25 May 2020

News Flash

हिरवाई : अँथुरियम

आपली एक गंमत असते. एखादे सुंदर फूल पाहिले की आपण म्हणतो, ‘अगदी प्लास्टिकच्या फुलासारखे दिसते.’ तसेच एखादे प्लास्टिकचे सुंदर फूल पाहिले की म्हणतो...

| January 16, 2015 01:24 am

आपली एक गंमत असते. एखादे सुंदर फूल पाहिले की आपण म्हणतो, ‘अगदी प्लास्टिकच्या फुलासारखे दिसते.’ तसेच एखादे प्लास्टिकचे सुंदर फूल पाहिले की म्हणतो, ‘अगदी खरोखरीच्या फुलासारखे दिसते.’ तर आज आपण खरोखरीचीच फुले परंतु अगदी प्लास्टिकच्या फुलांसारखी दिसणारी व इतकेच नाही तर जवळजवळ एक महिन्यापर्यंत टिकणाऱ्या फुलांची ओळख करून घेऊ. अँथुरियम ही मनीप्लांट आणि अळूच्या कुळातील एक वनस्पती आहे. हिची मोठाली, हृदयाकृती व झळाळणारी पाने लांब देठावर शोभून दिसतात. ज्यांनी कोणी अळवाची फुले पहिली असतील, त्यांना अँथुरियम व अळू एकाच कुळातील आहेत हे लक्षात येईल. मनीप्लांट, फिलोडेंड्रन, अ‍ॅग्लोनेमा, डायफेनबेकिया याही सर्व अँथुरियमच्या कुळातीलच आहेत. 

खरे पहिले तर अँथुरियमची फुले अत्यंत सूक्ष्म असून त्यांना काही शोभा नसते. आपण ज्यांना फुले समजतो ती फुले नसून पुष्पगुच्छ (Inflorescence) असतात. पुष्पगुच्छाचा पाकळीसारखा रंगीत भाग असतो, त्यास स्पेद (spathe) असे म्हणतात. स्पेदच्या आत दांडय़ासारखा जो भाग असतो, त्यास स्पॅडिक्स (spadix) असे म्हणतात. स्पॅडिक्सवर जे अनेक पांढरट ठिपके दिसतात तीच खरी अँथुरियमची फुले होत. ही वर्षभर फुलणारी वनस्पती आहे. जेथे भरपूर उजेड आहे, पण दुपारचे ऊन नाही अशा जागी, घरातही अँथुरियम चांगल्या प्रकारे वाढू शकतो.
अँथुरियमला जाडसर पण स्पंजसारखी मांसल मुळे असतात. अशा मुळांवर तंतूमुळेही असतात. ह्य सर्व मुळांना जशी पाण्याची आवश्यकता असते तशीच श्वसनक्रियेसाठी हवेचीही गरज असते. त्यासाठी त्यांची लागवड नारळाच्या सोढणाचे तुकडे (हल्ली कोकोचिप्स नावाने नर्सरींतून उपलब्ध असतात), विटांचे व कोळशाचे तुकडे व थोडी खत-माती यांच्या मिश्रणात करावी. केरळमध्ये नारळाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असल्याने तेथील नर्सरींमधून अँथुरियमची लागवड नारळाच्या सोढणावरच केली जाते. आपल्या कोकणातलेही वातावरण अँथुरियमच्या लागवडीस उत्तम आहे; तिथे नारळाचेही उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. परंतु अँथुरियमची लागवड कोकणात का घेतली जात नाही? ह्यचे उत्तर म्हणजे आपली उदासीनता. वास्तविक माडांच्या बनातील वातावरण अँथुरियमच्या लागवडीस खूपच मानवणारे असते. नारळाच्या सोढणांची उपलब्धताही आहे. परंतु, सोढणांचा उपयोग फक्त सरपण म्हणूनच केला जातो हा एक दुर्वलिासच आहे.
अँथुरियमचे शास्त्रीय नाव आहे अँथुरियम अँड्रीयानम (Anthurium andreanum) मॉरिशस देशाचे हे राष्ट्रीय फूल आहे. तेथे उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. ऊस गाळपानंतर राहिलेल्या पाचटावर तिथे अँथुरियमची लागवड केली जाते. अँथुरियमला दमट व उष्ण, विषुववृत्तावरील हवामान मानवते. थंड हवामानात वाढणारी अँथुरियम शेरझेरियानम (Anthurium schezerianum) ही एक जात आहे.
अँथुरियमची लागवड मूळ झाडाच्या विभाजनाने करता येते. एक झाड जसजसे मोठे होत जाते, तसतसे त्याला जमिनीलगत, मुख्य बुंध्यावर उगवणारे धुमारे फुटतात. हे धुमारे साधारण मोठे झाले की त्यांना मुख्य झाडापासून वेगळे करून लवावेत. हे धुमारे मात्र फक्त खत-माती मिश्रणातच लावावेत. ते जोमाने वाढून त्यांचा खोडाचा भाग विकसित झाला की मग त्यांचे विटांचे, कोळशाचे व नारळाच्या सोढणाचे तुकडे आणि थोडी खतमिश्रित माती या माध्यमात लागवड करावी.
नंदन कलबाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2015 1:24 am

Web Title: anthurium
टॅग Hirvai,Nature
Next Stories
1 ‘ती’चं विश्व : साक्षी महाराजांची उलटी गंगा
2 गोष्ट : भावनास्त्र
3 ब्लॉगर्स कट्टा : एक होती स्वरा
Just Now!
X