठी व न केलेल्यांसाठी अशी एकच रांग होती, वेगवेगळी नव्हती. त्यामुळे संकेतस्थळावरून नोंदणी करण्याची आवश्यकता नाही असेच वाटते. रखरखीत उन्हात एक तास उभा राहिल्यानंतर तीन वाजता लसीकरण केंद्राचा दरवाजा बंद करण्यात आला व सर्वाना ‘उद्या या’ म्हणून सांगितले गेले. पण लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे ना? अशा तऱ्हेने ज्येष्ठ नागरिकांना भर दुपारच्या रखरखत्या उन्हात उभे करून काय साध्य होईल?

– दीपक मलुष्टे, बोरिवली पूर्व (मुंबई)

विनाव्यत्यय, त्रासाशिवाय दोन तासांत लसीकरण..

लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि मुंबई व ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी नियोजनाचा अभाव व गोंधळाच्या बातम्या वाचल्या. मात्र, आम्हाला याबाबतीत अतिशय सुखद अनुभव आला. पूर्वनोंदणी करून मी व माझी पत्नी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेलो असताना तेथे लसीकरण प्रक्रिया अतिशय नियोजित व चोख पद्धतीने होताना दिसली. आश्चर्य म्हणजे या ठिकाणी गर्दी कमी प्रमाणात होती. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला टोकन देण्यात येत होते व त्या क्रमांकानुसार शारीरिक अंतर नियमन पाळून नोंदणी व लसीकरण करण्यात येत होते. लसीपश्चात अर्धा तास निरीक्षणाची वेळ धरून आमचे लसीकरण दोन तासांत विनाव्यत्यय आणि कुठल्याही त्रासाशिवाय पार पडले. नोंदणी करण्यास वेळ लागत होता तरी सर्व कर्मचारी अतिशय शांतपणे आणि संयमाने आपापला कार्यभार पार पाडीत होते, तसेच प्रत्येकाच्या शंकांना, प्रश्नांना व्यवस्थितपणे हाताळत होते.

– हर्षवर्धन दातार, ठाणे