lp06जेजे इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्टच्या विद्यार्थ्यांनी ‘अक्षर घटने’चा एक अभिनव प्रयोग केला. या अक्षर घटनेमध्ये मुंबईतील रचना संसद आणि रहेजा स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट या कला महाविद्यालयाचे विद्यार्थीसुद्धा सामील झालेले होते. एकूण ५० विद्यार्थ्यांनी या अक्षर घटनेरूपी उपक्रमात आपली कला सादर केली. यामध्ये त्यांनी ‘पांडुरंग’ हा शब्द ११ भारतीय लिपींमध्ये लिहिला तसेच १०० टोप्या आणि झेंडय़ावर त्याची कॅलिग्राफी केली. त्यासाठी त्यांनी १५० लांबी आणि पाच फूट रुंदीचा कपडेपट तयार केला. ते सगळं घेऊन हे विद्यार्थी वारीत सहभागी झाले. या सगळ्या विद्यार्थ्यांनी २२ जुलैला सदाशिवनगर येथील रिंगणात आपली कला सादर केली. वारकऱ्यांना त्यांनी ‘पांडुरंग’ साकारलेले झेंडे आणि टोप्या दिल्या.
एखादा कलाकार किंवा चित्रकार सतत काही ना काही तरी वेगळे आणि नवीन असे शोधत असतो. अशीच काही तरी वेगळे साकारण्याची कल्पना प्राध्यापक संतोष क्षीरसागर यांच्या डोक्यात आली. मग त्याला रहेजा आणि रचना संसद कॉलेजच्या अनिल नाहटे आणि वैशाली आंबेरकर या शिक्षकांची साथ मिळाली. कोणत्याही भाषेमध्ये अक्षरं महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक अक्षरे मिळून लिपी बनलेली असते आणि भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये ३६हून जास्त भाषा बोलल्या जातात. प्रत्येक राज्याची, प्रदेशाची एक वेगळी भाषा. असं म्हणतात की आपल्या देशात दर मैलावर भाषा बदलते. प्रत्येक भाषेची वेगळी लिपी. अक्षर हे दृश्य कलेचे एक माध्यम आहे. हीच विविधतेतील एकता दृश्य माध्यमातून दाखवण्याचा हेतू होता.
यासाठी त्यांनी अकरा भारतीय लिपींची निवड केली. एक महिन्या-पासून याची तयारी सुरू होती. या अक्षर घटनेची प्रमुख खुशबू नायक सांगते, वारीला हा जाण्याचा माझा पहिलाच प्रयत्न होता. अक्षर घटना साकारताना खूप मजा आली. पुढच्या वेळेपासून मोठय़ा प्रमाणावर करायचे आम्ही सगळ्यांनी ठरवले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भक्ती संप्रदायाची ओळख झाली. बाहेरील जगाचा दृश्य तसेच कला शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते समजले. पर्यावरणाचे महत्त्व पटले. यादरम्यान विद्यार्थ्यांना खूप चांगले अनुभव आले. लोकांना त्यांची कल्पना खूपच आवडली. ते जेव्हा रिंगणात उभे राहिले तेव्हा काही वारकरी चक्क मुलांच्या पाया पडले. एक पंजाबी कुटुंब त्यांच्याजवळ आले. त्यांना बाकीचं काय लिहिलं होतं ते समजत नव्हतं, पण गुरुमुखीमध्ये ‘पांडुरंग’ हा शब्द वाचून त्यांना बाकीच्याची कल्पना आली. गावातल्या लोकांनी त्यांनी बनवलेल्या टोप्या आवडीने घेतल्या. महिलांनी त्यांच्या सोबत फुगडय़ा घातल्या. एका वारकऱ्याला त्यांची ही अक्षर घटना इतकी भावली की, पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत तो त्यांच्या सोबत होता. आम्हाला वारीत दिला गेलेला प्रसाद अतिशय आवडला असं आकांक्षा जोशी सांगते. मुलांना कॉलेजचे प्राचार्य वाघमारे यांचेसुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मानसी जोशी – response.lokprabha@expressindia.com