सोनल चितळे

मेष चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे आपल्या गुणांचे चीज होईल. केलेल्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सद्य:परिस्थितीतून न डगमगता बाहेर पडाल. सहकारीवर्गाचे उल्लेखनीय साहाय्य मिळेल. स्वकर्तृत्वाने आगेकूच कराल. जोडीदाराचा विश्वास खरा ठरवाल. कुटुंबाला आपला आधार वाटेल. मुलांची रखडलेली कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. श्वसनसंस्थेशी संबंधित काही त्रास उद्भवल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

वृषभ गुरू-चंद्राच्या लाभयोगामुळे चंद्राच्या कुतूहलाला गुरूच्या ज्ञानाची आणि अभ्यासक वृत्तीची साथसोबत लाभेल. नोकरी-व्यवसायात आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवाल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारीवर्गाकडून साहाय्य मिळेल. कामातील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या कामाच्या बाबतीत काही समस्या निर्माण होतील. थोडे धीराने घ्यावे. मुलांची द्विधा मन:स्थिती समजून घ्यावी. चर्चेने प्रश्न सुटतील. गुडघा, पोटऱ्या यांच्या जवळील स्नायुबंधाच्या तक्रारी उद्भवतील.

मिथुन रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे रवीच्या ऊर्जेला चंद्राच्या सर्जनशीलतेची जोड मिळेल. नव्या संकल्पना अमलात आणाल. विचारातील बदल सकारात्मकतेकडे नेईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवणे कठीण जाईल. कामात लहान-मोठय़ा त्रुटी राहून जातील. सहकारीवर्गाच्या कामावर लक्ष ठेवावे लागेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्याची चिडचिड वाढेल. त्याची स्थिती समजून घ्यावी. कुटुंबातील तणावाचे वातावरण आपण हलके कराल.

कर्क चंद्र-शुक्राच्या लाभयोगामुळे मानसिक स्थिती उत्साहित राहील. नव्याने कामाला सुरुवात कराल. नोकरी-व्यवसायात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. वरिष्ठांची शिस्त अंगी बाणवाल. सहकारीवर्गाचा उत्साह वाखाणण्याजोगा असेल. जोडीदाराच्या कार्याचा आलेख वरखाली होईल. स्थैर्य मिळवण्यास त्याला खूप मेहनत घ्यावी लागेल. मुलांच्या स्वास्थ्यासंबंधित जागरूक राहावे. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. यकृताच्या तक्रारी निदर्शनास येतील. औषधोपचार घ्यावा.

सिंह मंगळ-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे मंगळाच्या उत्साहाला नेपच्यूनच्या अंत:स्फूर्तीची जोड मिळेल. क्रीडाक्षेत्रात तसेच कलाक्षेत्रात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय योग्य विचारांती घ्याल. वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. सहकारीवर्गाला कायद्याचा बडगा दाखवायची वेळ येईल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याची पत वाढेल. कौटुंबिक समस्या सोडवताना जोडीदाराचे म्हणणे विचारात घ्याल. त्वचेला अ‍ॅलर्जीचा त्रास होईल. विशेष काळजी घ्यावी.

कन्या बुध-शुक्राच्या युतियोगामुळे बुधाच्या बुद्धिमत्तेला शुक्राच्या कल्पक आणि कलात्मक दृष्टीची जोड मिळेल. नव्या संकल्पना लाभदायक ठरतील. सद्य:स्थितीचा नव्या दृष्टिकोनातून विचार कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या जबाबदाऱ्या जिकिरीने पार पाडाल. सहकारीवर्गाच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुलांच्या समस्या समजून घ्याल. जोडीदारासह चर्चा करून आर्थिक निर्णय घ्याल. रक्तविकार संभवतात.

तूळ चंद्र-हर्षलच्या युतियोगामुळे जे समोर दिसत आहे त्याच्याही पलीकडचा विचार कराल. इतरांबद्दल गैरसमज करून न घेता त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज आहे. नोकरी-व्यवसायात नियमांचे काटेकोरपणे पालन कराल. वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे कामांना गती येईल. सहकारीवर्गाच्या गुणांचा योग्य उपयोग करून घ्याल. जोडीदाराच्या स्वभावातील चढउतार पाहावयास मिळतील. कौटुंबिक समस्या धीराने सोडवाल. मान, खांदे, दंड यांच्या शिरा आखडतील.

वृश्चिक चंद्र-शनीच्या लाभयोगामुळे चंद्राच्या क्रियाशीलतेला शनीची जिद्द आणि चिकाटी पूरक ठरेल. रखडलेली कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना मान द्याल. त्यांचे म्हणणे आधी ऐकून घेणे हितावह ठरेल. तीव्र विरोध दर्शवू नका. सहकारीवर्गाकडून कामे करून घेताना सावधगिरी बाळगावी लागेल. वारंवार कामाचा आढावा घ्यावा लागेल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. कौटुंबिक  वातावरण उत्साही ठेवाल. मुले प्रगती करतील. उष्णतेचे विकार बळावतील.

धनू  शनी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे चंद्राच्या चंचलतेला शनीच्या शिस्तीचा वचक बसेल. त्यामुळे आचार आणि विचारांमध्ये सातत्य राहील. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारीवर्गाचे प्रश्न डोकं भंडावून सोडतील. जोडीदाराच्या कामकाजात बदल झाल्याने वेळापत्रक नव्याने आखाल. मुलांच्या हिताचे काही मुद्दे त्यांना समजावून द्याल.  त्वचाविकार डोकं वर काढेल. अपचनाकडे दुर्लक्ष करू नका.

मकर चंद्र-बुधाच्या लाभयोगामुळे बुद्धी, भावना आणि विचार या त्रिसूत्रींचा योग्य समतोल साधाल. नोकरी-व्यवसायात आपली निरीक्षणे आणि त्या विषयीची परीक्षणे प्रभावीपणे सादर कराल. वरिष्ठ आणि सहकारीवर्गाची यथायोग्य दाद मिळवाल. जोडीदार नव्या कामाच्या व्यापात व्यस्त असेल. एकमेकांना समजून घेऊन कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. मुलांना शिस्तीचे धडे द्याल. नातेवाईकांच्या मदतीसाठी धावून जाल. वात आणि कफविकार बळावल्यास काळजी घ्यावी.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या युतियोगामुळे ज्ञान आणि विज्ञानाचा संगम होईल. वैचारिक बैठक पक्की कराल. लेखन, वाचन, चिंतन यात मन रमेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. सहकारीवर्गाच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करावा. नाती जपाल. समाजाला उद्बोधक ठरतील असे कार्यक्रम हाती घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आपल्या कामातून इतरांना स्फूर्ती मिळेल. मुलांच्या निर्णयावर विचार करून मग आपले मत मांडाल. घसा आणि कानाचे त्रास उद्भवतील.

मीन बुध-गुरूच्या युतियोगामुळे आपल्या बुद्धिमत्तेला नव्या क्षेत्रातील ज्ञानाची जोड मिळेल. स्वत:ची उन्नती करून घ्याल. नोकरी-व्यवसायात प्रगत विचारांचा आणि दूरदृष्टीचा उत्तम लाभ होईल. आस्थापनेच्या हिताचे निर्णय घ्याल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्गाच्या प्रश्नांकडे  सहानुभूतीपूर्वक पाहावे लागेल. त्यांच्या हक्कांसाठी शब्द टाकाल. जोडीदाराची प्रगतिकारक वाटचाल सुरू होईल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. रक्तातील घटकांचे प्रमाण कमी-अधिक होईल.