09 March 2021

News Flash

राशिभविष्य : १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२१

चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल.

(संग्रहित छायाचित्र)

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. चंद्राची चंचल वृत्ती,  मंगळाचा जोश यांचा चांगला उपयोग करून घ्याल. प्रवास योग संभवतो. नोकरी-व्यवसायात लहान-मोठय़ा अडचणींवर मात करत पुढे जावे लागेल. सहकारी वर्गासह सलोख्याचे संबंध ठेवाल. जोडीदाराच्या कामाला वेग येईल. त्याच्या नव्या विचारांना चालना मिळेल. कौटुंबिक प्रश्न सोडवताना अट्टहास बाजूला ठेवावा. रक्तदाबासंबंधित त्रास उद्भवल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे!

वृषभ भावनांचा कारक चंद्र आणि व्यवहारचातुर्याचा कारक बुध यांच्या लाभ योगामुळे भावना आणि व्यवहार यात समतोल राखाल. नोकरी-व्यवसायातील अडचणी मोकळेपणाने वरिष्ठांना सांगाल. स्पष्टवक्तेपणाचा योग्य उपयोग करून घ्याल. मोठय़ा आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना ताण जाणवेल. कामात सातत्य राखल्यास सर्व चिंता मिटतील. अधीर होऊ नका. जोडीदाराची साथ मिळेल. कुटुंब सदस्य प्रवास करतील. मूळव्याधीचा त्रास बळावण्याची शक्यता आहे.

मिथुन चंद्र-हर्षलच्या लाभ योगामुळे नित्यनेमाच्या कामात नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. आस्थापनेच्या समस्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न कराल. सहकारीवर्गाची साथ मिळेल. जोडीदाराचे रखडलेले काम पूर्ण होईल. त्याच्या आनंदात सामील व्हाल. कौटुंबिक वाद वाढवू नका. मौनं सर्वार्थ साधनम्। उष्णतेचे विकार बळावतील. उत्सर्जनच्या तक्रारी वाढतील. वेळेवर काळजी घेणे आवश्यक!

कर्क रवी-चंद्राच्या केंद्र योगामुळे जास्त मेहनत घेऊन काम करावे लागेल. सुरुवातीला अंदाज चुकतील, पण धीर सोडू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून अनेक प्रकारचे अडथळे, प्रश्न उपस्थित केले जातील. त्यांना अभ्यासपूर्वक सामोरे जावे. सहकारी वर्गाची उल्लेखनीय साथ मिळेल. जोडीदाराचा वैचारिक गोंधळ वाढेल. त्याला विश्रांतीची गरज भासेल. अतिरिक्त जबाबदाऱ्या निभावताना नातेवाईकांची मदत घ्यावी लागेल. ओटीपोटाचा त्रास संभवतो.

सिंह गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे चंद्राचे कुतूहल आणि गुरूचे ज्ञान यांचा योग्य संगम साधाल. तंत्रज्ञान, व्यवस्थापन या क्षेत्रात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी स्वबळावर मोठे आणि महत्त्वाचे निर्णय जाहीर कराल. सहकारीवर्ग मदतीसाठी तत्पर असेल. आर्थिक घडी सावराल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात जिकिरीचे काम व जबाबदारी पूर्ण करेल. कौटुंबिक प्रश्न सोडवताना प्रेम, नाती विसरू नका. कामाच्या तणावामुळे रक्तातील घटक वरखाली होतील.

कन्या चंद्र-शनीच्या केंद्र योगामुळे चंद्राच्या अतिउत्साहाला शनीच्या काटकसरीपणाचा लगाम बसेल. नोकरी-व्यवसायात नव्या संधी चालून येतील. सहकारीवर्गाला मदत कराल. घर आणि नोकरी सांभाळताना जोडीदाराची होणारी कसरत समजून घ्याल. एकमेकांच्या अनुभवातून दोघांना  सावधानतेचा इशारा मिळेल. नातेवाईकांच्या अडचणीच्या वेळी मदतीचा हात पुढे कराल. कफ आणि वात विकार बळावतील. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे!

तूळ  चंद्र-नेपच्यूनच्या युतीयोगामुळे भावनिक आणि वैचारिक समतोल साधाल. नोकरी-व्यवसायातील कामात उत्स्फूर्तता येईल. आपले सादरीकरण नेटके कराल. सहकारीवर्गाचा आधार वाटेल. विचारांमध्ये तफावत असलेल्या लोकांचा सहवास टाळा. जोडीदाराचा ताणतणाव वाढेल. त्याला त्याच्या मेहनतीच्या मानाने अत्यल्प मोबदला मिळेल. कुटुंबात वाद निर्माण होतील. परिस्थिती हळुवारपणे हाताळावी लागेल. आपले मानसिक संतुलन ढळू देऊ नका.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या युती योगामुळे लहान-मोठय़ा गोष्टी मनाविरुद्ध झाल्याने राग येईल किंवा चिडचिड होईल. प्राणायाम करून त्यावर ताबा मिळवा. नोकरी-व्यवसायात आपला वेळ आणि शक्ती सत्कारणी लावाल. सहकारीवर्गाकडून कामे करून घेताना तारेवरची कसरत करावी लागेल. जोडीदाराचा त्याच्या कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल. कुटुंब सदस्यांकडून आनंदवार्ता समजेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. हातापायाला मुंग्या येणे, बधिर होणे, पित्त होणे असे त्रास होतील.

धनू चंद्र-गुरूच्या लाभ योगामुळे मोठय़ा आणि महत्त्वाच्या कामांमध्ये ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. हाती घेतलेल्या तसेच रखडलेल्या कामांना गती मिळेल. कोर्टाची कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक! नातेवाईकांच्या समस्या आणि अडचणी यांचा ताप वाढेल. जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. डोळ्यांचे विकार सतावतील.

मकर शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे शनीच्या चिकाटीला आणि मेहनतीला चंद्राच्या कुतूहलाची जोड मिळेल. संशोधनात्मक कार्यात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात कामानिमित्त हुशार आणि मेहनती लोकांच्या गाठीभेटी होतील. सहकारीवर्गाला उत्तेजन दिल्याशिवाय कामाला गती येणे कठीण! जोडीदार त्याच्या कामात आपल्या कलागुणांची चुणूक दाखवेल. मुलांच्या प्रगतिकारक वार्ता आपणास सुखावतील. प्रॉपर्टीसंबंधित प्रश्न ऐरणीवर येतील. सर्दीचा त्रास सतावेल.

कुंभ चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे सणवार, उत्सव आनंदाने साजरे कराल. नातेसंबंध सांभाळाल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ-वरिष्ठांचे अनुभवाचे बोल कामी येतील.  सहकारी वर्गाला योग्य अशी दाद द्याल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जोडीदाराच्या प्रेमाला चांगला प्रतिसाद द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांसह चांगला संवाद साधाल. आपले कलागुण जोपासताना सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. खांदे, दंड, मनगट यांचे आरोग्य सांभाळावे.

मीन मानसन्मानाचा कारक रवी आणि उत्साहाचा कारक चंद्र यांच्या लाभ योगामुळे निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आपल्या मतांना मान्यता प्राप्त होईल. सहकारीवर्गाची साथ मिळेल. हितशत्रूंचा त्रास कमी करण्यासाठी काही योजना आखाल. व्यवहारचातुर्याचा योग्य उपयोग होईल. जोडीदाराच्या समस्यांवर मार्ग निघेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आधार मिळेल. मणका आणि मज्जासंस्था जपा. विश्रांतीची गरज भासेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 7:33 am

Web Title: astrology from 15th o 21st january 2021
Next Stories
1 राशिभविष्य : ८ जानेवारी ते १४ जानेवारी २०२१
2 राशिभविष्य : १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२१
3 राशिभविष्य : दि. २५ ते ३१ डिसेंबर २०२०
Just Now!
X